कळसुबाई शिखर: Kalasubai Peak

महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते ? या प्रश्नाचे उत्तर पटकन आपल्या मुखातून बाहेर पडते. ते म्हणजे कळसुबाई होय. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. या शिखराची समुद्रसपाटीपासून उंची 1646 मीटर आहे. महाराष्ट्राचे एव्हरेस्ट अशी या शिखराची ओळख आहे. या कळसुबाई शिखराची आता आपण अधिक माहिती घेणार आहोत.

ठिकाणाचे नावः कळसुबाई

समुद्रसपाटीपासून उंची: 1646 मीटर.

ठिकाणाचा प्रकार : गिरिस्थान

चढाईची श्रेणी: कठीण

ठिकाण : कळसुबाई, जहागीरदारवाडीच्या जवळ

तालुका : अकोले

जिल्हा : अहिल्यादेवीनगर (अहमदनगर)

जवळचे गाव: वसाळी, जहागीरदारखाडी.

डोंगररांग: सह्याद्री.

सध्याची अवस्था : उत्तम

नाशिकहून अंतर : 60 किलोमीटर.

कळसुबाई शिखरावर कसे जाल ? How to reach Kalasubai Peak?

कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असल्याने या शिखरावर अगदी थोडेच लोक अर्थात गिर्यारोहक जाऊ शकतात; पण ज्यांना शिखराच्या पायथ्याशी जाऊन शिखर पाहण्याचा आनंद लुटता येईल.

ज्यांना कळसूबाई पाहण्याचा आनंद घ्यायचा आहे. त्यांच्यासाठी खालील वाटा मार्गदर्शक ठरतील.

नाशिकहून बोंडेदूर, पिंपळाड मार्गे कळसुबाईला जाता येते. नाशिक ते कळसुबाई अंतर 60 किलोमीटर आहे.

* सिन्नरहून साकूरफाटा, कवाडदरा मार्गे गेल्यास कळसूबाई 59 किलोमीटर अंतरावर आहे.

* हरिश्चंद्रगड, मावेशी (रतनगड-राजूड रोड) कळसुबाई 51 किलोमीटर अंतरावर आहे.

* शहापूरहून खर्डी- कसारा- इगतपुरी मार्गे गेल्यास कळसुबाई 81 किलोमीटर अंतरावर आहे.

अहमद‌नगर या जिल्ह्याच्या ठिकाणाहून गेल्यास कळसुबाई 179 किलोमीटर अंतरावर आहे.

प्रत्यक्ष कळसुबाईवर चढाई करण्यासाठी दक्षिणेकडून एक वाट आहे. या वाटेला गुरांची वाट म्हटले जाते. ही वाट थोडी लांबची आहे. पूर्वेकडून जाणारी एक वाट आहे. तिला साखळदंडाची वाट म्हणतात. येथूनच दुसरी एक वाट आहे. तिला गोटीची वाट म्हणतात. उत्तरेकडून तुम्ही आला असाल तर इंदोरे गावातून येणारी वाट पुढे कळसुबाईवर जाते.

जेव्हा कळसुबाईच्या उंच शिखरावर पोहोचतो, तेव्हा निसर्गाचे सौंदर्य काय असते हे जवळून पाहण्याचा आनंद लुटता येतो. स्वच्छ, सुंदर, मनमोहक निसर्गाचे दृश्य, अंगाला झोंबणारा थंडगार वारा आणि शिखरावर पोहोचल्याचा आनंद काही वेगळाच असतो.

‘कळसुबाईचे शिखर दिवसा दि‌वस सर करणारी माणसे आहेत. गिर्यारोहक आहेत. सर्वसामान्य लोकही कळसूबाई शिखरावर जाऊ शकतात. फक्त बी.पी. शुगर असायला नको. अनेक लहान मुलांनी सुद्धा कळसुबाई सर केली आहे. पण या कळसुबाईवर रात्रीचे चढण्याचा अनोव्वा विक्रम आचडिकन गेल या इंग्रजाने इ.स. 1860 मध्ये केला.कळसुबाईच्या शिखरावर चार तासात जाता येते.परतीच्या प्रवासाला तीन तास लागतात.

कळसूबाईवर पोहोचल्यावर अनेक डोंगर शिखररांगांचा नजराणा पाहायला मिळतो. स्वच्छत निरभ्र आकाश आणि सोबत दुर्बिणीची साथ असेल तर डोंगर शिखरे आणि गडकिल्ले पाह‌ण्याचा आनंद लुटता येतो. उत्तर दिशेला तोंड करा. रामसेज, देहेर आणि त्यापलीकडे रांगेत अहिवंत, सप्तशृंग, अचला, घोडप, कोळधर, राजदे‌हेर, चांदवड ही सातमाळांची दुर्गसाखळी पाहण्याचा आनंद लुटता येते.

