Bhudargad Magnetic Point-भुदरगडातील रहस्यमय मॅग्नेटिक पॉईंट! न्यूट्रल गाडी चक्क चढाकडे धावते

महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील खेडगे- एरंडप्पे मार्गावरील रक्षादेवी घाटात एक विलक्षण घटना नागरिकांच्या लक्षात आली आहे. या ठिकाणी उतारावर उभी करून न्यूट्रल केलेली चार चाकी गाडी उताराच्या दिशेने न धावता चढाच्या दिशेने आपोआप सरकत असल्याचा दावा तिथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी केला आहे. या प्रकारामुळे परिसरात मॅग्नेटिक पॉईंट असल्याची चर्चा जोरात रंगली असून या रहस्यामागील कारण जाणून घेण्याबाबत उत्सुकता वाढली आहे.

भुदरगड तालुक्यातील पश्चिम भागाला राधानगरी तालुक्याशी जोडणाऱ्या खेडगे- एरंडपे मार्गा वरील रक्षादेवी घाटात खेडगे गावापासून काही अंतरावर रस्ता खचलेल्या ठिकाणाजवळ नितवडेकडे जाणाऱ्या फाट्या नजीक हा अनोखा स्पॉट आढळलेला आहे.खानापूर येथे संदीप पाटील यांना प्रथम या ठिकाणी असा अनुभव आला. त्यांना हा अनुभव आल्यानंतर त्यांनी चार-पाच वेळा असे करून पाहिले तर चार-पाच वेळाही असेच घडले. चढाच्या दिशेने ताशी वीस किलोमीटर वेगाने ही गाडी आपोआप जात असल्याचे त्यांना दिसून आले.

वैज्ञानिक तपासणी करणे आवश्यक

भौतिकशास्त्राचे तज्ज्ञ प्राध्यापक शरद भंडाळकर यांनी म्हटले आहे की या ठिकाणी काहीतरी चुंबकीय शक्ती असण्यापेक्षा त्या परिसरातील भौगोलिक रचना , रस्त्याचा वास्तविक उतार चढाव, डोंगराची मांडणी,क्षितिजरेषेमुळे निर्माण होणारा दृश्यभ्रम कारणीभूत असू शकतो. समुद्रसपाटीपासूनची उंची, भूपृष्ठाचा कोन याची परिसराची वैज्ञानिक तपासणी झाल्यानंतरच घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होऊ शकते.

भारतातील काही मॅग्नेटिक पॉईंट magnetic points in India

भारतात प्रथमच भुदरगड तालुक्यात असे घडलेले नाही तर भारतातही काही मॅग्नेटिक पॉईंट आहेत ते पुढील प्रमाणे– लडाखमधील मॅग्नेटिक हिल, कालो डोंगर किंवा ब्लॅक हिल, अमरेलीतील तुळशी श्याम रोड, छत्तीसगडच्या कवर्धा जिल्ह्यात असे आत्तापर्यंत भुदरगड तालुक्यातील मॅग्नेटिक पॉईंट धरून भारतात एकूण पाच ठिकाणी असे मॅग्नेटिक पॉईंट आढळल्याचे स्पष्ट झाले आहे.

Leave a comment