रानभाज्या/Ran bhaji

रानभाज्यांचे आपल्या जीवनात खूप महत्त्व आहे. रानभाज्या खा आणि दीर्घायुषी व्हा. असे म्हटले जाते ते रानभाज्यांच्या ठिकाणी असलेल्या प्रचंड ऊर्जाक्षमता आणि रोगप्रतिकारक शक्तीमुळेच.धरतीमातेने आपल्याला मोफत दिलेले वरदान म्हणजे रानभाज्या’ होय. म्हणूनच पावसाळ्यात रानावनात विपुल प्रमाणात सहज आणि फुकट उपलब्ध होणाऱ्या रानभाज्यांचा आस्वाद आबालवृद्‌धांनी घेतला पाहिजे .या रानभाज्यांची अधिक माहिती आपण घेणार आहोत.

भाज्यांचे प्रकार:

सर्वसाधारणपणे फळभाज्या आणि पालेभाज्या असे भाज्यांचे मुख्य दोन प्रकार असले तरी रानभाज्या आणि शेतभाज्या या प्रकारांबद्‌दल माहिती घेणार आहोत.

(अ) रानभाज्या:Ran bhaji

पावसाळ्यात रानावनात नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या आणि कोणतीही मशागत न करता येणाऱ्या भाज्यांना रानभाज्या असे म्हणतात.

(आ) शेतभाज्या :Shet bhaji

ज्या भाज्या शेतमळ्यात पिकवल्या जातात. त्यांना शेतभाज्या असे म्हणतात. मेथी, पोकळा, पालक, शेपू, अंबाडा (अंबाडी), कोबी, फुलावर, विविध प्रकारच्या भाज्या या शेतभाज्या प्रकारात येतात.

कोणत्या भाज्या या अधिक गुणकारी आणि आरोग्यदायी असतात ?Which vegetables are more effective and healthy?

सर्वच भाज्या या उपयुक्त, गुणकारी आणि आरोग्यदायी असतात; पण त्या कशा पिकवल्या जातात, यावर त्यांची गुणवत्ता अवलंबून असते. रानभाज्या पिकवल्या जात नाहीत. त्या नैसर्गिक उगवतात.त्यांना खत- पाणी, औषध फवारणी करावी लागत नाहीत. म्हणून त्या अधिक गुणकारी असतात. शेजभाज्या सेंद्रीय पद्धतीने केल्या तर त्याही गुणकारी बनतात. सध्या बाजारात उपलब्ध असणाऱ्या भाज्यांवर प्रचंड प्रमाणात कीटक नाशकांची फवारणी केली जाते. कमी कालावधीत आणि जास्त प्रमाणात उत्पन्न होण्यासाठी टॉनिक आणि रासायनिक खतांचा वापर केला जाते. अशा भाज्या आरोग्यास अपायकारक असतात. कॅन्सरसारखे भयानक आजार होऊ शकतात. म्हणून कीटक नाशकांची प्रचंड प्रमाणात फवारणी केलेल्या भाज्या खाणे जास्तीत जास्त टाळावे. यासाठी तर पावसाळ्यात रानभाज्यांचा आस्वाद घेतला पाहिजे.

[1] शेवगा : Heterogeneous

शेवगा ही महाराष्ट्रातील बहुतांश भागात आढळणारी वनस्पती आहे. शेवग्याला वर्षभर नवीन पालवी येते आणि वर्षभर लागतात मृग नक्षत्राच्या पहिल्याचे दिवशी महाराष्ट्रात घरोबरी शेवग्याच्या कोवळ्या पानांची भाजी करतात. मृग नक्षत्राची सुरुवात दरवर्षी 7 किंवा 8 जूनला होते. पावसाळ्याचे पहिलेच नक्षत्र म्हणजे मृगशीर्ष नक्षत्र होय.

