शिक्षक दिन विशेषांक / Teachers’ Day

माझ्या प्रवासातील सोबती

माझे आईवडील शेतकरी कुटुंबातील,कष्टाळू, समाजप्रिय आणि प्रामाणिक असे लाभल्यामुळे माझे व्यक्तिमत्त्व घडण्यासाठी बालपणीच या गोष्टींचा प्रभाव पडला होता.माझ्या कष्टाळू वडिलांनी आपल्या नऊ मुलांबरोबरच भावकीतील मुलांचेही संगोपन केले.उसाच्या घाण्यावर chief chemist (मुख्य गुळव्या) असलेल्या माझ्या बाबांचा सहवास मला अल्पकाळ लाभला. मी त्यांचा लाडका होतो.भल्या पहाटे नदीला, विहिरीला अंघोळीला सहा जण भावांपैकी मी एकटाच बाबांबरोबर कितीतरी वेळ गेलो आहे.बाबांची गावात आणि पंचक्रोशीत एक दयाळू व्यक्ती म्हणून ओळख होती . पंचक्रोशीतील मुलं गूळ खाण्यासाठी आमच्या घाण्यावर यायचे.

मी इयत्ता सातवीत असताना वडिलांचे छत्र हरपले आणि आमची सगळी जबाबदारी आईवर येऊन ठेपली.वडिलांच्या अकाली मृत्यूमुळे माझी आई डगमगली नाही.खंबीरपणे मुलांना सांभाळले.आम्ही भाऊ-भाऊ लहानपणी मित्रांसारखं एकत्र राहिलो.माझी आई बुद्धिमान होती.”पहिली-दुसरीत माझा पहिला नंबर आला होता”असं अभिमानाने आई मला सांगायची. आणि हा पहिला नंबरच माझ्या डोक्यात बसला.शालेय शिक्षणात आणि अखंड सेवेत मी पहिला नंबर कधी सोडला नाही. पहिली ते दहावीचा सेक्रेटरी म्हणून काम करत असताना अभ्यासात मागे असलेल्या मुलांना सुद्धा मी पुढे आणण्याचा प्रयत्न करत होतो.आईकडून करारीपणा, जबाबदारी पेलण्याची क्षमता, स्वाभिमान आणि बाणेदारपणा हे गुण घेतले असतील असे मला वाटते.अखंड आयुष्यभर मी या गुणांची साथ कधी सोडली नाही.आईच्या अखेरच्या टप्प्यात आईला मी सतत जवळ असावं असं वाटत होतं.माझ्या परीने मी आईची सेवा केली.आईचे केस विंचरले, आईला तेल लावले, अंघोळ घातली.” माझा मुलगा पण तूच आणि देव पण तूच”अशी माझी आई म्हणायची, तेव्हा ऊर भरून यायचा.याहून मोठा पुरस्कार जगात नाही.मला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला, तेव्हा आई म्हणाली,”मला माहित होते,तू नक्कीच काहीतरी वेगळं करशील” आईच्या मुखातील शब्द म्हणजे कृष्णाचं तत्त्वज्ञान आहे असं मला जाणवायचं.

माझ्या प्राथमिक, माध्यमिक शालेय जीवनात अनेक शिक्षकांनी माझ्यावर भरभरून प्रेम केले.मी सर्वांचा लाडका होतो.बहुजन समाजातील शेतकरी कुटुंबातील एक मुलगा top first याचा सर्व शिक्षकांना अभिमान वाटायचा. या सर्व गुरूजनांचा नामोल्लेख करणे इथे अशक्य असले तरी शालेय आणि शिक्षकी जीवनात सर्वात आदरणीय आणि माझे प्रेरणास्रोत राहिले ते माझे गुरूवर्य राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित सी धों पाटील होय.अत्यंत कष्टाळू, हरहुन्नरी, चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व… त्यांनीच मला लेखन क्षेत्राकडे वळवले.माझे पहिले पुस्तक मी त्यांना अर्पण केले.

