अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हेकेखोरपणाचा परिणाम सर्वात जास्त अमेरिकेला आणि इराणला भोगावे लागत आहेत. त्याचबरोबर आखाती देशातील या युद्धामुळे संपूर्ण जगाची कोंडी झालेली आहे. अमेरिका वारंवार इराणवर हल्ले करते. म्हणून इराणने होर्मुझ खाडीची नाकेबंदी केलेली आहे.त्याचा परिणाम तेलाच्या दरवाढीवर झाल्यामुळे अनेक देशात विशेषतः भारतात महागाईचा भडका उडाला आहे.
अमेरिकेने बुधवारी पहाटे इराण मधील अनेक लष्करी ठिकाणांवर हल्ले केले आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने बहरीन, कुवेत, आणि जॉर्डनच्या दिशेने हल्ले केल्याचा दावा केला आहे. या घडामोडीमुळे युद्धबंदीचे प्रयत्न धोक्यात आले असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला याची किंमत मोजावी लागेल असा इशारा दिला आहे. डोनाल्ड ट्रम्पच्या या आक्रमक आणि आडमुठी भूमिकेचा परिणाम अमेरिकेत त्यांना भोगावा लागणार आहे. त्यांच्याविरुद्ध वातावरण तापलेले आहे. तरीसुद्धा ट्रम्प यांच्या भूमिकेत बदल होत नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी संघर्ष काही दिवसात संपतात येऊ शकतो असे म्हटले होते.मात्र बुधवारी त्यांनी सामाजिक माध्यमांवरील संदेशात इराणवर टीका करत कठोर भूमिका घेतली.