वेरुळची लेणी:- ELLORA CAVES

वेरुळ हे गाव बुद्ध‌कालीन लेण्यांसाठी प्रसिद्ध आहेच .त्याच बरोबर येथील कैलास मंदिर (शिवमंदिर) जगप्रसिद्‌ध आहे. शिवाय याच गावात असलेले घृष्णेश्वर मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाते. त्याची माहिती आपण प्रथम घेऊ.

वेरुळला कसे जाल? How to go Ellora?

छत्रपती संभाजीनगरहून वेरुळची लेणी 36 किमी अंतरावर आहेत. दौलताबाद-खुलदाबाद मार्गे गेल्यास वाटेत खुलदाबाद येथे औरंगजेबची समाधी लागते.

येवल्याहून वैजापूर मार्गे वेरुळला जाता येते. वेरुळ ते येवला अंतर 94 किमी आहे.

* कोपरगावाहून वैजापूर मार्गे वेरुळला जाता येते. कोपरगाव ते वेरुळ अंतर 98 किमी आहे.

वेरुळचे घृष्णेश्वर मंदिर: GHRUSHNESHWAR TEMPLE: ELLORA

वेरुळचे बाबाजी भोसले हे शिवाजी महाराज यांचे पणजोबा होय. बाबाजी भोसले यांच्याकडे वेरुळची पाटीलकी होती. त्यांच्यानंतर मालोजी भोसले यांच्याकडे वेरुळचे पाटीलकी आली. मालोजीना विठोजी हा एक भाऊ होता; तर शहाजीराजे हे पुत्र होते.शहाजीराजे यांना संभाजी, शिवाजी, व्यंकोजी असे तीन पुत्र होते.

इ.स. 1590 ते 1600 च्या आसपास घृष्णेश्वर मंदिराचा पहिला जीर्णोद्धार शिवरायांचे आजोबा मालोजीराजे यांनी केला. मंदिरात नित्यनेमाने पूजा-प्रार्थना सुरु केली.

इ.स. 1780 दशकात अहिल्याबाई होळकर यांनी वेरुळच्या घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. हे मंदिर सध्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे.

वेरुळची लेणी: ELLORA CAVES:

अजिंठा लेण्यांप्रमाणेच वेरुळची लेणी प्रसिद्ध आहेत. वेरुळची लेणी सुद्धा बौद्ध धर्माची लेणी म्हणून प्रसिद्ध आहेत. ही लेणी सर्वसाधारणपणे इ. स. 2 रे शतक ते 9 वे शतक या कालावधीत बांधली आहेत. येथे एकूण 34 लेणी आहेत. 34 लेण्यांपैकी 12 लेणी बौ‌द्ध धर्माची आहेत, 17 लेणी हिंदू धर्माची आहेत, तर 5 लेणी जैन धर्माची आहेत.त्याकाळी धर्माधर्मांमध्ये तेढ नव्हते, हे या विविध धर्मांच्या लेण्यांवरून सिद्ध होते.आता आपण या लेण्यांब‌द्दल माहिती घेऊया—–

लेणी क्र. 1 :-

ही बुद्ध कालीन खोदीव लेणी आहेत. यात 8 खाने आहेत. याठिकाणी बुद्ध भिक्षु राहत होते. इथे कोणत्याच देवी-देवतांची आकृती नाही.

लेणी क्र. 2:-

ही लेणी भरपूर कलात्मक असून यात बुद्ध आणि बुद्धिसत्वाच्या आकृत्या दर्शविलेल्या आहेत.त्यामध्ये नारी चित्र, तारा,तसेच बुद्धिसत्वाबरोबर दोन द्वारपाल लेण्याच्या मुख्य भिंतीजवळ आहेत.

यात कित्येक आकृत्या अपूर्ण आहेत. या वरुन कळते की दगडावर आकृत्या खोदण्याचे काम कसे सुरु केले जात होते आणि ते कसे पूर्ण केले जात होते.

लेणी क्र. 3 व 4 :-

यांतील लेणी जवळ जवळ लेणी क्र. 2 सारख्या असून साधारण आहेत. लेणी क्र. 4 दोन मजली आहे. बुद्ध, देवी देवतांच्या सुंदर आकृत्या येथे आहेत. याचा समोरील मुख्य भाग उध्वस्त झालेला आहे.