पावसाळ्यात आपण आजारी पडू नये म्हणून आणि आपली रोगप्रतिकारशक्ती वाढावी म्हणून शेवग्याच्या पानांची भाजी खावी. शेवग्याची भाजी रक्तवर्धक, हाडांना बळकटी देणारी आणि स्त्रियांच्या मासिक धर्मामध्ये निर्माण होणाऱ्या सर्व तक्रारी दूर करणारी आहे. शिवाय सांधेदुखी, कोलेस्ट्रॉल, मधुमेह इत्यादी आजार शेवग्याची भाजी नियमित खाल्ल्याने कमी होतात. शेवग्याची भाजी दातांचे कॅव्हिटीपासून संरक्षण करते. दात मजबूत राहतात. म्हणून शेवग्याच्या शेंगा आणि भाजी नियमित खा.

[2.]मुरुड: Murud vege.

मुरुड ही पावसाळयाच्या सुरुवातीला रानावनात डोंगरदऱ्यात, विशेषतः पश्चिम घाटात आढळणारी वनस्पती आहे .मृगाचा दमदार पाऊस लागला की मुरुडाची भाजी टरारूने येते. ही भाजी जमिनीतून उगवताच तिचा शेंडा मुरडून म्हणजे गुंडाळूनच उगवतो .म्हणूनच तिला मुरुड हे नाव पडले. काही भागात मुरडू असेही म्हणतात. ही भाजी पावसाळयाच्या सुरुवातीलाच म्हणजे मृग नक्षत्रातच उगवते. त्यामुळे या मोसमात मुरडाची भाजी भरपूर खावी. लहान मुले भाजी खात नसतील तर त्यांना या भाजीचे सूप [soup] दयावे. या भाजीत प्रचंड प्रमाणात रोगप्रतिकारशक्ती असते. हाडे बळकट होतात. या भाजीला अंकूर येताच तो खूडून घेऊन तिची भाजी करावी.नक्कीच मुरुडाची भाजी खा आणि आरोग्यसंपन्न बना. मुरुड वनस्पती किंचित नेचे वनस्पतीशी मिळतीजुळती आहे.

[3]अळू: Alu

अळू ही महाराष्ट्रात सर्वत्र आढळणारी वनस्पती आहे. विशेषत: कोकण किनारपट्टी, पश्चिम घाट, विद‌र्भात विपुल प्रमाणात आढळते. अळूला काही ठिकाणी छोपा किंवा आरवी असेही म्हणतात .अळू ही एक लोकप्रिय वनस्पती आहे.

सर्वसाधारणपणे रंगावरून आणि गुणधर्म- वरून अळूचे दोन प्रकार पडतात. 1.) काळे अळू. २) हिरवे अळू. काळे अळू चविष्ट असतात. हिरव्या अळमुळे घशात थोडी खवखव होते. अळू ही बारमाही येणारी वनस्पती आहे. उन्हाळ्यात अळूला नियमित पाणी दिल्यास अळूची भाजी नियमित खाता येते. गौरी-गणपतीच्या सणादिवशी विशेषतः ज्या दिवशी गौरीचे आगमन होते, त्या दिवशी अळूच्या वड्या आणि तांद‌ळाची भाकरी घरोघरी असते. अळूच्या पानांचे गरगटेही खूप छान लागते. काही ठिकाणी त्याला फद‌फदे असेही म्हणतात. अळूची पाने कच्ची खाल्ल्यास त्यात असणाऱ्या कॅल्शिअम ऑक्झलेटमुळे घशाला खवखव होते. मधुमेही रोग्यांसाठी अळूच्या पानांच्या वड्या किंवा

अळूचे गरगटे वरदान असते. अळूमध्ये भरपूर फायबर आणि कार्बो होयड्रेट असते. याशिवाय जीवनसत्व A,C,E,B-6 मुबलक असते. मॅग्नेशिअम, लोह, तांबे,जस्त फॉस्फरस, पोटॅशिअम इत्यादी घटक
अळूच्या भाजीतून आपल्याला मिळतात.

