Buddha Life Story-Part 14

महामंत्री हरला – बुद्ध जिंकला.

राजा शुद्धोदनाच्या सांगण्यावरूनच महामंत्री उदयीनने सिद्धार्थ गौतमाला विषय सुखात अड‌कण्याचा खूप प्रयत्न केला. त्याने त्यासाठी पुराणातील ऋषीमुनींचे आणि राजांचे दाखले दिले होते. जेणे करून सिद्धार्थचे मन परिवर्तन होईल आणि सिद्धार्थ विषय-सुखात रमून जाईल; पण त्या खटाटोपाचा काहीच उपयोग झाला नाही.सिद्धार्थने महामंत्र्याला कशा प्रकारे उत्तर दिल ते पाहू——

“हे महामंत्री, तुला माझी खूप काळजी आहे. म्हणुनच तू माझ्याबद्दल स्नेह‌भाव व्यक्त केलास. तुझा प्रयत्न, तुझी भाषा आणि माझ्यासाठी केलेला आटापिटा तुझ्यासाठी योग्यच असेल, म्हणून तर तू हा सगळा उपद्व्याप ‌‌ केलास.
परंतु माझ्यासाठी तू कोठे चूक करत आहेस, हे तुला मी पटवून देतो. ऐक—–

“मी भौतिक (ऐहिक) सुखाची अवहेलना किंवा तिरस्कार करत नाही. सर्व मान‌व‌प्राणीच त्यात गुरफटलेला आहे, हे मला चांगलेच माहीत आहे. पण हे जग अनित्य आहे. त्यामुळे माझे मन या क्षणभर सुखात रमत नाही. समजा, स्त्रीसौंदर्य कायमस्वरु‌पी राहिले, तरी सु‌द्धा विषयभोगातच कायम स्वरुपी रमून जाणे म्हणजे मला स्वैराचार वाटतो. म्हणूनच माझे मन विषय सुखात रमत नाही.तू वशिष्ट, अगस्ती, विश्वामित्र, इंद्र, विष्णू, ययाती अशा अनेक महात्म्यांचे मला दाखले दिलेस. त्याबद्दल आभारी आहे, पण या विषयसुखामुळेच काहींचा नाश झाला . काहींच्या प्रतिमा मलीन झाल्या . काहींच्या आयुष्याला कायमचा डाग लागला. आणि असा डाग मला लावून घ्यायचा नाही”

“आणखी एक गोष्ट तुझ्या लक्षात कशी आली नाही? जेथे सर्वनाश आहे, जेथे ऐहिक विषयाचा मोह आहे, जेथे आत्मसंयमाचा अभाव आहे, ते कसे काय थोर महात्मे होऊ शकणार ? ते खरेखुरे थोर महात्मे नाहीतच. कारण त्यांचा शेवटी नाशच झाला आहे किंवा त्यांच्या आयुष्याला कायमचा डाग लागलेला आहे. हे तू विसरु नकोस. मी ही विसरत नाही.असे केले तर लोक मला भविष्यात व्यभिचारी म्हणतील याची मला पूर्ण जाणीव आहे.”

” जेथे सर्वनाश आहे. ऐहिक सुखाचा मोह आहे किंवा जेथे आत्मसंयमाचा अभाव आहे, अशा ठिकाणी खरा महात्मा असूच शकत नाही असे माझे ठाम मत आहे.”

“हे महामंत्री, स्त्रियांशी वरकरणी प्रेम करावे, असा तू सल्ला देतोस, पण असे वरकरणी प्रेम कितीही आद‌र‌पूर्वक वाटत असले तरी, त्यात गोडी वाटत नाही. त्यामुळे स्त्रियांशी असे वरकरणी प्रेम करणे मला जमणार नाही. लोक मला स्त्रीलंपट म्हणतील”

“त्या स्त्रियाही वरकरणी प्रेम करत असतील , मीही असेच वरकरणी प्रेम करत असेल. म्हणजे जेथे खरेपणा नाही तेथे रमण्यात किंवा कोणत्याही स्त्रीची इच्छापूर्ती करण्यात मला मुळीच आवड‌णार नाही. जो संयोग मनापासून व नैसर्गिक नसेल, अशा संयोगाचा धिक्कार असो. मन विषयाच्या अधीन गेले असेल, मिथ्य गोष्टीवर विश्वास ठेवणारे झाले असेल, विषयाच्या वस्तूचे दोष न पाहणारे असेल म्हणजेच केवळ वासनेपोटी झालेला संयोग धिक्कारास पात्र आहे-”

” हे महामंत्री, विषयवासनेत एकमेकाची फसवणूक होत असेल, तर अशा स्त्रियांकडे ‘किंवा पुरुषांकडे चांगल्या दृष्टिकोनातून कोण पाहणार ? त्यामुळे मी तुला खात्रीपूर्वक सांगतो, की नीच विषय‌भोगाच्या कुकर्माचा मार्ग मला दाखवू नकोस. त्या मार्गाने मी कधीच जाणार नाही.”

रात्रपुत्राचा दृढनिश्चय पाहून महामंत्री उदयीन खजील तर झालाच, त्याच बरोबर उद्‌विग्न अवस्थेत दुःखी कष्टी होऊन त्याने सर्व वृत्तांत राजा शुद्धोदनांच्या कानावर घातला.

राजा शुद्धोदनही चिंतातूर झाला. सिद्धार्थला अशा प्रकारच्या सर्व विषयभोगात रुची नाही. हे शुद्धोद‌नाच्या लक्षात आले. त्याची झोप उडाली. आपला पुत्र संन्यासी तर होणार नाही ना ? याचीच चिंता त्याला वाटू लागली.

राजपुत्र सिद्धार्थला ओगविलासात गुंतवून संसारिक बनवण्याचा युक्तिवाद विफल झाला होता. जर सिद्घार्थ या विषयभोगात गुंतला असता तर तो बुद्‌ध’ कधीच झाला नसता . कदाचित सम्राट चक्रवर्ती झाला असता. राजा शुद्धोदन आणि त्याचे मंत्री यांनी बराच वेळ सिद्धार्थच्या जीवनात कलाटणी घडवून आणण्यात खर्च केला, पण महामंत्री, शुद्धोदन ‌ पूर्णत: हतबल झाले. त्यांनी युवतींचे अंतःपूर विसर्जित करून टाकले.

Leave a comment