लेणी क्र. 5 :-

या लेणीस महालवाडा आणि थेरावाडा लेणी असे म्हणतात. याचे क्षेत्रफळ 27 मी×. 28 मी. असे आहे. याच्या आकारावरुन समजते की भिक्षु यास शिक्षण कक्ष किंवा भोजन कक्ष म्हणून याचा उपयोग करीत असावेत. अगदी आत गेल्यावर एक मंदिर लागते. तेथे बुद्धाची धर्मचक्र मुद्रेत एक मूर्ती आहे. व अवलोकतेश्वर दोरा धरुन झोका देत आहे.

लेणी क्र. 6 :-

हे एक “विहार” आहे. परंतु इतर विहारापेक्षा भिन्न आहे. याची भिन्नता (वेगळेपणा) असे आहे की, यात हिंदु देवी डाव्या बाजूच्या भिंतीवर दर्शविलेली आहे. बुद्ध धर्मात या देवीस “महामयुरी” असे सम्बोधतात. या शिवाय बुद्धिसत्वाच्या, तारा, अवलोकतेश्वर, मंजू आणि धन देवता जामकला यांच्या आकृत्या आहेत. या मंदिराच्या प्रवेशद्वारावर नदीच्या देवता गंगा आणि यमुना सुद्धा आहेत.

लेणी क्र. 7 व 8 :-

ही लेणी अपूर्ण असून यात विशेष असे काही नाही.

लेणी क्र. 9:-


या लेण्याचा दर्शनी भाग सुंदर रीतीने सजविलेला आहे. “चैत्या” च्या रांगेने व खिडक्या बाणाच्या आकृत्यांनी जोडलेल्या दर्शविलेले आहे.

समोरील भागावर ताराची आकृती आहे. तिच्या सोबत 6 भय प्रगट करणारे दृश्ये आहेत.त्यांतील साप, तलवार, हत्ती आणि अग्नि येवढेच ओळखले जातात. या लेणीकडे जाण्यासाठी लेणी क्र. सहाच्या उत्तरेकडील भिंतीपासून एक रस्ता आहे.

लेणी क्र. 10 :-

हे “चैत्य” आहे. भारतात बुध्द धर्माच्या शेवटच्या काळातील पूजा स्थान होते .हे हिंदु देवता विश्वकर्माच्या वास्तु कलेच्या अनुसार बनविलेले आहे. ह्या लेण्यांची सजावट छान आहे. ह्याचे छत एक आश्चर्यच आहे. छतात लाकडी सर्प दर्शविलेले आहेत. हे नाग अशा रीतीने दर्शविलेले आहेत की ते छताच्या दगडांना सहारा देत आहेत असे दिसते. गुफेत ओसरीच्या वर बनविलेल्या घोड्याच्या नालाच्या आकाराच्या खिडकीतून प्रकाश येतो. बुद्धाची एक मोठी आकृती एका विशाल स्तुपाच्या समोर बसलेल्या स्थितीत दृष्टीस पडते. पाली भाषेतील एका लेखात “तथगय” असे म्हटले आहे याचाच अर्थ बुद्ध भगवान वरच्या मजल्यात आहेत.

लेणी क्र. 11:-

या लेण्याचे दोन मजले आहेत.
यास “दोन ताळ” असे म्हणतात. या लेण्यात बऱ्याच हिंदू देवतांच्या मूर्ती आहेत. कुबेर, यक्ष पहिल्या मजल्याच्या प्रवेशापासूनच दिसतात. महेषमर्दिनी आणि श्री गणेश उजव्या बाजूच्या भिंतीवर दृष्टीस पडतात.

लेणी क्र. 12:-

ही लेणी तीन मजली आहेत. याला “तीन ताळ”असे म्हणतात. इथे ध्यानासन्न मुद्रेत भगवान बुद्धाची आकृती आहे. एक जादुचा नकाशा आहे.त्यास “मंडला” म्हणतात.
ही बुद्धांची ही शेवटची लेणी आहे

वेरुळच्या बुद्ध लेण्यात बुद्ध, बुद्धीसत्व आणि शक्तिदर्शनाच्या अनेक देवतांचे चित्र दर्शवितात. या दर्शनचे नाव वज्रयता पंथ आहे. या दर्शनाच्या मान्यतेनुसार आत्म अनुशासन आणि समाधी हे बुद्धसत्य मिळविण्याचा मार्ग आहे. हे दर्शन बुद्ध धर्माच्या महायान दर्शनाच्या विपरीत आहे . विश्वास आहे की, बुद्ध आणि बुद्धीसत्व हे समाप्त न होणाऱ्या आपल्या सौंदर्य आणि दया यातूनच आपल्या भक्तांना “निर्वाण” देते.