आता तुम्ही पूर्वेकडे तोंड फिरवा. सभोवार नजर फिरवली असता विस्तीर्ण असा मुलुख दिसतो. दक्षिणेला भंडारदऱ्याच्या धरणाच्या सभोवार पाबर, हरिश्चंद्र‌गड, रतनगड स्पष्ट दिसतात.

आता पश्चिमेला पाहा. तुम्हाला येथून कुलंग, मदन, अलंग हे दुर्ग पाहायला मिळतात. कोकणातील माहुली, विकटगड, माथेरान स्पष्ट दिसतात. दुर्बिणीच्या साहाय्याने खंडाळ्याचे नागफणी टोक येथून दिसू शकते.

कळसुबाई नावाची दंतकथा :

कळसुबाई शिखराला कळसुबाई हे नाव कसे पडले? याबाबत एक दंतकथा प्रचलित आहे. खूप खूप वर्षांपूर्वी कदाचित मध्ययुगीन काळात या परिसरात कोळी समाज राहत होता. त्यांच्यातीलच एक मुलगी येथील रहाळात राहत होती. उदर निर्वाहासाठी दिला रहाळ सोडून इंदोरे गावी जावे लागले. या गावातच ती धुणी-भांडी करण्याचे काम, घरातील केरकचरा काढण्याचे काम करत होती.ती जेथे काम करत होती त्या जागा थाळेमेळ आणि काळदरा नावाने आजही प्रचलित आहे. कळसुबाईने परिस्थितीमुळे कदाचित लग्न केलेच नाही. ती आयुष्यभर अविवाहीत आणि संन्यस्त जीवन जगली. तिच्या प्रामाणिकपणाचा आणि संन्यस्त जीवनाचा सगळीकडे बोलबाला होता.

आयुष्याच्या अखेरच्या काळात कळसुबाई‌ने इंदोरे सोडले आणि पुन्हा ती शिखरावर राहायला आली. येथेच तिचा मृत्यू झाला. याठिकाणी कळसुबाईचे छोटेसे मंदिरही बांधले आहे. या शिखरावर कळसुबाईने देहत्याग केल्याने हे शिखर कळसुबाईचे शिखर या नावाने ओळखू लागले. पुढे तेच नाव कायम राहिले. ‘मरावे परि कीर्तिरुपी उरावे’ हाच कळसुबाईच्या जीवन कथेतून बोध घ्यावा, अशीच तिची जीवनकथा आहे.

कळसुबाई शिखर सर करण्यासाठी तुम्हाला मोजकेच पण आवश्यक साहित्य घेणे आवश्यक आहे. आपल्याजवळ पाठीवरची सॅक असावी. सॅकमध्ये टॉवेल, हातरुमाल, पुरेसे पिण्यासाठी पाणी, खाण्यासाठी बदाम, खारीकसारखे ड्रायफुट्स, मोजकीच फळे, शक्य असेल तर लहान डब्यातून गरमागरम नाष्टा घेऊन जावे. त्यामुळे डोंगर चढताना तहान भूक लागली, तर अडचण भासणार नाही. एक दिवस तुम्ही कधी ना कधी नक्कीच कळसुबाईचे शिखर चढण्याचा आनंद लुटा.

कळसुबाईच्या शिखरावर ज्यांना जाणे शक्य नाही, त्यांनी शिखरमाथ्याखालील टप्प्यावर थांबायला हरकत नाही. येथे एक छोटीशी विहीर आहे. विहिरीतील पाणी पिण्यास योग्य असेल असे नाही. विहिरीच्या जवळच एक छोटेसे खोपटे आहे. या ठिकाणी उंच शिखरावर उगवणारी आणि वाढणारी पांढरी कवडी ही वनस्पती पाहायला मिळते. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव स्वर्शिया डिकसाटा असे आहे. कानातून पाणी येणे, पू येणे इत्यादी रोगावर या वनस्पतीचा उपयोग केला जातो. कळसुबाईच्या शिखर परिसरात हिंस्र प्राण्यांचा वावर नसला तरी अनेक प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात. केवळ कळसूबाईचे शिखर सर करण्यासाठी न जाता आजूबाजूचा परिसर, फळे, फुले, पक्षी, डोंगररांगा, गड‌कोट पाहण्यासाठी आपले डोळे सतर्क ठेवा.नक्कीच कळसूबाईच्या शिखरावर जाण्याचा आनंद लुटता येईल.

Leave a comment