अक्षय्य तृतीया / What Is Akshay Tritiya

अक्षय म्हणजे क्षय न होणे. नष्ट न होणे. अक्षय्यतृतीयेच्या नावातच हा अर्थ लपलेला आहे. पृथ्वी, आप (जल), तेज (प्रकाश), अग्नी आणि वायू ही पंचमहाभूते आहेत. ही पंचमहाभूते अक्षय्य आहेत; म्हणजे ती कधीच नष्ट न होणारी किंवा दीर्घकाळ टिकणारी आहेत. असेच अक्षय्यतृतीयेचे महत्त्व आहे. या अक्षय्यतृतीयेची माहिती आपण घेणार आहोत.

 

साडेतीन मुहूर्त आणि अक्षय्यतृतीया:

भारतीय सौर वर्षाप्रमाणे चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन हे बारा महिने आहेत. या बारा महिन्यांनुसारच भारतीय सण, उत्सव येतात. वैशाख हा भारतीय सौर वर्षातील दुसरा महिना. या महिन्यात शुद्ध तृतीयेला अक्षय्यतृतीया हा सण येतो. हा दिवस साडेतीन मुहर्तापैकी एक आहे. म्हणून या दिवसाला शुभ दिवस मानले जाते.

गुढीपाडवा, अक्षय्यतृतीया, विजयाद‌शमी (दसरा) हे तीन मुहूर्त आणि बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळी पाडवा हा अर्धा मुहूर्त मानला जातो. हे सर्व दिवस भारतीय समाजात शुभ दिवस मानले जातात.

वैशाख ओणवा आणि आमरस :

चैत्र महिन्यापेक्षा वैशाख महिन्यात कडक उन्हाळा असतो. या उन्हाळ्याचे वातावरण आपल्याला अनुकूल होण्यासाठी निसर्ग आपल्याला भरभरून फळे देतो. आंबा हे आपल्या भारताचे राष्ट्रीय फळ आहे. अक्षय्यतृतीयेला आंबा पिकतो. म्हणून ‘पाडव्याला पाड आणि आकितीला राड’ ही ग्रामीण भागातील म्हण निसर्ग आणि सण यांचे संतुलन ठेवण्याचे काम करते.

अक्षय्यतृतीयेला आंबा आवर्जून खाल्ला जातो. आमरस पण सेवन केला जातो. उन्हाचा त्रास कमी करण्याचे काम आंबा आणि आमरस करतो. काही ठिकाणी कच्च्या आंब्यापासून रस काढून त्याचे पन्हे’ बनवतात व सेवन करतात. पन्हे सुद्‌धा उन्हाळ्‌यात खूप आरोग्यदायी उरते.

अक्षय्यतृतीयेचा मुहूर्त :

भारतीय समाजात आणि हिंदू धर्मात अक्षय्यतृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. यादिवशी लोक आपल्या कुलदेवताला पोळीचा आणि आंब्यांचा नैवेद्य दाखवतात. काही लोक सोने खरेदी करतात. वाहने खरेदी करतात. जमीन, घर, मालमत्ता यांची खरेदी-विक्री अक्षय्यतृतीयेला मोठ्या प्रमाणात करतात.

छत्रपती शिवाजी महाराज कोणताही दिवस शुभ किंवा अशुभ मानत नसत. शिवरायांचा आदर्श घेऊन वाटचाल करणारे लोक सोन्याचा दर बाजारात जेव्हा कमी असतो, तेव्हाच सोने खरेदी करतात. त्यांच्या दृष्टीने तोच शुभदिवस असतो.

शेतकरी आणि अक्षयतृतीया!

वैशाख महिना हा खरीप पिकाची पेरणी करण्यासाठी योग्य हंगाम मानला जातो .होळी पौर्णिमेपासून जमिनीची मशागत सुरू केली जाते. अक्षय्यतृतीयेला जमीन पूर्णतः पेरणीस तयार होते. हा दिवस शुभ दिवस मानला असल्याने अक्षय्यतृतीयेला शेतकरी पेरणीचा शुभारंभ करतात. पावसापूर्वीच्या धुळीत केलेल्या या पेरणीला धुळपेरणी म्हणतात. धुळपेरणी ही उगवणीला खूप चांगली मानली जाते. पीक टरारून आणि जोमात येते.

आजकालचे शेतकरी मुहूर्ताची वाट पाहात नाहीत.

अक्षयतृतीयेबाबत काही दंतकथा:

* श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले की अक्षय्यतृतीये दिवशी दान केल्यामुळे आपल्या दानात क्षय होत नाही.

* या दिवशी लोक गंगास्नान करतात. या दिवशी गंगास्नान केल्याने पापमुक्त होता येते. अशी दंतकथा असली तरी त्यांत काहीही तथ्य नाही.

* वैशाख महिन्यात खूप उष्णता असते. त्यामुळे गोरगरिबांना मातीचे माठ किंवा रांजण दान म्हणून दिल्याने त्यांचा आशीर्वाद मिळेल. शुभेच्छा मिळतील . दान करणाऱ्या व्यक्तीला सत्कर्माचा आनंद मिळेल

 चार युगे आणि अक्षय्यतृतीया :

सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग ही भारतीय कालमापनातील चार महान युगे आहेत. चार युगांबाबत माझ्या ‘रामनवमी: संपूर्ण माहिती’ या लेखात संपूर्ण माहिती दिली आहे. (लिंक)

अक्षिय तृतीयेच्या दिवशी त्रेतायुगाचा प्रारंभ झाला. अक्षय्यतृतीया हा त्रेतायुगाचा पहिला दिवस मानला जातो.

अक्षय्यतृतीयेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

संभाजी पाटील
राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित मुख्याध्यापक ,माजी शिक्षण विस्तार अधिकारी, राधानगरी

Leave a comment