दहावीनंतर झटपट नोकरी लागते म्हणून माझे ज्येष्ठ बंधू कुंडलिक पाटील यांनी मला डी एड् ला पाठवले.हे खूप चांगले झाले असे आज मला वाटते.डी एड् ला मला अनेक चांगले मित्र मैत्रिणी मिळाल्या.त्यांच्या सहवासात दोन वर्षे भुर्रकन उडून गेली.पुढे माझे एम एड् पर्यंतचे शिक्षण गारगोटीत पूर्ण झाले.बी ए च्या दुसऱ्या वर्षी असताना मला नोकरीची ऑर्डर आली.कशाला एवढ्या लवकर (विसाव्या वर्षी)ऑर्डर आली असेल? असं मला त्यावेळी वाटलं.नोकरी स्वीकारली;शिक्षणात खंड पडू दिला नाही.

१६ जानेवारी १९८६ ला मी पंचायत समिती राधानगरी येथे आणि २५ जानेवारीला विद्या मंदिर चांदे येथे हजर झालो.माझ्या पहिली शाळा.चांद्याजवळच कोते हे माझ्या पैपाहुण्यांचे गाव होते. माझी मंजिरी आजी तिथलीच.आमच्या आत्यांचे नातू भिकाजी पाटील यांच्या घरी मी काही दिवस राहिलो.सुनील बरोबर पिठाच्या गिरणीत मुक्काम केला.मला पैपाहुण्यांच्या गावात राहायचे नव्हतं, म्हणून भिकाजी पाटील यांनी चांद्यात खोली बघायला सुरुवात केली;पण कोणीच खोली दिली नाही.तोच अनुभव धामोडात.. अखेर हायस्कूलचे शिक्षक टी डी पाटील यांच्या खोलीत घर मालक बाबुराव साबणे यांना विनवणी करून मला ठेवले.त्यांना पाच मुली असल्यामुळे तेही तयार नव्हते.सहा महिन्यांनी माझा पूर्ण स्वभाव कळला, तेव्हा मात्र त्यांना अश्रू अनावर झाले.एका चांगल्या माणसावर आम्ही विश्वास दाखवत नव्हतो,याची खंत त्यांनी बोलून दाखवली. चांदेकर सुद्धा मला नंतर आग्रह करू लागले;पण मी धामोडातच राहण्याचा निर्णय घेतला.चांद्यातील दिवस भुर्रकन निघून जात होते.माझी पहिलीवहिली शाळा असल्याने मी या शाळेतून बरेच काही शिकलो.या शाळेने मला अनेक गुणी विद्यार्थी दिले.त्यांतील अनेक विद्यार्थी आजही संपर्कात आहेत.डिसेंबर ८७ ला माझ्या बदलीचा आदेश आला आणि मुलें चलबिचल झाली.आता गुरूजी कधी भेटणार नाहीत, म्हणून गावातून चहा बिस्किटे शाळेत येऊ लागली.माझ्या शिक्षक स्टाफला सुद्धा आश्चर्य वाटले. माझ्याकडून दर महिन्याला दोन रुपये उसणे घेणारे मरळकर गुरूजी म्हणाले, “पाटील, या गावात आम्हाला चहाचं पाणी कधी मिळालं नाही.आणि हे काय? कधी एवढं मुलांचं प्रेम मिळवलंत? खरंच,मुलांचा मी कधी लाडका झालो हे माझे मलाच कळले नाही.मुलांनी आणलेले जवळ जवळ ३५/४० मी शाळेतच कपाटात ठेवले आणि रोज माझी आठवण काढत बिस्किटे खायला सांगून मी चांद्यातून माझा गाशा गुंडाळला.बदलीनंतर कितीतरी वर्षे मुलं पत्रव्यवहार करून संपर्कात होती.आजही आहेत.

तत्कालीन सभापती ज्ञानदेव पाटील यांनी आपली सभापतीपदी निवड झाल्या झाल्या माझी बदली केली होती.विशेष म्हणजे मी त्यांना एकदाही बदलीसाठी भेटलो नव्हतो आणि त्यांनी सुद्धा ‘तुझी बदली केली म्हणून मला निरोप सुद्धा दिला नव्हता.असे होते पूर्वीचे राजकारण आणि समाजकारण….!

डिसेंबर १९८८ मध्ये मी सभापतींच्या गावी सोळांकूरला रूजू झालो.तेथेही मी लगेच रमलो.मुलांचा लाडका झालो. त्याच दरम्यान माझे गुरूजी राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित मुख्याध्यापक सी धों पाटील पोटतालुक्यात आले होते. त्यांनी मला बघताच ‘तू इथे कसा?’असा आश्चर्याने प्रश्न विचारला.मी म्हटले.बदली झाली.गुरूजी म्हणाले”,ते काही नाही,मी तुला पंडेवाडीला घेऊन जाणार.” आणि खरंच एक दिवस गुरूजी राधानगरीला गेले आणि माझी बदली ऑर्डर घेऊन आले.

