US-Iran war flares up again-इराण अमेरिका युद्धाच्या पुन्हा भडका

इराण-अमेरिका संघर्षाच्या 88 व्या दिवशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शांतता करार लवकर होण्याचा दावा केला आहे. मात्र अमेरिकन लष्कराने केलेल्या स्वसंरक्षणात्मक हवाई कारवाईनंतर इराणने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेची भूमिका वाईट हेतू आणि अविश्वासार्हता याचे प्रतीक असल्याचे इराणने म्हटले आहे.

कतारची राजधानी दोहा या ठिकाणी इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धबंदीसाठी उच्चस्तरीय राजनैतिक वाटाघाटी सुरू असतानाच अमेरिकन लष्कराने इराणी क्षेपणास्त्र प्रक्षेपण केंद्रावर आणि स्फोटके पेरणाऱ्या नौकांवर कारवाई केल्याचे स्पष्ट झाले आहे. तर अमेरिकेचे आधुनिक ड्रोन पाडल्याचा दावा इराणने केला आहे. त्यामुळे शांतता चर्चेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून तणाव कायम आहे.अमेरिकेने ही केलेली कारवाई म्हणजे शांतता करारावर आपले वर्चस्व राहावे आणि दबाव राहावा हा हेतू असावा असेही म्हटले जाते.

इराणची मागणी

कतारची राजधानी दोहा या ठिकाणी सुरू झालेल्या शांतता करारामध्ये कतारमध्ये गोठवून ठेवलेली इराणची सुमारे 12 अब्ज डॉलर्सची आर्थिक मालमत्ता मुक्त केली जावी आणि इस्रायलने लेबेनॉनमधील हिजबुल्लावरील हल्ले पूर्णपणे थांबवावेत ही इराणची मुख्य अट आहे. तर इराणने समृद्ध युरेनियमचा साठा मर्यादित करावा. तसेच पश्चिम आशियात दीर्घकालीन शांततेसाठी सौदी अरेबिया, कतार, जॉर्डन आणि तुर्की या देशानी अब्राहम करारात सामील व्हावे अशी भूमिका प्रमुख प्रशासनाने घेतली आहे.

अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांवर इराणने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. याचे सर्व परिणाम अमेरिकेलाच भोगावे लागतील, असा इशाराही दिला आहे. हे हल्ले युद्धविरामाचे उल्लंघन असल्याचे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले असून या आक्रमणाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही असेही स्पष्ट म्हटले आहे.इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर घालीबाप चर्चेच्या निमित्ताने कतार मध्ये गेले होते. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चर्चा योग्य दिशेने सुरू असल्याचे म्हटले होते. तथापि या नव्या हल्ल्यामुळे पुन्हा तणाव निर्माण झाला आहे.

Leave a comment