HB कमी असलेल्या मुलींना अळूची भाजी नियमित खावी.

[4.) पाथरी: Pathari :

पाथरीची वनस्पती पश्चिम घाट, विद‌र्भात मुबलक प्रमाणात आढळते. पाथरीला स्थानिक भाषेत काही ठिकाणी पातरी, पात्री असेही म्हणतात. साधारणतः पाच ते दहा सेमी उंची असलेली ही छोटीशी वनस्पती म्हणजे पानांचा गुच्छच होय. जून महिन्यात पाऊस चालू झाला की पाथरीची भाजी उगवायला सुरुवात होते. डोंगर-कपारीत शेताच्या बांधावर पाथरीची भाजी उगवते. पाथरीची भाजी चिरून, उकडून घेऊन करतात. पाथरीच्या कोवळ्या पानांची भाजी अधिक रुचकर लागते.इतर भाज्यांप्रमाणे पाथरीची भाजी सु‌द्धा रोगप्रतिकारक आहे. शिवाय त्वचारोग कमी करण्यासाठी पचनक्रिया सुधारण्यासाठी पाथरीची भाजी गुणकारी आहे. कावीळ, यकृताच्या विकारात पाथरीची भाजी खूप फायदेशीर आहे. बाळंतीण स्त्रियांना भरपूर दूध येण्यासाठी पाथरीची भाजी देतात. या भाजीपासून भरपूर ऊर्जा मिळते. किडनीविकार कमी करण्यासाठी पाथरीची भाजी उपयुक्त ठरते. पावसाळ्यात भरपूर पाथरीची भाजी खा आणि आरोग्यसंपन्न बना.

[5]कुरडू:Kurdu

महाराष्ट्रातील बहुतांश प्रदेशात विशेषतः पश्चिम घाट ,विदर्भात हमखास कुरडूची भाजी आढळते.  कुरडूची भाजी मुरुड प्रमाणेच चविला रुचकर आणि पौष्टिक असते.

कुरडूची वनस्पती दोन प्रकारची असते. एक लांब पानाची ..म्हणजे साधारण तुरीच्या पानांच्या आकाराची पाने असलेली;तर दुसरी गोल पानांची. म्हणजे आपट्याची लहान पाने असतात तसा आकार असलेली वनस्पती असते. ही भाजी डोंगराळ भागातील शेतवडीत किंवा डोंगरकपारीत आढळते. कुरडूची भाजी थोडी जून झाली की तिला गुलाबी-पांढरे तुरे येतात.

कुरडूची भाजी मुतखड्यावर खूप गुणकारी आहे. किडनीच्या सर्व आजारावर कुरडूची भाजी खूप उपयुक्त आहे. ताप आल्यावर तोंडाची चव गेली असल्यास कुरडूची भाजी खावी. पित्त विकार , डोळ्यांचे विकार ,मुळव्याध यावरही ही भाजी उपयुक्त आहे.

[6.] भारंगी:Bharangi

महाराष्ट्रातील पश्चिम घाटात सर्वत्र आढळणारी भारंगीची भाजी खूप रुचकर पौष्टिक आणि आरोग्यदायी असते.भारंगीची भाजी डोंगरी प्रदेशात हमखास मिळतेच. छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या आहारात पावसाळ्यात भारंगीच्या भाजीचा समावेश असे. पावसाळा सुरु झाल्यानंतर साधारणतः उपलब्ध एक ते दीड महिन्यांनी भारंगीची भाजी उपलब्ध होते. ऑगस्ट महिन्यानंतर या भाजीला फुलांचा तुरा येतो. त्यावेळी भारंगीची भाजी खाण्यास अयोग्य होते.