मी मार्च १९८८मध्ये पंडेवाडीला दाखल झालो.मी प्राथमिक शाळेत शिकत असताना सात वर्षे रामराव चौगले गुरूजी आमच्यावर मुख्याध्यापक होते.ते पंडेवाडी गावचे.त्यांचाच पंडेवाडी गावावर वट होता.आणि शाळेत माझे गुरूजी मुख्याध्यापक..!इतर शिक्षकही बऱ्यापैकी माझे गुरूजी होते.सगळेजण मला संभा म्हणून हाक मारत होते.मुलेही संभागुरुजी म्हणू लागले.माझे गुरूजी मला पाचवीच्या वर्गात घेऊन गेले आणि म्हणाले,”हा बघ माझा वर्ग.व्हरांडा सुशोभीकरणामुळे माझे थोडे दुर्लक्ष झाले आहे;पण तू ते भरून काढशील.”

माझ्या गुरूजींचा माझ्याबद्दल केवढा हा विश्वास! त्या विश्वासाला मला तडा जाऊ द्यायचा नव्हता.गुरूजींच्या पंखाखाली माझे अध्यापन चालू झाले. त्याच वर्षी गुरूजींना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला होता.ऑगस्ट १९८८ मध्ये गुरूजींना दिल्लीला जाण्यासाठी सदिच्छा कार्यक्रम आयोजित केला होता.या सदिच्छा कार्यक्रमात विद्यार्थी म्हणून मला बोलायला संधी दिली होती;पण मी काही नीटसे बोलू शकलो नाही.कार्यक्रम संपल्यावर गुरूजी मला म्हणाले,” हे बघ ,तुला याच वाटेने पुढे जायचे आहे आणि माझ्यापेक्षाही उत्तम काम करून दाखवायचे आहे.”क्षणभर माझ्या अंगावर शहारे आले.लहानपणापासून ते मला पाहत होते.माझ्यात वर्गात शिकत असलेल्या त्यांच्या मुलाला मी नेहमीच over take करून पुढे जायचो,हे त्यांनी जवळून पाहिले आहे.गुरूजी दिल्लीला गेले.परत आल्यावर राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्या सोबतचे फोटो त्यांनी आम्हाला दाखवले.बरोबर तीस वर्षांनी त्याच वाटेने गेलो होतो.गुरूजींची तब्येत नाजूक होती.तरी सुद्धा मला भेटण्यासाठी ते खूप आतूर झाले होते.गुरूजींच्या मुलग्याने-माझ्या मित्राने मला फोन केला,’हे बघ.काका ऐकायला तयार नाहीत.आम्ही तुझा सत्कार करायला येतोय.”मी म्हटलं,”थांबा मीच गुरूजींचा आशीर्वाद घेण्यासाठी येत आहे”.

असेच एका कार्यक्रमात मला नीट भाषण करता येत नाही म्हणून माझ्यावर अप्रत्यक्ष टीका झाली. दुसऱ्याच संमेलनात नेमलेल्या विषयाची भरपूर तयारी करून खणखणीत भाषण केले.सर्वांना खूप आवडलं.तेव्हापासून भाषणाच्या बाबतीत मागे वळून पाहिले नाही.माझ्या गुरूजींची अचानक बोरवडे येथे बदली झाली आणि अनेक जबाबदाऱ्या माझ्यावर येऊन पडल्या.

पंडेवाडी गावात माझी सर्वात जास्त सेवा झाली.भरपूर विद्यार्थी माझ्या हाताखालून गेले.माझ्या पहिल्या सातवीच्या बॅचच्या वेळी तर मी रात्रंदिवस शाळेतच होतो.एक दिवस तर असा आला होता,की इकडे तमाशा सुरू आणि इकडे माझी अभ्यासिका..! सुमारे साठ विद्यार्थी या बॅचमध्ये होते. त्यावेळी केंद्र परीक्षा होती.या परीक्षेत सर्व मुलांनी घवघवीत यश संपादन केले.१००% निकाल लागला.माझी दुसरी बॅच गुणवान होती.सर्व मुलांची अक्षरे पहिलीतच मोत्यासारखी होती.अभ्यास, आरोग्य, स्वच्छता,खेळ, संगीत, वक्तृत्व, चांगल्या सवयी मुलांच्या अगदी अंगी भिनल्या होत्या. त्या सवयींचे पालन आजही ही मुले त्यांच्या दैनंदिन जीवनात करतात. अशीच आणखी एक पाचवी ते सातवी ची बॅच हाताखालून गेली.पंडेवाडी गावाने माझ्यावर भरभरून प्रेम केले.