हिंदू लेणी:

वेरुळच्या सर्व हिंदू लेणी भगवान शिवाला अर्पित आहेत शिवाची पूजा शिवलिंगाच्या रूपाने केली जाते. शिवाच्या अनेक मुद्रा दर्शविलेल्या आहेत. ज्या मृत्यु आणि काळाला दर्शवितात. शिवाचे नटराज रूपसुद्धा दर्शविले आहे. याशिवाय नारी शक्तीची कित्येक रूपे दाखविलेली आहेत.

लेणी क्र. 13:-

या लेण्यात विशेष असे काहीच नाही. या लेण्याचा उपयोग धर्मशाळा किवा विश्रामगृहाच्या रूपाने होत असावा.

लेणी क्र. 14:-

या लेण्यात मनोरंजक आकृत्या दाखविलेल्या आहेत. डाव्या बाजूस कित्येक हिंदू देव-देवता दाखविलेल्या आहेत.

उजव्या भागात श्री गणेश, वीरभद्र आणि मंत्रिका मुलांच्याबरोबर खेळत आहेत. असे दिसते. एक शिवजींची मूर्ती आहे. जी “अंधक ” राक्षसाचा संहार करत आहे, असे दिसते. या लेण्यात एक मुख्य आकर्षक दृष्य आहे. यात रावण कैलास पर्वतास उचलतांना दाखविले आहे. नंदी समोर आहे व भगवान शिव आणि माता पार्वती चौसर खेळत आहेत.

लेणी क्र. १५:-

ही लेणी दोन मजली आहेत. पहिल्या मजल्यावर एक मोठा दालन आहे आणि दुसऱ्या मजल्यावर हिंदू देव-देवतांच्या आकृत्या आहेत. येथे शिव-पार्वतीच्या विवाह प्रसंगाचे दृश्य आहे. नंतर शिव यमापासून मारकंडेची रक्षा करताना दाखविले आहे. मुख्य भागात शिवलिंग श्री गणेश, गजलक्ष्मी आणि शिवजींचे दुसरे पुत्र कार्तिकेय आणि मोराची आकृती आहे.

येथे पाली भाषेतील ब्राह्मी लिपीचे 29 दोहे आहेत. त्यात राष्ट्रकुट राजांच्या कार्याचे वर्णन आहे.

लेणी क्र. 16:-

हे जगातील सर्वश्रेष्ठ लेण्यांपैकी एक लेणे आहे.”आधी कळस नंतर पाया” असे या लेण्याचे वैशिष्ट्य आहे.या लेण्याला कैलास लेणे असे म्हणतात. एकाच मोठ्या दगडी शिलेत एक शिवमंदिर कोरले आहे. हे दोन मजली लेणे आहे. 50 मी. लांब ,35 मी. रुंद आणि जवळ जवळ ३० मी. उंच असे हे लेणे आहे. ही लेणी दक्षिण भारतीय वास्तुशिल्पाच्या नमुन्याची आहेत. कर्नाटकात “पत्तादेवकल” येथे “बौरु” पाक्षित मंदिराप्रमाणे हे लेणे आहे. या मंदिराचे वास्तुशिल्प द्राविड वास्तुशिल्पासारखे आहे.

इतिहासावरून कळते की, सातव्या शताब्दी मध्ये राष्ट्रकुट वंशातील राजा कृष्णराजने या लेण्याचे मंदिर बनविले आहे. लेण्यातील आकृत्या शिव पुराणातून घेतलेल्या आहेत.या आकृत्या रामायण आणि महाभारतातील कथा दर्शवतात. शिल्पकलेतील या अद्भूत कलेने सात ते दहा पिढ्यातील कलाकारांना दीडशे ते दोनशे वर्षापर्यंत कामात गुंतवून ठेवले. असे वाटते की, दगडाचे खोदकाम करणाऱ्या लोकांनी अगोदर पहाडाच्या आसरास एक मोठा खोल खड्डा तयार केला असावा. ज्यामुळे एक विशाल दगडी शिळा मध्यभागी तयार झाली आणि या दगडी शिलेचे रुपांतर एका सुंदर शिव मंदिरात केले. या मंदिराच्या अंगणातील दोन दगडी स्तंभात तरासून दोन विशाल हत्ती रूपांतरीत केले आहेत. या मंदिरास तीन वेळेस आतून व बाहेरून रंगाने रंगविले होते. परंतु आता काही ठिकाणी थोडे थोडे रंग दिसतात एकंदरीत हे मंदिर कला आणि भव्यतेच्या दृष्टोने सर्व जगात अद्भुत असेच आहे.

