Iran-US peace deal latest news-इराण-अमेरिका शांतता कराराला ट्रम्प यांचा खोडा: होर्मुझची नाकेबंदी कायम राहणार

इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या शांतता कराराच्या चर्चांना पुन्हा एकदा खीळ बसली असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करार करण्यात कोणतीही घाई करू नका.वेळ आपल्या बाजूने असल्याचे आपल्या प्रतिनिधींना सांगितले. शिवाय जोवर करार होत नाही तोवर होर्मुझ सामुद्रधुनीवर अमेरिकेची नाकेबंदी कायम असेल असा थेट इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. इराणने शांतता करार लवकरच पूर्ण होईल आणि महिनाभरात होर्मुझ खाडी सुरू होईल असे जाहीर केले होते; पण ट्रम्प यांचा खोडा कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दोन्ही बाजूने संयमाने आणि काळजीपूर्वक निर्णय घ्यायला हवा.
तेथे कोणतेही चूक परवडणार नाही. इराण अण्वस्त्र किंवा अणुबॉम्ब विकसित करता कामा नये किंवा मिळवता कामा नये हे त्यांनी समजून घेतले पाहिजे असे ट्रम्प म्हणाले; पण ट्रम्प यांच्या वक्तव्याला काही आधार नाही. आपण अणुबॉम्बचा वापर करणार असे इराणने केव्हाही म्हटलेले नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि इराण यांच्यातील 2015 च्या अणुकरारावर टीका केली आहे. हा करार काळजीपूर्वक केला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. पण ट्रम्प यांचा हा हेकेखोरपणा भारतासह अनेक विकसनशील देशांना परवडणारा नाही.

ट्रम्प यांची पोस्ट चर्चेत

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर Adios असा संदेश देणारी AI निर्मित पोस्ट तयार करत इराणला थेट इशाराच दिला आहे. Adios या शब्दात त्यांनी एक फोटो शेअर केला.त्यात अमेरिकेचे लढाऊ विमान हल्ला करत आहे आणि खाली इराणची जहाजे जळून खात होत आहेत असे दिसते. या जहाजांवर इराणचा झेंडा हे दाखवला आहे. हा फोटो शेअर करून इराणला अलविदा की युद्धाला अलविदा केला जात आहे याबद्दल चर्चा रंगली आहे; पण अशा प्रकारची पोस्ट सोशल मीडियावर पाठवून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष किती खोडसाळ आणि पोरकट आहेत हे सिद्ध होते.

Leave a comment