पंडेवाडी गावातून माझी बदली सावर्डे पाटणकर या माझ्या जन्मगावी डिसेंबर२००२मध्ये झाली. मला माझ्या गावासाठी काहीतरी करायचे होते.ती संधी मिळाली होती.मला सहावीचा वर्ग मिळाला. माझ्या गावात शिष्यवृत्तीची परंपरा खंडित झाली होती.ती मी आल्या आल्या सुरू केली.वर्गात फरशी नव्हती.’एक वर्ग -एक देणगीदार ‘हा उपक्रम हाती घेतला आणि संपूर्ण शाळेला देणगीदार मिळवून फरशी बसवण्याचे काम मी स्वतः केले. मुलांच्यात शैक्षणिक वातावरण निर्माण झाले.तालुक्यात पहिलीचा पहिला डिजिटल वर्ग तयार केला.गावाला निर्मल ग्राम हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.गाव स्वच्छ, सुंदर करण्यासाठी मी स्वतः रिंगणात उतरलो होतो.माझ्या गावचे सर्व शिक्षक महिला यांनी चांगली साथ दिली.त्यामुळेच हा पुरस्कार मिळाला.या चळवळीचे नेतृत्व माझ्याकडे होते,याचा मला सार्थ अभिमान आहे. गावासाठी भव्य क्रीडांगण असावे अशी माझी इच्छा खूप वर्षांपासून होती.गावातील सर्व शिक्षक, देणगीदार, ट्रॅक्टर मालक, ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने देवळाच्या माळावर भव्य क्रीडांगण उभारले गेले.त्याचे उद्घाटन माझ्या हस्ते झाले होते.

सावर्डे पाटणकर गावातून माझी पदोन्नतीने बुजवडे या छोट्याशा गावात पदवीधर अध्यापक म्हणून बदली झाली.या गावात शिष्यवृत्तीची परंपरा निर्माण केली,’एक व्यक्ती एक बेंच’या उपक्रमाला गावकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.शिवाय इंग्रजी पाठांतराचा अनोखा उपक्रम इथेच यशस्वी झाला.बुजवडे गावात मी सात वर्षे सेवा केली.

बुजवडे नंतर उंदरवाडी ता कागल येथे माझी प्रशासकीय बदली झाली.शाळेत प्रचंड समस्या होत्या.आव्हानात्मक काम होते.इथेही शिष्यवृत्तीबरोबरच , Brushing Day सारखे नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले.संगीत, प्रश्नमंजुषा क्रीडा क्षेत्रात शाळा तालुक्यात, जिल्ह्यात चमकली. या शाळेत घेतलेल्या माझ्या उपक्रमांवर आधारित लिहिलेला लेख जिल्हा परिषद कोल्हापूरच्या ‘पावनखिंड’ मासिकात प्रकाशित झाला होता. येथेही शिक्षक, मुख्याध्यापक, ग्रामस्थ यांनी मला खूप सहकार्य केले.

उंदरवाडीच्या साडेतीन वर्षांच्या प्रवासातून माझी बदली थेट दाजीपूर अभयारण्यात झाली.दोन महिन्यातच तेथील केंद्र मुख्याध्यापिका आकस्मिक वापरल्यामुळे तो चार्ज माझ्याकडे आला. केंद्र मुख्याध्यापक चार्ज सांभाळून वर्गाचे काम मी आवडीने करत होतो.दाजीपूरच्या मुलांच्यात शिक्षणाची आस निर्माण करण्यात मी यशस्वी झालो होतो. तेथील माझे विद्यार्थी आज उच्च शिक्षण घेत आहेत.या शाळेत आणि केंद्रात सुद्धा केंद्रातील सर्व शिक्षकांच्या कलागुणांचा योग्य उपयोग करून अनेक उपक्रम राबविले.केंद्रात चैतन्य निर्माण झाले.आठवडी बाजार,शहर दर्शन, शैक्षणिक सहल, भटकंती, सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध उपक्रमांतून मुलांच्यात शिक्षणाची आवड निर्माण झाली होती.या उपक्रमावर आधारित माझा एक सुंदर लेख महाराष्ट्र शासनाच्या जीवन शिक्षण मासिकात प्रकाशित झाला आहे.