एकदा आम्ही मित्रमंडळी वेरूळची लेणी पाहायला आलो होतो. साधारण 1990 चा काळ असेल. रात्र खूप झाली होती.म्हणून आम्ही एका प्रवेशद्वारापाशीच अंथरून पांघरून टाकून झोपी गेलो. पहाटे सहा वाजता तेथील पहारेकऱ्याने आम्हास उठवले. तो म्हणाला,उठा, उठा. तुम्ही कैलास मंदिराच्या गेटजवळ झोपला आहात. इथे झोपायला परवानगी नाही..अशी आमची फजिती झाली होती.

या लेण्यात तीन वेगवेगळ्या इमारती आहेत. त्या एका पुलाने एकमेकास जोडलेल्या आहेत.

अनेक शिल्प कलाकृतीत रावणास शराबी दाखविण्यात आले आहे. तो कैलास पर्वतास उचलण्यात आपली शक्ती पणाला लावत आहे आणि जो कैलास पर्वत भगवान शिवाचे निवास स्थान आहे तो पर्वत त्यानी आपल्या पायाने दाबून ठेवला आहे,असे चित्र दिसत आहे.

दुसऱ्या भागात विष्णूचा नरसिंह अवतार दाखविला आहे. आणि तिसरी एक कथा दगडाच्या शिलेवर दर्शविली आहे ती म्हणजेच असूर पतन. म्हणजेच “हिरण्यकश्यपू ज्याचा तिन्ही लोकांत लोकांत दबदबा होता. त्याला विष्णूने विश्वासघाताने ,कपटाने मारला.

मंदिराच्या बाहेर एक लहान आवार आहे. त्याठिकाणी भगवान शिवाचे वाहन “नंदी” मंदिराकडे आपले तोंड करून बसलेले आहे. या लेण्यातील तीनही भागात शिल्पकलेच्या महान आकृत्या आहेत ज्यात रामायण, महाभारतातील कथा दर्शविण्यात आल्या आहेत.जन्मास यावे आणि एकदा तरी कैलास लेणे पाहावे.

लेणी क्र. १७:-

मुख्य दालनाच्या प्रवेशद्वारावर देवांच्या मूर्ती आहेत. आतील भागात शिवलिंग व द्वारपाल आहे. दालनाच्या बाहेर स्तंभावर श्री गणेश, दुर्गा आणि “शालभंजिका” यांच्या कोरीव आकृत्या आहेत.

लेणी क्र. 18 व 19:

या लेण्यात फक्त शिवलिंग आहे.

लेणी क्र. 20:

हे लेणे एवढे काही खास नाही.येथे फक्त बालिकांचे चित्र दर्शविलेले आहे.

लेणी क्र. 21:-

या लेण्याचे नाव रामेश्वर आहे. यात कोरीव काम उत्कृष्ट आहे. लेण्याच्या आत गंगा नदीची मानवी आकृती आहे. ती मगरीवर स्वार झालेली आहे. गंगा देवीच्या आकृतीचे कोरीव काम इतके उत्कृष्ट आहे की, तिचे आकर्षक शरीर व मुखमंडलावरील हास्य त्या काळातील शिल्पकलेचा एक अद्भुत नमुन्याचा परिचय आहे.

उजव्या भागात भगवान शिवाचा पुत्र कार्तिकेय यमुना नदीच्या बरोबर दर्शविण्यात आला आहे. दूसऱ्या एका दृष्यात ब्रह्मा, पार्वतीचे वडील आपली कन्या पार्वती आणि भगवान शिवाच्या बरोबर दर्शविले आहेत. मध्यभागी शिव-पार्वती विवाहाचे दृष्य आहे. शंकराने पार्वतीचा हात आपल्या हातात घेतलेला आहे. आणि ब्रह्मा पुरोहिताचे कार्य करीत आहेत.

