Birth of Buddha- Part 4

बु‌द्धाचा जन्म – भाग 4

शाक्य राजा शुद्धोदन आणि त्याची पहिली पत्नी महामाया यांच्या पोटी सिद्धार्थ गौतमाचा जन्म वैशाख शुद्ध पौर्णिमेला इ.स. पूर्व 563 मध्ये लुंबिनी वनात झाला. त्याची कथा अशी —-

शाक्य राजपरंपरेत आषाढ महिन्यात एक उत्सव साजरा करण्याची परंपरा होती. हा परंपरागत उत्सव थाटामाटात साजरा करण्याची परंपरा होती. हा उत्सव नेमका कोणता होता ? याबाबत फारशी माहिती मिळत नाही; तरी पण या उत्सवानंतर शाक्य स्त्रिया आपल्या पतीसह शयन गृहात जाऊन समागम करत. या प्रथेप्रमाणे महामाया आणि राजा शुद्धोदन हे सात दिवसांचा उत्सव संपल्यानंतर समागमास गेले. या घटनेनंतर कित्येक वर्षे अपत्य नसलेल्या महामायाला दिवस गेले. मिलनाच्या गाढ निद्रेत असतानाच महामायाला एक सुंदर स्वप्न पडले. या स्वप्नात एक सुमेध नावाचा बोधिसत्व आला आणि मी तुझ्या पोटी जन्म घेणार असल्याचे सांगितले. सुमेध म्हणजे बु‌द्धिमान. दुसऱ्या दिवशी सकाळी महामायेने हे स्वप्न शुद्धोद‌नाला सांगितले. शुद्धोद‌नाने स्वप्नविद्येत पारंगत असलेल्या आठ ज्योतिषांना बोलावून घेतले आणि या स्वप्नाचा खल (अर्थ) काय असेल ? हे विचारले सर्व ज्योतिषांनी चर्चा करुन
राजाला त्या स्वप्नाचा अर्थ असा सांगितला –

“हे राजन, चिंता करण्याचे काही कारण नाही. तुमचा पुत्र कीर्तिवंत होईल. तुमचा पुत्र संसारात रमला तर तो सार्वभौम सम्राट होईल. संसारात रमला नाही तर संसाराचा त्याग करून संन्यासी होईल.संपूर्ण विश्वाचा अंधकार नाहीसा करणारा बुद्ध (बु‌द्धिमान) होईल” .

राजाला स्वप्नाचा अर्थ समजल्यामुळे आनंदही झाला आणि मनात उदासपणाही वाटू लागला. राजाला स्वप्नाचा पहिला अर्थ खरा व्हावा असे वाटू लागले. आपला मुलगा संन्यासी होऊ नये, तो सम्राट व्हावा असे राजाला वाटू लागले. महामायेला मात्र आपला मुलगा कीर्तिवंत होणार याचा तिला आनंद वाटत होता. बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महामाया गरोदर राहिली होती . याचा तिला खूप आनंद झाला होता. राजाने ज्योतिषांना भरपूर दक्षिणा दिली. राणीने अन्नदान केले. राजघराण्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. जसजसे राणीचे दिवस भरत गेले, तसतशी राणीला माहेरची ओढ निर्माण झाली. तिने आपली इच्छा राजा शुद्धोदनाला बोलून दाखवली. राजाने लगेच होकार दिला आणि राणी म‌हामायेला पालखीत बसवून लवाजम्यासह तिच्या माहेरी म्हणजे देवदहनगरीला पाठवले. कपिलवस्तु ते देवद‌ह नगरी यांच्या दरम्यान एक घनदाट वन लागत होते. या वनाचे नाव होते लुंबिनी. महामायेच्या रथाने वनात प्रवेश करताच महामाया मोहरून गेली. जंगलातील स्वच्छ हवा, झाडे, वेली, फुले, फळे पाहून ती अधिकच उत्साही झाली. जणू काही जन्माला येणारे बालक वनप्रिय असे असेल! पक्ष्यांचा मंजूळ स्वर महामायेला खुणवू लागला. रंगीबेरंगी फुलझाडे पाहून ती अधिकच प्रफुल्लित झाली. तिला असे वाटू लागले की काही वेळ आपण या सुंदर वनात घालवावेत. येथे थोडा वेळ बागडावे. तिने पालखी वाहणाऱ्या सेवकांना पालखी थांबवण्याची आज्ञा दिली. पालखी थांबली. महामाया पालखीतून खाली उतरली. सेवक दूर जाऊन थांबले आणि महामाया शालवृक्षाखाली बागडू लागली. शालवृक्ष म्हणजे साल जातीचे वृक्ष. वाऱ्याच्या झुळकाने प्रफुल्लित झालेल्या महामायेला शाल वृक्षाची फांदी पकडण्याचा मोह झाला. तिने फांदी पकडल्यावर हेलकावे देऊन ती किंचित वर गेली. महामाया जमिनीपासून किंचित अंतराळी लोंबकळू लागली. या हालचालीमुळे तिला प्रसवाच्या कळा सुटल्या. त्याच अवस्थेत तिने उभ्या उभ्याच बाळाला जन्म दिला. महान तपस्वी, विचार प्रवर्तक, आभासी दैववादी, काल्पनिक शक्तींना झिडकारून नवा विचार ,नवा धम्म जगासमोर मांडणाऱ्या सिद्धार्थ गौतमाचा जन्म अशा प्रकारे लुंबिनी वनात शालवृक्षांच्या सानिध्यात झाला. त्यावेळी वैशाख महिन्यातील पौर्णिमेचा दिवस होता. अर्थातच बुद्धाचा जन्म दिवसा झाला. ख्रिस्त पूर्व 563 मध्ये.

बऱ्याच वर्षाच्या प्रतीक्षेनेतर महामाया आणि शुद्‌धोदन योना पुत्र झाला होता. त्यामुळे राजवाड्यात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. दानधर्म करण्यात आला, कपिलवस्तु नगरीत आनंदी आनंद झाला!

Leave a comment