डोक्यांवर भरपूर केस असणे ही आपल्या शरीर सौंदर्याची देणगी मानली जाते. केसांचे वेगवेगळे स्टाईल करून अनेक लोक आपल्या व्यक्तिमत्त्वाचे आणि शरीराचे सौंदर्य वाढवतात. तर काही लोक डोक्याचे पूर्ण टक्कल करून वेगळाच लुक बनवतात. टक्कल करणे सगळ्यांनाच खुलून दिसते असे नाही. आपल्या शरीर रचनेवर ते अवलंबून असते. हे जरी काहीही असले तरी डोक्यावर केस असणे हे भूषण मानले जाते. अलीकडच्या काळात जीवनशैलीत प्रचंड प्रमाणात बदल झाल्यामुळे त्याचा परिणाम केसांवरही होत आहे. केस अवकाळी पिकणे,केस गळणे, टक्कल पडणे या बाबींचे प्रमाण खूप वाढले आहे. अगदी तरुण वयातच मुलांना टक्कल पडल्याची किंवा केस गळती चालू झाल्याची किंवा केस पिकण्याची समस्या निर्माण झाल्याचे जाणवते.
*टक्कल का पडते/टक्कल पडण्याची कारणे
*केस कलप करणे*
केस अवकाळी पिकायला लागले की लोक ते केस काळे करतात. म्हणजेच हेअर डाय करतात. पण अशा हेअर डाय मध्ये मोठ्या प्रमाणात घातक केमिकल असल्यामुळे त्याचा परिणाम थेट केसांवर होतो आणि केस गळू लागतात. एवढेच नाही तर चेहऱ्यावर वाण उठण्याचे कारणही केस काळे करणे किंवा कलप करणे हेच आहे. केस अवकाळी पिकू नये म्हणून काळजी घेण्यापेक्षा केस पिकले म्हणून कलप करणे किंवा ते काळे करणे चुकीचे आहे.
*जंक फूड खाणे*
आजकाल तरुणांमध्ये आणि मुलांमध्ये सुद्धा जंक फूड खाणे ही एक नित्याची बाब झाली आहे. पिझ्झा ,बर्गर ,वडापाव ,चमचमीत मिसळ, पावभाजी, पाणीपुरी, चिकन सिक्सटी फाईव्ह, दाबेली, भजी असे किती पदार्थ मुले चैनीखातर खातात. किंवा भूक लागली म्हणूनही खातात. बाहेरून कामावरून आल्यावर कंटाळा आला म्हणून जंक फूडची ऑर्डर देऊन असे पदार्थ घरी पार्सल रूपाने मागवतात आणि खातात. या जंकफूडच्या खाण्यामुळे कॅन्सर सारखे भयानक आजार होण्याची शक्यता असतेच; पण त्याच बरोबर केसांची गळतीही सुरू होते आणि मग डोक्यावर अवकाळी टक्कल पडते.
*केसांची निगा न राखणे*
केसांची निगा राखली नाही तर केस खराब होतात. केस लवकर गळायला सुरुवात होते. आणि भविष्यात लवकरच मग टक्कल पडते.
*शारीरिक व मानसिक ताण तणाव*
आज काल संपूर्ण जीवनशैलीच तहान तणावाची झाली आहे. हे जरी खरे असले तरी ताणतणाव होऊ नये म्हणून योग्य काळजी घेतली तर आणि जीवनशैलीत आपण योग्य बदल केला तर शारीरिक आणि मानसिक ताण तणाव येणार नाहीत. कार्यालयीन कामे करणारे लोक, रोजचा व्यवसाय करणारे लोक, व्यापार करणारे लोक, नोकरीसाठी शिक्षण घेणारे तरुण, लग्न जमत नाही म्हणून तणाव घेणारे तरुण तरुणी, रोजचे धक्काबुक्कीचे जीवन अशा अनेक कारणांनी ताणतणाव येतो. त्याचा परिणाम शारीरिक आणि मानसिक आजारावर होतो.अशा ताण तणावामुळे केसांची गळती होऊन टक्कल पडते.
