मुले, शाळा आणि गृहपाठ/Children, school and homework

महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी काही महिन्यांपूर्वी मुलांना पुरेशी झोप मिळत नाही,याकडे राज्यशासन, शिक्षण विभाग आणि शिक्षक यांचे लक्ष वेधले आहे.याबाबत राज्यपालांनी दोन बाबींकडे लक्ष वेधून घेतले आहे 1.शाळांच्या वेळा
2. मुलांना दिला जाणारा अभ्यास(गृहपाठ)होय.

खरे तर मुलांच्या मानसिक स्थितीवर त्यांचा बौद्धिक, भावनिक आणि शारीरिक विकास अवलंबून असतो.म्हणूनच मुलांच्या मानसिक स्थितीवर कोणताही परिणाम होणार नाही,याचा विचार शासन, शिक्षण विभाग आणि शाळा स्तरावर झाला पाहिजे.

शाळांचे वेळापत्रक:

सकाळची शाळा म्हणजे मुलांच्या दृष्टीने आनंदाची पर्वणीच होय.योगा, कवायत करताना मुलांना आनंद वाटत असतो;पण सकाळच्या शाळेची जी वेळ आहे,ती वेळ पाहून मुलांच्या अंगावर काटा येतोय. ही वास्तवता नाकारून नाही चालत.सकाळी सातच्या शाळेला जाण्यासाठी मुलांना सहा पूर्वी अर्धवट झोपेतून उठावे लागते.प्रातर्विधी वेळेत उरकणे,अंघोळ करणे या साध्या साध्या गोष्टी आहेत ,पण त्या वेळेत उरकण्याचे टेन्शन मुलांना येत असते.त्यामुळे सकाळच्या शाळेच्या वेळेत थोडा बदल करणे आवश्यक आहे.हीच वेळ जर आठ वाजता केली तर मुलांना खूप आनंद होईलच.त्याचबरोबर मुलांच्या अनेक समस्या सुटतील.

दैनंदिन तासिकांतील कला, कार्यानुभव आणि शारीरिक शिक्षण या विषयांच्या तासिका बौद्धिक विषयांच्या तासिकांप्रमाणे नियमित होणे आवश्यक आहे.त्याचबरोबर बौद्धिक विषयांच्या तासिका जर आनंददायी पद्धतीने झाल्या तर या तासिकांचाही मुलांना कंटाळा आणि तणाव येणार नाही.

व्यावसायिक शिक्षणाचा अभाव:

खरे तर मुलांना दुपारच्या सत्रात छोट्या छोट्या व्यावसायिक शिक्षणाची प्रात्यक्षिक स्वरूपात ओळख करून दिली पाहिजे. प्लंबिंग करणे,बांधकाम करणे,विद्युत उपकरणांची हाताळणी व दुरूस्ती,सायकल पंक्चर काढणे व दुरूस्ती,शेगडी दुरूस्ती व जोडणी,आकाश कंदील बनवणे,राख्या बनवणे, रंगकाम करणे,बागकाम करणे अशा कितीतरी छोट्या छोट्या उद्योगातून मुलांच्यात व्यावसायिक शिक्षणाची आवड निर्माण करता येते.असे कृतीशील शिक्षणच भविष्यात मुलांच्या उदरनिर्वाहाचे साधन बनू शकते.

गृहपाठ:

गृहपाठ हा अभ्यासाचा एक भाग आहे.दिवसभर मुले काय शिकलीत आणि ते त्यांना कितपत समजले,हे समजण्यासाठी मुलांना घरी अभ्यास दिला जातो.यालाच गृहपाठ असे म्हटले जाते. दिवसभर वेगवेगळ्या शिक्षकांनी वेगवेगळे विषय शिकवलेले असतात. म्हणूनच प्रत्येक शिक्षकाने इतर शिक्षकांनी अभ्यास दिला असेल हे लक्षात घेऊन मुलांना अभ्यास दिला तर त्यांना तणाव येणार नाही. दिलेला अभ्यास कितीही आव्हानात्मक असला तरी मुलांनी हे आव्हान आनंदाने स्वीकारले पाहिजे,हे महत्वाचे असते.कारण गृहपाठ हे मुलांसाठीच असतात. अनेक शाळांमध्ये एक शिक्षकी वर्ग असतात. म्हणजे एकच शिक्षक सगळे विषय शिकवतात. त्यांना मुलांना किती वेळ घरचा अभ्यास द्यावा हे निश्चित करणे सोपे जाते..

अतिरिक्त अभ्यास आणि गृहपाठ याची किती reaction येते ,याची जवळून मी अनेक उदाहरणे पाहिली आहेत. भरत गुरव हे टिकेवाडी, ता राधानगरी या गावचे माजी विद्यार्थी.सध्या ते शिक्षक आहेत. शालेय जीवनातील एक हुशार विद्यार्थी. इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास करताना दररोज सत्तावीस प्रश्नपत्रिका सोडवत असत.या ठिकाणी त्यांच्या मानसिकतेचा कुणीच विचार केला नाही. ते शिष्यवृत्तीधारक बनले,पण त्यांना या शिष्यवृत्ती परीक्षेचा तिटकारा आला की त्यांना आजही मुलांना शिष्यवृत्ती हा विषय शिकवण्यात अजिबात interest नाही.स्पर्धा परीक्षा हा मुलांच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे.त्यासाठी अतिरिक्त वेळ द्यावा लागतो.गेली चाळीस वर्षे मीही स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन केले आहे.पण स्पर्धा परीक्षेचा अतिरेक होता कामा नये.याचा काळजी शिक्षक आणि पालकांनी घेतली पाहिजे.

माझ्या एका विद्यार्थ्यांचा मांगोली, ता. राधानगरी येथील मित्र त्याला म्हणाला की,माझ्या आयुष्यातील बालपणाचा आनंद मी कधी घेतलाच नाही.मला एकच शिक्षक सात वर्षे होते ,त्यांनी आम्हाला क्रीडांगणावर कधीच नेले नाही. आम्हाला अक्षरश: पुस्तकी किडे बनवले होते. माझा विद्यार्थी प्रदीप पाटील त्याला म्हणाला की,आम्हाला सुद्धा सात वर्षे एकच गुरूजी होते आणि त्यांनी आम्हाला सर्व प्रकारचे खेळ, स्पर्धा,संगीत, नृत्य, असे सगळेच विषय आनंदाने शिकवले.आम्ही आमच्या बालपणावर खूश आहोत.ज्यांचे बालपण हरवले,त्यांना आता ते परत मिळणार नाही.

अलीकडे पालकांच्या अपेक्षाही खूप वाढल्या आहेत. पालकांच्या अपेक्षांचे ओझे मुलांना पेलवत नाही,तेव्हा मुलांमध्ये नैराश्य येते.त्याचे विपरीत परिणाम मुले आणि पालक यांना भोगावे लागतात. करिअरच्या नावाखाली मुलांचे बालपण भरडून जाऊ नये ,याची काळजी पालकांनी घेतली पाहिजे.

जेव्हा मुले आपले सुखदुःख पालकांशी आणि शिक्षकांशी शेअर करतात, मुलांची शैक्षणिक वाटचाल योग्य दिशेने चालू आहे ,असा निष्कर्ष काढण्यास हरकत नाही.

मुलांच्या आनंददायी शिक्षणासाठी मुले, शिक्षक आणि पालक यांना हा लेख समर्पित.

 

संभाजी पाटील

राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित मुख्याध्यापक, माजी शिक्षण विस्तार अधिकारी,राधानगरी.

Leave a comment