राजमाची किल्ला / Rajmachi fort

राजमाची हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. लोणावळा- खंडाळा डोंगररांगेत वसलेला हा किल्ला उल्हास नदीच्या खोऱ्यात आहे. मुंबई- पुणे महामार्गावर खोपोली व लोणावळा दरम्यान ‘राजमाची’ किल्ला अगदी सहज नजरेत भरतो. भारत सरकारने या किल्ल्याला २६ एप्रिल १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षक स्मारक’ म्हणून घोषित केले. आता आपण या किल्ल्याची माहिती घेणार आहोत.

किल्ल्याचे नाव : राजमाची

किल्ल्याचा प्रकार : गिरिदुर्ग

समुद्रसपाटीपासून उंची : सुमारे 650 मीटर ( 2145 फूट)

डोंगररांग : लोणावळा-खंडाळा, सह्याद्री

चढाईची श्रेणी : मध्यम.

जवळचे गाव : लोणावळा-खंडाळा

लोणावळ्यापासून अंतर : 16 किलोमीटर

जिल्हा : पुणे.

राजमाचीला कसे जाल ?How to go to rajmachi?

पुण्याहून लोणावळा 65 किलोमीटर आहे. लोणावळ्याहून राजमाचीला जावे लागते. लोणावळा ते राजमाची अंतर 16 किलोमीटर आहे. या वाटेने गडावर जाण्यास चार-पाच तास लागतात.

कर्जतहून कोंदिवडेमार्गे राजमाचीवर जाता येते. कोंदिवडेपर्यंत बसने जाता येते. कोंदिवडेहून गडावर जाण्यास तीन-चार तास लागतात.

इतिहास:History

राजमाची किल्ल्याच्या पश्चिम उतारावर एक बौद्ध लेणं आहे. हे लेणं रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोंढाणे गावापासून 2 किलोमीटर अंतरावर आहे. म्हणून या लेण्याला ‘कोंढाणे लेणे’ असे म्हणतात. ही लेणी ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकात म्हणजे सातवाहन राजवटीच्या काळात खोदलेली आहेत. अखंड दगडात कोरलेल्या वास्तुशिल्पाचा हा उत्कृष्ट नमुना आहे. या लेणीसमूहात एक चैत्यगृह व सात विहारांचा समावेश आहे. या लेण्यांची निर्मिती राजमाचीवर असणाऱ्या सत्तेच्या काळात झाली आहे.

कोंढाणे लेणे आणि राजमाची यांचा घनिष्ठ संबंध आहे. म्हणजेच राजमाची किल्ला 2500 वर्षांपूर्वी बांधला गेला असावा असे अनुमान निघते.

इ. स. 1657 मध्ये शिवरायांनी कल्याणवर स्वारी केली होती. त्याच वेळी पुणे आणि कल्याण विभागात असलेल्या बोरघाटावरील राजमाची, लोहगड, तुंग, तिकोना, विसापूर इत्यादी किल्ले स्वराज्यात सामील करून घेतले. त्यामुळे पुणे ते ठाणे परिसर स्वराज्यात आला.

राजमाची किल्ल्यास पूर्वी कोकणचा दरवाजा मानला जात असे. त्या काळी कोकणात उतरण्यासाठी राजमाची हाच पर्याय होता.

इ. स. 1713 मध्ये शाहू महाराजांनी ‘राजमाची’चा किल्ला कान्होजी आंग्रेला दिला. इ. स. 1730 मध्ये राजमाचीवर बाजीराव पेशव्यांनी वर्चस्व निर्माण केले. त्यानंतर बराच काळ हा किल्ला पेशवाईच्या ताब्यात राहिला.

पानिपतच्या लढाईनंतर बरीच उलथापालथ झाली. इ. स. 1776 मध्ये सदाशिवराव भाऊच्या रूपातील तोतयाने संपूर्ण कोकण प्रांत काबीज करीत बोरघाटापर्यंत मजल मारली. या तोतयाने राजमाची किल्ला सुद्धा घेतला. या तोतयाचे वर्चस्व वाढतच गेले होते; परंतु पेशव्यांनी राजमाचीवर हल्ला करून राजमाची पुन्हा आपल्या ताब्यात घेतला. हा किल्ला 1818 पर्यंत मराठ्यांच्या ताब्यात होता. इ. स. 1818 साली इंग्रजांनी मराठ्यांची सत्ता संपुष्टात आणली आणि राजमाची इंग्रजांच्या ताब्यात गेला.

गडावरील प्रेक्षणीय स्थळे :

लोणावळ्याहून तुंगार्लीमार्गे राजमाचीला येताना वाटेतच गावाच्या वेशीजवळ एक योद्ध्याचे स्मारक आहे. अर्धवट तुटलेली तटबंदी, दरवाजाचे अवशेष, गणपती आणि मारुतीची मूर्ती पाहायला मिळते.