सर्दी, कफ, खोकला, दमा, डोकेदुखी, ताप इत्यादी विकार भारंगीची भाजी पावसाळ्यात ‌ नियमित खाल्ल्याने होत नाहीत. भारंगीबरोबरच सर्वच प्रकारच्या भाज्यांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती प्रचंड असते. म्हणून पावसाळ्यात भरपूर रानभाज्या खा आणि निरोगी बना. रानभाज्या खाणाऱ्या लोकांचे आयुर्मान अधिक असते. हेही लक्षात घ्यावे.

[7.] मोरशेंड:Morshend

‘मोरशेंड’ ही वनस्पती पावसाळा सुरु झाल्यानंतर साधारणतः पंधरा दिवसांनी रानावनात मिळायला सुरुवात होते. मोरशेंड या भाजीला मोरशेंडा सुद्धा म्हणतात, तर महाबळेश्वर परिसरात या भाजीला मोरचवडा म्हणतात. या भाजीच्या पानांचा आकार मोराच्या चवड्याच्या आकाराशी मिळताजुळता आहे. म्हणूनच या भाजीला मोरचवडा असे म्हणतात.

मोरशेंडाची भाजी खायला लुसलुशीत आणि चवीला रुचकर असते.

मोरशेंडाची भाजी पश्चिम घाटात , विदर्भ, मराठवाडा ,खानदेश इत्यादी महाराष्ट्रातील विभागात आढळते.

संधिवाताच्या विकारात या भाजीचा उपयोग होतो.ही भाजी रक्तातील उष्णता कमी करते. पावसाळ्यात जून ते ऑगष्ट महिन्यात अधिक प्रमाणात सापडणाऱ्या या भाजीच्या सेवनाने रक्तातील युरिक ॲसिड कमी होऊन सांध्यांची सूज कमी होते. मोरशेंडांच्या कोवळ्या पानांची भाजी करा आणि निरोगी जीवन जगा.

[8].करटोली/काटले/कंटोली/रानकारले.kartoli/katle/rankarle.

करटोली ही वेलवर्गीय वनस्पती असून या वनस्पतीच्या वेलीला करटोली लागतात. पावसाळ्यात मुबलक प्रमाणात करटोली मिळतात. विशेषत: डोंगरी प्रदेशात करटोलीच्या वेली आढळतात.

पावसाळ्यात करटोलीची भरपूर भाजी खाल्ली पाहिजे. करटोलीची फळे चिरून त्याची भाजी बनवतात. ही फळे खूप आरोग्यदायक आहेत. करटोलीमध्ये ‘अँटी ऑक्सिडंट फायबर मुबलक प्रमाणात असतात. ही भाजी पचायला खूप हलकी असून पावसाळ्यातील रोगांपासून आपला बचाव करण्यासाठी करटोलीची भाजी खाल्ली पाहिजे.बद्‌धकोष्टता असणाऱ्या लोकांनी करटोलीची भरपूर भाजी खाल्ली पाहिजे. सर्दी, पडसे, मधुमेह, त्वचारोग इत्यादी आजारावर करटोली गुणकारी आहे.

करटोलीला वैगवेगळ्या प्रदेशात करटोली, काट्ली, कुंटोली, रामकारली, करटुली अशी विविध नावे आहेत.

[9] टाकळा.Takala

टाकळ्याची वनस्पती महाराष्ट्रात सर्वत्र आढळते. उंचीने 50 से 100 मी असलेल्या टाकळ्याचे खोड खूप चिवट असते.पावसाळ्यात टाकळ्याच्या कोवळ्या पानांची भाजी करतात. टाकळ्याची भाजी गुणाने उष्ण असल्याने शरीरातील वात व कफ कमी करण्यास मदत करते. टाकळ्याला स्थानिक भाषेत तरोटा, तरवटा अशीही नावे आहेत. टाकळ्याची पाने आपट्याच्या पानांसारखी असतात.