मी दाजीपूरला असतानाच शिक्षकांच्या जीवनातील सर्वोच्च मानला जाणारा भारत सरकारतर्फे दिला जाणारा असा राष्ट्रपती पुरस्कार मला मिळाला. माझा आनंद द्विगुणित झाला.माझे कुटुंबीय, विद्यार्थी, मित्र, पालक, ग्रामस्थ या सर्वांनाच हा सुखद धक्का मिळाला.दाजीपूरच्या अभयारण्यात सुद्धा आनंदाचे वातावरण पसरले.ओलवण-दाजीपूर ग्रामपंचायतने प्रथमच कुणाच्या तरी सत्काराचे नियोजन केले होते.

माझा दाजीपूरचा कार्यकाल संपला आणि पुन्हा सावर्डे पाटणकर येथे बदली झाली.अगदी अल्प काळात लाठीकाठीसारखा उपक्रम हाती घेतला आणि गावात पुन्हा चैतन्य निर्माण झाले. इथे असतानाच गावच्या क्रीडांगण सपाटीकरण कामाचे उद्घाटन माझ्या हस्ते झाले. आज देवळाच्या माळावर भव्य क्रीडांगण दिसत आहे.

तिटवे ही माझ्या सेवेतील शेवटची शाळा! या शाळेत मी एक आव्हान म्हणून मुख्याध्यापक पदाची पदोन्नती स्वीकारली.त्यावेळी तिटवे शाळेत कार्यरत असलेल्या शाळा व्यवस्थापन समितीने तिटवे शाळा स्वीकारण्यासाठी आग्रह धरलेला होता.शाळेच्या अनेक समस्या होत्या.शिक्षकांना खंबीर नेतृत्वाची आणि आधाराची गरज होती.शिक्षणासंबंधी पालकांच्या सुद्धा अपेक्षा उंचावल्या होत्या.मला खात्री होती, की मी या गावात उत्तम काम करू शकतो.शिक्षकांना ठणकावून सांगितले, ‘तुम्हाला वर्गपातळीवर,शाळा पातळीवर विद्यार्थ्यांच्या हिताचा कोणताही उपक्रम हाती घेतला तर त्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य असेल.उपक्रमांबद्दल कोणत्याही पालकांची तक्रार असेल तर माझ्याकडे बोट दाखवा.’ मी स्वतः इंग्रजी, विज्ञान मराठी हे विषय शिकवू लागलो.खेळ व शालेय उपक्रमात सहभाग घेऊ लागलो. शाळा आनंददायी वाटण्यासाठी लाठी काठी, योगा, मल्लखांब, लेझीम, नृत्य,फूड फेस्टिवल,ट्रॅडिशनल डे, कुस्ती ,खेळ अशा अनेक स्पर्धांमध्ये आणि उपक्रमात मुले गुंतून राहू लागली.त्याचबरोबर प्रज्ञाशोध परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, प्रश्नमंजुषा, विज्ञान प्रदर्शन,एन एम एम एस इत्यादी स्पर्धांमध्ये दरवर्षी मुले चमकू लागली. शाळेच्या प्रवेश द्वाराजवळ गुणवंत मुलांचे बोर्ड लागू लागले.शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत यांच्यामार्फत दरवर्षी शिक्षकांचे कौतुक होऊ लागले.शाळेबद्दल पालक प्रथमच चांगले बोलू लागले.

