कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या गडांपैकी आणखी एक गड म्हणजे ‘सामानगड’ होय. येथील अत्यंत निसर्गरम्य ठिकाण, गर्द राई आणि थंडगार वारा अनेक पर्यटकांना आकर्षित करतो. आल्हाददायक वातावरणामुळे येथे अनेक योगशिबिरे आयोजित केली जातात. या गडाची माहिती पुढीलप्रमाणे:
गडाचे नाव : सामानगड किल्ला
समुद्रसपाटीपासून : सुमारे 900 किमी
किल्ल्याचा प्रकार : गिरिदुर्ग,डोंगरी
चढाईची श्रेणी : सोपी
तालुका : गडहिंग्लज
जिल्हा : कोल्हापूर
जवळचे गाव : गडहिंग्लज
डोंगररांग : कोल्हापूर, सह्याद्री
सध्याची अवस्था : डागडुजी आवश्यक
कोल्हापूरपासून अंतर : 70 किमी
सामानगडला कसे जाल?How to go to samangad ?
कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्याच्या हद्दीत सामानगड येतो. कोल्हापूरहून दक्षिणेला 70 किमी अंतरावर सामानगड आहे. कोल्हापूर-गारगोटी- गडहिंग्लज-सामानगड असे जाता येते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आंबोली घाटातूनही सामानगडला जाता येते.
गडहिंग्लज तालुक्यात असणारा हा एकमेव किल्ला या तालुक्याचे वैभव आहे. तालुक्याच्या डोंगराळ आणि दुर्गम भागात हा किल्ला विसावलेला आहे. आंबोली घाटाजवळ डोंगरमाथ्यावरच हा किल्ला बांधलेला आहे.
सामानगड परिसरात खूप औषधी वनस्पती होत्या. या आरोग्यदायी वनस्पतींचा ठेवा आपण जपून ठेवला पाहिजे होता. कोल्हापूर जिल्ह्यातून ‘नरक्या’ वनस्पतींची मोठ्या प्रमाणात तस्करी होते. सामानगड परिसरातही ही वनस्पती आढळते. ही तस्करी रोखण्यासाठी नागरिकांनी सतत जागरूक राहिले पाहिजे.
गर्द राई, थंडगार हवा, भरपूर ऑक्सिजन यांमुळे येथील वातावरण खूपच आल्हाददायक आहे. ‘सामानगड’ पर्यटकांचे आकर्षणकेंद्र बनला आहे. हवा पालटण्यासाठी आणि उन्हाळ्यातील उष्मा कमी करण्यासाठी अनेक लोक सामानगडावर येतात. अगदी कडक उन्हाळ्यातही येथील आल्हाददायक हवा पर्यटकांना खेचून घेते.
सध्या सामानगडावर योगसाधनेची अनेक शिबिरे भरतात. एके काळी रयतेचे संरक्षक म्हणून किल्ल्यांकडे पाहिले जात होते. सध्या आरोग्यरक्षक म्हणून पाहिले जाते. शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी सामानगडावर सिद्ध समाधी, योगची (S.S.Y.) कितीतरी शिबिरे संपन्न झाली आहेत. म्हणूनच सामानगडाला भेट द्यावी असाच हा किल्ला आहे.
इतिहास :History
कोल्हापूर जिल्ह्यातील इतर गडांप्रमाणेच सामानगड बांधणीचे श्रेय शिलाहार राजा विक्रमादित्य भोज (दुसरा) याच्याकडेच जाते. बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात या किल्ल्याची बांधणी केलेली आहे. इ. स. 1667 मध्ये हा किल्ला शिवरायांनी जिंकून आपल्या ताब्यात घेतला. या किल्ल्याचा किल्लेदार म्हणून शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्री सबनीस यांनी काम पाहिले होते. शिवरायांच्या आदेशानुसार अण्णाजी दत्तो यांनी गडाची पुनर्बाधणी केली. दक्षिण सुभ्याची सबनिशी त्यांच्याकडेच होती.
इ. स. 1688 मध्ये हा किल्ला मोगलांनी आपल्या ताब्यात घेतला; परंतु मराठ्यांनी तो किल्ला पुन्हा आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर शहाजादा बेदारबख्त याने किल्ल्यास वेढा घालून किल्ला जिंकून आपल्या ताब्यात घेतला व शहामीर यास किल्लेदार म्हणून नेमले.
इ. स. 1704 मध्ये मराठ्यांनी किल्ल्यावर हल्ला करून आपल्या ताब्यात घेतला. शिवपूर्वकाळ ते अठराव्या शतकाचा उत्तरार्ध या काळात या गडाने अनेकलढाया पाहिल्या आहेत. मराठ्यांच्या सत्तेचे अनेक चढउतार पाहिले आहेत. 18 व्या व 19व्या शतकांमध्ये या परिसरांमध्ये निपाणीकर देसाई आणि पुढे कोल्हेराव पटवर्धन यांचा या परिसरास – गडहिंग्लज गावास उपद्रव सोसावा लागला. इ. स. 1704 नंतर या किल्ल्याचे अधिपती करवीरकर छत्रपती होते.