*अनुवंशिकता*
अनुवंशिकतेमुळे सुद्धा टक्कल पडते. आई वडील, आजी आजोबा यांची टक्कल असेल तर मुलांची आणि नातवंडांची ही टक्कल पडते, केस गळती होते.
*संतुलित आहाराचा अभाव*
आपण जो आहार घेतो, तो आहार संतुलित नसेल तर केसांची गळती होऊन टक्कल पडते.
*प्रदूषण*
हवेच्या वाढत्या प्रदूषणामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात केस गळती होऊन टक्कल पडते. प्रचंड धुळीच्या सानिध्यात राहणे, वाहनांच्या प्रचंड धुरामुळे होणाऱ्या प्रदूषणाच्या सानिध्यात राहणे, क्षारयुक्त पाण्याने अंघोळ करणे किंवा क्षारयुक्त पाणी पिणे इत्यादी अनेक कारणांनी टक्कल पडते.
*थायराइडचे वाढते प्रमाण*
आपल्या शरीरातील थायरॉईड योग्य प्रमाणात नसेल तर शारीरिक संतुलन बिघडते. थायराइडचे प्रमाण वाढले तर केसांची गळती होते आणि काही दिवसांतच टक्कल पडते.
*टक्कल पडू नये म्हणून उपाय*
*केसांची योग्य निगा राखणे*
दाट काळेभोर केस लाभणे ही खूप मोठी देणगी मानली जाते, पण याच केसांची निगा राखली नाही तर केस गळू लागतात आणि मग टक्कल पडते. अशी टक्कल पडू नये म्हणून केसांची चांगली निगा राखावी. केस आठवड्यातून दोन वेळा किंवा एक वेळा स्वच्छ धुवावे. केस धुताना आपल्याला सूट होणारा शाम्पू वापरावा. अंघोळ केल्यानंतर तेल लावणे चुकीचे आहे. असे तेल लावल्यामुळे दिवसभर केसांवर धूळ बसते आणि केस खराब होतात. अंघोळीपूर्वी अर्धा तास अगोदर डोक्यावर तेल लावल्यास आणि हलक्याच हाताने मॉलिश केल्यास केसांच्या मुळांना पोषक तत्वे मिळतात आणि केस निरोगी बनतात.
*जंक फूडचा मोह टाळणे*
जंक फूड हे आपल्या नित्याच्या आहारातील एक विष आहे. जंक फूडचे अनेक दुष्परिणाम होतात. अनेक आजार होतात. केसांची गळती होऊन टक्कल पडणे हे सुद्धा वारंवार जंक फूड खाल्ल्यामुळे होऊ शकते. म्हणून जंक फूडला बाय-बाय करावे आणि नित्याचा चांगला व संतुलित आहार सेवन करावा.
*संतुलित आहार*
नेहमीच संतुलित आहार घेणे हे आपल्या आणि आपल्या केसांच्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे. संतुलित आहारामुळे मन आणि शरीर शुद्ध राहते. शरीराची आणि केसांची वाढ चांगली होते. केसांना कोणत्याही प्रकारचा रोग होत नाही. केस अवकाळी पिकत नाहीत. केसांची गळती होऊन टक्कल पडत नाही. म्हणूनच संतुलित आहार घेणे हे सर्वांच्याच हिताचे असते.
*प्रदूषणापासून अलिप्त राहणे*
प्रदूषित प्रदेशात राहणे टाळावे. पण ज्यांना टाळणे शक्य नाही त्यांनी प्रदूषित वातावरणात फिरताना चेहऱ्यावर आणि डोक्यावर पांढरे स्वच्छ कापड गुंडाळून फिरावे. त्यामुळे आपला चेहरा आणि डोक्यावरील केस सुरक्षित राहू शकतात.
*त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे*
आपण केसांची योग्य काळजी घेऊनही केसांची गळती होऊन टक्कल पडत असेल तर त्वचारोग तज्ज्ञांना आपले केस दाखवावे आणि त्यांच्या सल्ल्याने शाम्पू किंवा इतर औषधोपचार करून घ्यावेत. त्यामुळे केस गळती थांबेल आणि टक्कल पडण्यापासून आपले रक्षण होईल.