पालकांचे शाळेवर, मुलांवर नितांत प्रेम.आता शिक्षकांबद्दल सुद्धा आदर निर्माण झाला. शाळेच्या यशाची आणि चर्चा तालुका, जिल्हा पातळीवर होऊ लागली.रश्मीज् स्माईल ट्रस्टच्या माध्यमातून शाळेला स्मार्ट बोर्ड मिळाला. इंटरनेट कनेक्शन असणारी तालुक्यातील पहिली शाळा हा बहुमान पटकावला.याच ट्रस्टच्या माध्यमातून अंगणवाड्यांना सुद्धा भरपूर साहित्य मिळवून दिले. विद्या मंदिर तिटवे शाळा ही माझी शाळा आहे या भावनेने काम करत गेलो.म्हणूनच आज विद्या मंदिर तिटवे शाळा तालुक्यात सर्वोच्च स्थानावर आहे.पालक , शाळा व्यवस्थापन समिती ग्रामपंचायत, ग्रामस्थ यांचे सहकार्य नेहमीच लाभले. सध्या मी तिटवे शाळेतून सेवानिवृत्त होत आहे;पण माझ्या प्रिय विद्यार्थी-विद्यार्थिनींना,पालकांना, शाळा व्यवस्थापन समिती ग्रामपंचायत यांना मी सेवानिवृत्त होऊच नये असे वाटत आहे . आजही सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत मुले शाळेतून बाहेर पडत नाहीत.शाळेत रेंगाळत असतात.तिटवे शाळेत उभा केलेला गुणवत्तेचा डोंगर पाहून माजी साहाय्यक शिक्षण संचालक संपत गायकवाड साहेब हे माझे फॅन बनले आहेत,याहून मोठे ते काय बक्षीस..!

आता माझ्या प्रवासातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती सदासर्वदा आनंदात,दु:खात, कठीण प्रसंगात,आजारपणात, आईवडिलांनंतर खंबीरपणे साथ देणाऱ्या माझ्या प्रिय सखीबद्दल लिहिलं नाही, तर सर्वार्थाने माझा प्रवास अपूर्ण असल्यासारखा वाटेल.

मी नेहमी निरोगी, आनंदी, ताजेतवाने राहतो,ते माझ्या पत्नीमुळे.तिच्याइतके मला कुणीही सहन केले नाही.माझा बहुतांश वेळ शाळेत असताना मुलांची जबाबदारी तिनेच सांभाळली.सकाळी लवकर उठून रोज नऊ वाजता जेवण बनवून मला लवकर शाळेला पाठवण्याची जबाबदारी  तिनेच खंबीरपणे उचलली.हे एक दोन दिवस नाही. तब्बल बत्तीस वर्षे..!!!!! कधी कधी दुखलेखुपले तरी ती निमुटपणे सहन करायची.शाळा चुकवून कधीच दवाखाना किंवा शॉपिंगला जाण्याचा आग्रह तिने धरला नाही.माझ्या स्वतःच्या मुलांपेक्षाही मी माझ्या शाळेतील मुलांसाठी अधिक वेळ दिला.तरीही तिने आणि मुलांनीही कूरकूर केली नाही.

दहा वर्षापूर्वी माझी अचानक बीपी वाढली आणि तिचे रूपांतर पॅनिक ॲटॅकमध्ये झाले.मला काहीतरी गंभीर आजार झाला आहे, हे भूत माझ्या मानगुटीवर बसले होते.ते भूत काढणे एम डी डॉक्टर्सना शक्य झाले नाही;पण माझ्या पत्नीने ते कलाकलाने पळवून लावले.

आणखी एक तिचा महत्त्वाचा गुण म्हणजे आपण कितीही यातना सहन करेल;पण नवऱ्याच्या स्वाभिमानाला कोणी धक्का जरी लावला, तरी ती कदापिही सहन करणार नाही.जे मानसशास्त्रज्ञांना जमणार नाही ते काम माझी पत्नी माझ्या सहवासात राहून शिकली होती.माझ्या चेहऱ्यावरील भाव ओळखून मनात काय घालमेल चालली आहे हे केवळ तीच ओळखू शकते.माझी फॅमिली डॉक्टर तीच आहे.म्हणूनच सगळे मला चिरतरूण म्हणतात.मुलांच्या वाट्याला मी फारसे आलो नाही, म्हणूनच स्मरणिकेत लेख लिहिताना शुभम मला म्हणाला,” पप्पा मी काय लिहू?” माझ्या संपूर्ण कुटुंबाच्या त्यागातूनच माझा शैक्षणिक प्रवास एक इतिहास बनला.