समोरील भींतीच्या पायथ्याशी हत्तीची एक रांगच दर्शविली आहे आणि शंकराचे अनुयायी नृत्य करत आहेत. दालनात देवी-देवतांचे कोरीव चित्र आहेत हे चित्र भगवान शंकर ,पार्वती यांच्याशी संबंधित आहे.

लेणी क्र.22:-

या लेण्याचे नांव “नीलकंठ” आहे. येथेही देवी- देवतांच्या आकृत्या असून आतील मंदिरात शिवलिंग आहे. श्री गणेश आणि इतर देवदेवतांच्या आकृत्या आहेत. दुसऱ्या बाजूस गजलक्ष्मी आणि भगवान कार्तिकेयची सुध्दा आकृती आहे.

लेणी क्र. 23 :-
या लेण्याचे वेगळेपण असे आहे की, यात ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांची एकत्रित मूर्ती आहे तिला त्रीमुर्ती असे म्हणतात.

लेणी क्र. 24:-

या लेण्यात फक्त चार शिव मंदिरे आहेत.

लेणी क्र. 25:-

हे एक विशाल लेणे आहे. यात एक मंच आहे. मंचासमोर फारच सुरेख कोरीव खांब आहेत. धनाची देवता कुबेराची मूर्ती उजव्या बाजूस आहे. द्वारपालांच्या आकृत्या सुद्धा आहेत. परंतु पूजा स्थानावर शिवलिंग नाही. दालनाच्या छतावर सूर्य देवाचे रथास सात घोडे ओढत आहेत असे कोरीव दृष्य आहे.

लेणी क्र. 26:-

या लेणीत सहा स्तंभ आणि शिवलिंग, नारी द्वारपाला बरोबर आहे ,असे दृष्य नजरेस पडते.

लेणी क्र. 27:-

या लेण्यात डाव्या बाजूस सुंदर महिषासूरमर्दिनी देवीची तसेच ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांच्या आकृत्या आहेत. दुसऱ्या बाजूस बलराम, श्रीकृष्ण आणि एक अन्य देवतांच्या मूर्ती आहेत. विष्णू नागावर विश्रांती करीत आहेत ,असे एका मूर्तीत दर्शविलेले आहे.

लेणी क्र. 28 :-

हे लेणे एका धबधब्याच्या खालील बाजूस आहे. यामुळे या लेण्यास धारातीर्थ असे म्हणतात. लेण्याच्या आतील बाजूस शिवलिंग असून दालनात अष्टभूजा देवी दुर्गाची आकृती आहे.

लेणी क्र. 29:

या लेण्यास सीता न्हाणी असे म्हणतात. म्हणजेच सीतेच्या आंघोळीचे स्थान. कैलास लेण्या नंतर हे एक मोठे लेणे आहे. यात 26 मोठे खांब आहेत. त्यावर फारच सुंदर रीतीने कोरीव काम केलेले आहे. येथील काम बुद्ध लेण्यातील कामासारखे दिसतात. या लेण्याचे खोदकाम अशा रीतीने केलेले आहे की सूर्य प्रकाश भरपूर प्रमाणात आत येऊ शकेल. जो मार्ग लेणीच्या आतील बाजूस जातो त्या ठिकाणी दोन सिंहाच्या आकृत्या बनविलेल्या आहेत आणि आतील भागातही सिंहाच्या आकृत्या आहेत. तसेच शंकर “अंदक” राक्षसाचा संहार करत आहे ,असे दृष्य नजरेस पडते. आणि जवळच उभी असलेली पार्वतीची प्रसन्न मुद्रा दृष्टीस पडते. याशिवाय शंकराची सुंदर अद्भुत व विश्वप्रसिद्ध नटराज आकृती आहे. बाहेरील अंगणात “पद्मासन” मुद्रेत शंकराची मूर्ती आहे. शिवाय मनुष्य रूपात नदी यमुनादेवीची आकृती कासवावर आरूढ आहे . या लेण्याच्या चारीही प्रवेश द्वारावर सामान्य स्त्री-पुरुष द्वारपालाच्या आकृत्या आहेत.