त्वचारोगासाठी टाकळ्याची भाजी गुणकारी असून पावसाळ्यात अधूनमधून टाकळ्याची भाजी खाल्ली पाहिजे. टाकळ्याच्या भाजीमुळे शरीरातील अतिरिक्त मेद (चरबी) कमी होतो. या भाजीत फायबर भरपूर असल्याने पोटाच्या तक्रारी कमी होतात.पोट साफ होते.

[10] माठ: Math

‘माठ’ ही वनस्पती भारतात सर्वत्र आहे. साधारणतः 50 ते 100 सेमी उंची असलेली ही वनस्पती बारमाही उपलब्ध होते. घराशेजारील बागेत, परसदारात माठेचे बी टाकल्यास आपल्याला वर्षभर भाजी खायला मिळते.

माठाच्या कोवळ्या पानांची भाजी पटकन शिजते. कमीत कमी तेल घालून भाजीला फोडणी द्यावी. तेल वापरले नाही, तरीही ही भाजी रुचकर होते. माठाची भाजी आरोग्यासाठी खूप फायदे‌शीर असते. रक्तातील साखर नियंत्रित करण्यास माठाची भाजी उपयुक्त ठरते. या भाजीत भरपूर लोह असल्याने वयात आलेल्या मुलींनी आणि स्त्रियांनी माठाची भाजी खावी. त्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते. या भाजीला लाल माठ असेही म्हणतात. कारण तिच्या पानांचा रंग किंचित तांबूस असतो.

[11] आघाडा: Aaghada

आधाडा ही महाराष्ट्रात आणि भारतातही अनेक ठिकाणी आढळणारी वनस्पती आहे. या वनस्पतीची उंची साधारणत: 50 ते 80 सेमी असते. पावसाळ्यात आघाड्याची भाजी मुबलक प्रमाणात आढळते. उन्हाळ्यातही ही भाजी काही ठिकाणी आदळते .आघाडा ही औषधी वनस्पती असून डोळ्यांच्या विकारावर ती अत्यंत गुणकारी आहे. आघाड्याच्या देठांचा रस डोळ्यांत घातल्यास डोळ्यांचे विकार बरे होतात. आघाड्याच्या कोवळ्या पानांची भाजी करतात. दात दुखत असल्यास किंवा पोटात दुखत असल्यास आघाड्याची कोवळी पाने चावून खातात. खोकला, कावीळ या आजारांवर आघाड्याची भाजी गुणकारी आहे. गौरी-गणपतीच्या सणात दुर्वांच्या जुडीत आघाड्याची डहाळी असतेच. आघाड्याचे दोन प्रकार पडतात. 1) गोडा आघाडा २) आग्या आघाडा. आग्या आघाड्याला प्रचंड आग असते. याच्या पानांचा पायाला स्पर्श जरी झाला. तरी खाज सुटते. आर्या आघाडा गुणकारी नाही.गोडा आघाडा औषधासाठी आणि भाजीसाठी वापरतात.

[12.] अंबाडी: Ambadi

पावसाळ्यात शेताच्या बांधावर अंबाडीची भाजी मुबलक प्रमाणात आढळते. बाजारात विक्रीसाठीही ही भाजी येते. चवीला किंचित आंबट असली तरी या भाजीत अनेक पोषक तत्त्वे आहेत.

अंबाडीच्या भाजीत लोह भरपूर प्रमाणात असते. शिवाय व्हिटॅमिन सी, A, B-6 कॅल्शिअम ,झिंक आणि अँटी ऑक्सिडंट यासारख्या अनेक पोषक तत्त्वांनी अंबाडीची आजी भरलेली असते. ही भाजी अँटीऑक्सिडंट असल्यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी मदत होते. हाडांची मजबुती होते .अधूनमधून अंबाडीची भाजी आवश्य खाल्ली पाहिजे. या भाजीला अंबाडा असेही म्हणतात