२००३ साली मी माझ्या पत्नीला पुस्तक लिहिण्याची इच्छा बोलून दाखवली.घरबांधणीमुळे आर्थिक परिस्थिती नाजूक होती.त्यावेळी स्वतःच पुस्तक छापून वितरण करावे लागायचे.माझ्याकडे पैसे नव्हते, तर या पट्टीने आपल्या गळ्यातील नेकलेस काढून मला दिला आणि तो विकून पुस्तक छापायला सांगितले.असाच दुसरा एक प्रसंग..मी म्हटलं, ‘राष्ट्रपती पुरस्कारासाठी प्रस्ताव दाखल करण्याचा सगळेच आग्रह धरत आहेत.सर्व documents तयार करायला किमान पाच हजार रुपये खर्च येतील . तुझं काय मत आहे?’ सगळे म्हणतात तर तुम्ही प्रस्ताव दाखल करा.पुन्हा आयुष्यभर प्रस्ताव दाखल केला नाही म्हणून चुटपुट लागायला नको.’ मी प्रस्ताव दाखल केला.ज्या दिवशी मला पुरस्कार मिळाला ही बातमी समजली, हे ऐकून आनंदाच्या भरात ही सरळ जेवली सुद्धा नाही .

शेवटी मी एवढंच म्हणेन, की माझ्या संपूर्ण प्रवासातील ती एक समिधा आहे. नावाप्रमाणेच शारदा आहे.

कर्तृत्वसंपन्न माणसाच्या इतिहासाचे जेव्हा अवलोकन केले जाते, तेव्हा गांधीजीनंतर पुढं काय? हा प्रश्न निर्माण होतोच.स्वाती आणि शुभम ही माझी दोन्ही मुले सद्गुणी आहेत.ती well settled आहेत. यांत मी समाधानी आहे; पण केवळ well settled असणं महत्त्वाचं नसतं, तर आईवडिलांप्रती , कुटुंबातील प्रत्येक घटकांप्रती तुमचे असणारे प्रेम,आदर, निष्ठा, समाजाप्रती तुमची असणारी भूमिका,त्याग यावरून तुमची प्रतिष्ठा ठरत असते.आणि या कसोट्यांवर उतरण्यास माझी दोन्ही मुले पात्र आहेत. मुलगा शुभम LIC मध्ये वर्ग 2 च्या पदावर रूजू झाला होता.आता तो अंतर्गत परीक्षा देऊन वर्ग १ची फेलोशिप घेत आहे.

माझा जावई तुषार हा अत्यंत मनमिळाऊ प्रेमळ मैत्रिपूर्ण स्वभावाचा आहे.तोही स्पष्टवक्ता आहे.माझ्या मुलीची आमच्या पेक्षाही अधिक काळजी घेतो.आपण IIT M.Tec.आहे ,याचा काडीभर सुद्धा चेहऱ्यावर गर्व नसतो. स्वतः साठी सगळेच जगतात,पण दुसऱ्यासाठी जगणारे काही थोडेच असतात.त्यांतीलंच एक माझी सून -स्नेहल आहे.कुटुंबात राहून मला करिअर करायचं आहे,ही भूमिका घेऊन तिने जॉब सोडला आणि share marketing क्षेत्रात करिअर करायचा तिने विडा उचलला आहे. या क्षेत्रातील तिचे ज्ञान पाहता,तिचे आर्थिक भविष्य उज्ज्वल आहे.कौटुंबिक relationship जपण्यात माझी सून बावनकशी सोने आहे.

वयाच्या अठ्ठावन्नाव्या वर्षी प्रत्येक सरकारी कर्मचारी सेना निवृत्त होत असतो.मी ठरवलं असतं, तर आणखी दोन वर्षे वाढीव मिळाली असती.तसा भारत सरकारने आम्हाला दिलेल्या facilities for awardee teachers या पत्रात उल्लेख आहे; पण माझ्या संपूर्ण कुटुंबाने या वाढीव दोन वर्षांना विरोध केला.”आता आमच्यासाठी जगा.आम्हाला तुमचा सहवास हवा आहे.” या कुटुंबाने दिलेल्या हाकेला मी होकार दिला आणि सेवेला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला.

माझे व्यक्तिमत्त्व घडण्यासाठी,उच्चतम काम करण्यासाठी शेकडो लोकांचे हातभार लाभले आहेत. त्यामुळे माझ्या या लेखात कुणाचाही नामोल्लेख करून मला पक्षपात करायचा नाही.सदासर्वकाळ माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मंडळींना धन्यवाद.

संभाजी पाटील

राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित

Leave a comment