जैन लेणी: Jain Caves

जैन धर्माचे दोन पंथ आहेत. एक दिगंबर जैन आणि दुसरा श्वेतांबर जैन .दिगंबर जैन आपल्या धर्माचे काटेकोरपणे पालन करतात. ते प्रायः प्रचारक असतात. दिगंबर शब्दाचा अर्थ आहे नग्न. त्यामुळेच दिगंबर साधू नग्न राहतात. श्वेतांबर पांढरे शुभ्र वस्त्र धारण करतात.

वेरुळ येथील जैन लेणी दिगंबर पंथाची आहेत. ही लेणी बुद्ध आणि हिंदू लेण्यांपेक्षा जास्त कलात्मक आहेत. ही पाच लेणी बुद्ध आणि हिंदू लेण्यांपेक्षा थोडी दूर आहेत.

लेणी क्र. ३०:-

हे लेणे दोन भागात आहे. पहिल्या भागात खांब फारच सुंदर बनविलेले आहेत. एक चौकोनी खांब मध्यभागी आहे. त्याच्या चारही बाजूस महावीराच्या मूर्तीचे कोरीव काम केलेले आहे. लेण्याच्या छतावर एक सुंदर कमळाचे फूल कोरलेले आहे. दुसरा भाग जवळ जवळ कैलास लेण्यासारखाच आहे. परंतु यात जैन धर्माचेच देवगण आहेत.

लेणी क. 31:-

या लेण्यात फक्त महावीर, पार्श्वनाथ व गोमटेश्वर यांच्याच मुर्त्या आहेत.

लेणी क्र. 32 :-

हे आकर्षक लेणे तीन मजली आहे. पहिल्या मजल्यावर एक मंदिर आहे. त्याला दोन बाजूने प्रवेशद्वार आहे. या लेण्यात महावीराची चौमुखी मूर्ती आहे. मुख्य दालनात जैन प्रचारकांच्या आकृत्या आहेत.

दूसऱ्या मजल्यास इंद्रसभा असे चुकीचे नाव देण्यात आले आहे. यात कलात्मक आकृती असून हत्तीवर मातंगा देवी बसलेली आहे. एक वडाचे झाड उजव्या बाजूस असून एक सिद्धयिकाची आकृती राजसिंहासनावर बसलेली असून ती आंब्याच्या झाडाखाली दर्शविली आहे.

आतील पूजेच्या स्थानावर महावीराची आकृती आहे. दालनात महावीराच्या आणखी मूर्त्या असून छतावर एक सुंदर कमळाच्या फुलाचे कोरीव काम केलेले आहे. हे लेणे पूर्णपणे चित्रांनी भरलेले होते; परंतु काही काही ठिकाणी डाग पडलेले आहेत.

लेणी क्र. 33:

हे लेणे दोन मजली आहे. वरच्या मजल्यावर एक मोठे दालन असून आतल्या बाजूस पूजेचे स्थान आहे. आत महावीर, मातंगा सद्धयिकाच्या आकृत्या आहेत .खालच्या मजल्यावर कोरीव काम केलेले सुंदर खांब आहेत. खांबांवर मातंगा व सिद्धयिकाच्या आकृत्या आहेत. दालनात आंबे लागलेले एक झाड आहे त्यावर पक्षी दर्शविलेले आहेत. डाव्या बाजूस एक छोटी गुफा आहे. त्यात महावीर आणि अन्य तीर्थकरांच्या आकृत्या आहेत.

लेणी क्र. 34 :-

या लेण्यात फक्त महावीर, पार्श्वनाथ व गोमटेश्वराच्या आकृत्या आहेत.

वरील जैन धर्म लेण्यात फक्त दिगंबर पंथीयांनाच प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. जैन धर्मातील दोन्ही पंथात विशेष असा फरक नाही. हे दोन जैन पंथी आत्म्याचे निवास फक्त सजीव वस्तूतच आहे, असे मानत नसून जडवत् जीवातही आत्मा असतो, असे मानतात आणि पुनर्जन्मापासून मुक्ती मिळण्यासाठी घोर तपस्या व शुद्ध चारित्र्यावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे आचरण करतात.

आवर्जून वाचावे असे काही

  1. कर्नाटकातील पर्यटन स्थळे
  2. अजिंठा लेणी / Ajanta Caves
  3. महाराष्ट्रातील प्रमुख शहरे व त्यांची प्रसिद्धी /Cities and their tourist attractions

 

Leave a comment