उदयसागर तलाव :

पावसाळ्यात उदयसागर तलाव तुडुंब भरलेला असतो. तलावाच्या समोरील टेकडी उतरून खाली गेल्यावर समोरच एक मोठे पठार लागते. पावसाळ्यात दरीतून पडणारे सुंदर धबधबे येथून दिसतात. पावसाळ्यात येथील परिसरातील दृश्य अप्रतिम दिसते. डोळ्यांत साठवून ठेवता येणार नाही अशी अनेक निसर्गचित्रे डोळ्यांसमोर उभी राहतात.

मनरंजन :

राजमाचीवरील बालेकिल्ला ‘मनरंजन’ होय. उंचीने श्रीवर्धनपेक्षा लहान असणाऱ्या या बालेकिल्ल्यावर सहज जाता येते. अर्ध्या तासातच बालेकिल्ल्यावर पोहोचता येते. मनरंजनवर जाणारी वाट अगदी सोपी आहे. बालेकिल्ल्याचा दरवाजा गोमुखी आहे. किल्ल्यावर गेल्यावर उजवीकडच्या वाटेवर त्या काळातील किल्लेदारांच्या वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात. समोरच छप्पर उडालेले दगडी बांधकाम. या मंदिराच्या दरवाज्यावर गणेशाचे शिल्प कोरलेले आहे. येथे पाण्याच्या टाक्या आहेत. किल्ल्याची तटबंदी आजही काही ठिकाणी मजबूत असलेली दिसते.

श्रीवर्धन :

‘श्रीवर्धन’ हा राजमाचीवरील सर्वांत उंच असलेला दुसरा बालेकिल्ला होय. श्रीवर्धनची तटबंदी आणि बुरूज आजही बऱ्यापैकी सुस्थितीत आहेत. किल्ल्याला अनेक ठिकाणी दुहेरी तटबंदी असावी असे येथील अवशेषांवरून वाटते. दरवाजाच्याच बाजूला पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. किल्ल्यावर जाण्याच्या वाटेवरच एक गुहा आणि पाण्याचे टाके आहे. या गुहा म्हणजे दारूगोळ्याचे कोठार होत. बालेकिल्ल्याच्या माथ्यावर ध्वजस्तंभ आहे. समोरच ढाकबहिरीचा चित्तथरारक सुळका आहे. या सुळक्याच्या उजव्या बाजूला शिरोट्याचा नयनरम्य तलाव दिसतो.

शंकराचे मंदिर :

तलावाच्या पश्चिमेला शंकराचे मंदिर आहे. मंदिरासमोरील गोमुखातून समोरच्या टाक्यामध्ये पाणी पडते. सध्या ग्रामस्थांनी या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कार्य चालू आहे.

कातळदरा :

राजमाचीला पूर्व आणि दक्षिण दिशेला जी खोल दरी आहे तिला कातळदरा असे म्हणतात. याच दरीतून उल्हास नदी उगम पावते. या नदीच्या पश्चिमेकडे जो डोंगर आहे त्या डोंगराला ‘भैरव डोंगर’ असे म्हणतात.

राजमाची गडाची शान आणि शोभा म्हणजे ‘मनरंजन’ आणि ‘श्रीवर्धन’ हे दोन बालेकिल्ले होय. निसर्गसौंदर्याची उधळण या ठिकाणी पाहायला मिळते. या दोन बालेकिल्ल्यांच्या मध्ये एक सखल पट्टी आहे. तेथे भैरवनाथाचे मंदिर आहे. दिरासमोरच तीन दीपमाळा आहेत. लक्ष्मीची मूर्ती आहे. येथून डावीकडची वाट मनरंजन बालेकिल्ल्यावर जाते ;तर उजवीकडची वाट श्रीवर्धन बालेकिल्ल्यावर जाते.

राहण्याची व खाण्यापिण्याची व्यवस्था :

राजमाचीच्या जवळच असलेल्या उधेवाडी गावात राहता येते. राजमाचीवर असलेल्या भैरवनाथाच्या मंदिरात आणि बालेकिल्ल्यावर जाताना लागणाऱ्या मंदिरातही राहता येते. मुक्काम करताना रात्रीच्या वेळी हिंस्र प्राण्यांचा धोका असतो. त्याचीही काळजी घेतली पाहिजे. गडावर मुक्काम करायचा तर जेवणाचे साहित्य घेऊन जावे लागेल.

गडाच्या पायथ्याशी असलेल्या राजमाची गावात जेवणाची उत्तम सोय -. पाण्याची सोय आहे. गडावरही शुद्ध पाणी मिळू शकते.

Leave a comment