राजपुत्र सिद्धार्थाला संघाच्या धोरणाविरुद्ध निर्णय घ्यावा लागल्यामुळे शिक्षा ही होणारच होती; पण शिक्षा द्यायच्या वेळी सेनापती सुद्धा दबावाखाली आला होता. त्यावर सिद्धार्थ गौतमानेच मार्ग काढला. तो मार्ग कोणता ? ते आपण पाहू.
सिद्धार्थ गौतमाने संघापुढे दोन पर्याय ठेवले होते. एक म्हणजे मला देहांताची शिक्षा द्या किंवा देशत्याग करायला सांगा. मी कोणतीही शिक्षा भोगेन. यावर सेनापती म्हणाला,
” सिद्धार्थ, तुझे म्हणणे मान्य करणे कठीण आहे. कारण जरी तुला देहान्ताची शिक्षा दिली किंवा देशत्यागाची शिक्षा दिली आणि तू ती शिक्षा स्वच्छेने स्वीकारलीस, तरी ही गोष्ट कोशल नरेशला समजणार आणि कोशल नरेश असा निष्कर्ष काढेल की ती शिक्षा शाक्य संघानेच दिली. त्यामुळे कोशल नरेश संघाला जाब विचारेल आणि त्याचे समाधान झाले नाही तर कपिलवस्तूवर आक्रमणही करेल.”
त्यावर सिद्धार्थ गौतमाने काही क्षण विचार केला आणि सेनापतीला म्हणाला,
“सेनापतीची आणि संघाची हीच अडचण असेल तर मी एक मार्ग सुचवतो. मी परिव्राजक होतो आणि हा देश सोडून जातो. तो एक प्रकारचा देशत्यागच आहे. पण मी मागे हटणार नाही आणि दोन राज्यात वितुष्ट आणणाऱ्या युद्धात सामील होणार नाही!”
सेनापतीला हा मार्ग पटला; पण सिद्धार्थला परिव्राजक या खडतर मार्गाने जाता येईल का ? याबाबत त्याच्या मनात शंका निर्माण झाली. म्हणून सेनापती सिद्धार्थला गौतमाला उद्देशून म्हणाला,
“तुला तुझ्या आईवडिलांची आणि पत्नीची संमती घेतल्या शिवाय तुला परिव्राजक कसे होता येईल?”
परिव्राज्यकता स्वीकारणे म्हणजे सर्वस्वाचा त्याग करून संन्यास स्वीकारणे होय. सिद्धार्थ गौतमाला सर्वस्वाचा त्याग करणे म्हणजे आई, वडील, पत्नी, मुलगा, संपत्ती या सर्वांचा त्याग करून संन्यस्त जीवन जगावे लागणार होते. सेनापतीच्या प्रश्नाला उत्तर देताना सिद्धार्थ निर्धारपूर्वक म्हणाला,
” आई, वडील, पत्नी यांची संमती मिळवायाचा मी आटोकाट प्रयत्न करीन. जरी त्यांनी संमती दिली नाही, तरी मी स्वखुशीने संन्यास घेईनः पण मी घेतलेला निर्णय बदलणार नाही.”
सिद्धार्थने जो मार्ग सुचवला आहे, तोच योग्य असल्याचे संघाला वाटले. आणि संघाने सिद्धार्थाचा निर्णय मान्य केला. सभा संपत आली होती. इतक्यात एक तरुण सदस्य उठला आणि मला काही बोलायचे आहे. त्यासाठी सर्वांनी अनुमती द्यावी असे तो म्हणाला. संघाच्या रीतिरिवाजानुसार त्या तरुणाला बोलण्यास अनुमती दिली. तो सभेला उद्देशून म्हणाला,
” सभाजनहो, सिद्धार्थ गौतमाने घेतलेला निर्णय तो कधीच बदलणार नाही, याची मला खात्री आहे; पण सिद्धार्थ आपण घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी लवकरच देशत्याग करेल आणि याच दरम्यान आपण तातडीने कोलियांविरुद्ध युद्ध पुकारले तर कोशल नरेशला ही बातमी समजणार. सिद्धार्थने युद्धाला विरोध केला होता. हेही समजणार आणि युद्धाला आणि सिद्धार्थच्या देशत्यागाला संघच जबाबदार आहे, असा निष्कर्ष काढून कोशल नरेश कपिलवस्तूवर नाराज होईल. नाराजीचा काय परिणाम होईल याची सर्वांना कल्पना आहेच. कोशल नरेशनेच आपल्यावर आक्रमण केले तर काय होईल? तेव्हा कोलियांशी युद्ध तातडीने न पुकारता काही काळ लोटू द्यावा.”
संघाला त्या तरुण सभासदाने मांडलेले विचार पटले. त्यांनी कोलियांशी तात्काळ युद्ध न करता काही काळासाठी युद्धाचा निर्णय थांबवला.
अशा प्रकारे संघाची ऐतिहासिक सभा संपली. या सभेनेतर संघ सिद्धार्थाला गमावणार होता. सिद्घार्थ गौतमाच्या जीवनालाही कलाटणी मिळणारी ही सभा होती. या सभेनंतर सिद्धार्थ देशत्याग करणार होता.
सिद्धार्थ घरी आल्यावर कुटुंबात काय घडले? आईवडिलांनी त्याला परिव्राजकासाठी परवानगी दिली का? पत्नी यशोदरने काय केले? की सिद्धार्थ कुणालाच न सांगा रात्रीच्या वेळी अचानक निघून गेला ?
या प्रश्नांची सविस्तर उत्तरे पुढील भागात पाहूया.