[13]शेंडवेल/मोहर: shendvel/mohar

पावसाळ्यात जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात शेंडवेलीची भाजी मिळते. ही भाजी वेलवर्गीय आहे. वेलीचा शेंड खुडून घेऊन त्याची भाजीकरतात. ही भाजी खूप रूचकर असते.पुढे सप्टेंबर महिन्यात शेंडवेलीला मोहर येतो. या मोहराची पण भाजी करतात. मोहराची भाजी पण खूप चविष्ट असते. पितृपक्षात महालय (महाळ) साजरा करतात. यावेळी मोहराची भाजी आवर्जून असते. ही भाजी खूप रुचकर असते.

मोहराच्या भाजीला महाबळेश्वर परिसरात मोतीचूरची भाजी म्हणतात. मोहराचे लहान लहान कण मोत्यासारखे दिसतात. त्यावरून या भाजीला मोतीचूरची भाजी असेही म्हणतात. मोहराच्या भाजीत सुद्‌धा भरपूर पौष्टिक घटक असतात. त्यामुळे मोहरांच्या हंगामात ही भाजी आवश्य खावी.

[14]. भोपळा/भोपळी pumpkin/bhopala.

भोपळा ही वेलवर्गीय वनस्पती आहे. भारतात, महाराष्ट्रात सर्वत्र, तर परदेशातही भोपळा आढळतो.आपल्या शेतात, परसदारात (परड्यात) घराच्या छपरावर, मांडवावर भोपळ्याचा वेल कुठेही वाढतो. भोपळ्याला कोणत्याही रासायनिक खताची आवश्यकता नाही. शिवाय कीटकनाशकाची फवारणी करण्याची आवश्यकत नाही.म्हणून भोपळा सेंद्रीय स्वरूपात मिळतो.भोपळ्याच्या पानांचा ,बियांचा,फळांचा आपल्या आहारात विविध पदार्थ बनवण्यासाठी केला जातो.

भोपळ्याचे विविध गुणधर्म आणि उपयोग लक्षात घेऊन 26 ऑक्टोबर हा राष्ट्रीय भोपळा दिवस म्हणून साजरा केला जातो.

भोपळ्याच्या बियाः

भोपळ्याच्या बिया खूप गुणकारी आहेत. यांत मॅग्नेशिअम, अँटि-ऑक्सिडंट मुबलक आढळते. पुरुष आपली प्रजननक्षमता वाढ‌वण्यासाठी भोपळयाच्या बिया खातात. कर्करोगाचा धोका टाळण्यासाठी आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी भोपळ्याच्या बिया खातात.

भोपळ्याचे फळ:

भोपळ्याच्या फळांची भाजी खाल्ल्याने डोळे निरोगी राहतात. बीटा कॅरोटीन हे पोषक तत्त्व भोपळ्यात मोठ्या प्रमाणात असते.भोपळ्यात कॅल्शिअमही मोठ्या प्रमाणात आढळल्यामुळे हाडे मजबूत होतात.

मकरसंक्रातीच्या सणाला महाराष्ट्रात भोपळ्याच्या घाऱ्या करतात. या घाऱ्या खाण्यास खूप रुचकर असतात.

भोपळ्याच्या पानांची भाजी:

भोपळ्याच्या पानांच्या भाजीला भोपळीची भाजी असेही म्हणतात. गौरी- गणपती सणाच्या दिवशी भोपळीच्या भाजीचा मान मोठा असतो .या सणात महाराष्ट्रात घरोघरी भोपळीची भाजी असते. भोपळीच्या पानामध्ये फायबर भरपूर असते.त्यामुळे पचनक्रिया सुधारते. शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते.

भोपळ्याच्या फुलांचीही भाजी करतात ही भाजी सुद्‌धा रुचकर होते.

संभाजी पाटील
राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित मुख्याध्यापक .माजी शिक्षण विकार अधिकारी, राधानगरी.

Leave a comment