इ. स. 1844 मध्ये सामानगडावरील गडकऱ्यांनी इंग्रजांविरुद्ध बंड केले. बंडाचे नेतृत्व मुंजाप्पा कदम व इतर गडकऱ्यांनी केले. या वेळी स्थानिक लोकांनी चांगली साथ दिली. हे बंड 350 गडकऱ्यांनी केले होते. त्यांच्याकडे 10तोफा, 100 बंदूकधारी व 200 सैनिक होते. एवढ्या मूठभर सैन्याने दोनदा इंग्रजांना माघारी परतवून लावले होते. शेवटी 13 ऑक्टोबर 1844 मध्ये हा गड इंग्रजांनी जिंकून आपल्या ताब्यात घेतला. त्या वेळी तोफांमुळे किल्ल्याची बरीच नासधूस झाली.
सरसेनापती प्रतापराव गुर्जर यांच्या बलिदानाची साक्ष देणारा हा किल्ला आहे. प्रतापराव गुर्जरांनी बेहलोलखानाला पराभव करून पकडून ठेवले होते. त्याने शरणागती पत्करल्यावर प्रतापरावांनी शिवरायांच्या अपरोक्ष बेहलोलखानाला माफ करून सोडून दिले होते. शिवरायांना या गोष्टीचा खूप राग आला होता. ‘बेहलोलखानाला मारल्याशिवाय आम्हास तोंड दाखवू नये’ असे खरमरीत पत्र त्यांनी प्रतापरावांस धाडले होते. ही गोष्ट प्रतापरावांच्या जिव्हारी लागली होती. त्यांनी बेहलोलखानावर पुन्हा हल्ला करण्याचा बेत आखला होता. त्या वेळी प्रतापराव आणि त्यांचे साथीदार सामानगडावर होते. येथूनच ते ‘वेडात दौडले वीर मराठे सात’ या उक्तीप्रमाणे केवळ सात जण बेहलोलखानावर गडहिंग्लज फाट्याजवळ तुटून पडले. त्यात सातही जणांचा अंत झाला असला तरी त्यांच्या पराक्रमाची साक्ष या सामानगड परिसरातच आहे हे विसरून चालणार नाही.
गडावरील स्थळे :
सोंडी बुरूज :
गडावरील सर्वांत उंच भाग म्हणजे ‘सोंडी बुरूज’ होय. या बुरुजावरून बंदुकांच्या आणि तोफांच्या साहाय्याने शत्रूवर मारा करण्यासाठी अनेक जागा आहेत. शिवाय दूरच्या प्रदेशाची टेहळणी करण्यासाठी या बुरुजाचा चांगला उपयोग केला जात असावा. हा बुरूज गडाचा संरक्षक बुरूज म्हणून पाहिला जात असे.
हनुमंत विहीर :
पूर्वी गडावर मुबलक प्रमाणात पाणी आढळत असे. त्यांपैकीच ‘हनुमंत विहीर’ एक पाण्याचे स्रोत असलेले ठिकाण आहे. विहिरीत खाली उतरवण्यासाठी खडकांत खोदलेल्या पायऱ्या आहेत. तसेच एकासमोर एक अशा पाच कमानी आहेत. त्यांतील मधल्या कमानीवर हनुमंताची मूर्ती कोरलेली आहे. त्यावरूनच या विहिरीचे नाव ‘हनुमंत विहीर’ असे पडले आहे.
मारुती मंदिर :
सामानगडाच्या पश्चिमेच्या बाजूला एक ‘मारुती मंदिर’ आहे. हे मंदिर प्राचीन वाटते. मंदिराचा गाभारा दगडी बांधणीचा आहे. मंदिराच्या गाभाऱ्यासमोर मंडप आहे. या मंडपाची लांबी 100 फूट व रुंदी 84 फूट आहे. सध्या या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला असून गाभाऱ्यात मारुतीची मूर्तीही बसवलेली आहे.
बौद्धकालीन गुहा :
बौद्धकाळात आणि राष्ट्रकूट काळात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गुहांचे खोदकाम केल्याचे आढळते. याच काळातील गुहा येथे पाहायला मिळते. हनुमान मंदिराजवळच ही गुहा असून गुहेचा मार्ग उत्तरेकडे आहे. आत पाच कमानी आहेत. गुहेत सभोवताली बौद्ध भिक्षूना राहण्यासाठी खोल्या खोदलेल्या आहेत. गुहेत शेवटी महादेवाची पिंडी आहे. सध्या या गुहेची डागडुजी केलेली आहे.
शिवकाळात आणि त्यानंतरही गडहिंग्लज, सामानगड परिसरात शत्रूनी हल्ले केले. गड कधी मराठ्यांच्या ताब्यात तर कधी शत्रूच्या ताब्यात असायचा. प्राचीन काळापासून कोल्हापूर प्रांतावर अनेक सत्ता होत्या. इ. स. 11 वे शतक व इ. स. 13वे शतक या काळात कोल्हापूर, बेळगाव, कोकण, मिरज परिसरात शिलाहार राजघराण्याची सत्ता होती. याच घराण्यातील विक्रमादित्य राजा भोज (दुसरा) याने कोल्हापूर विभागात मोक्याचे पंधरा किल्ले बांधले. त्यांतीलच हा एक गड होय.
शिलाहार राजघराण्यातील सत्तेनंतर मराठे,मोगल,राष्ट्रकूट, आदिलशाही अशा अनेक सत्ताधीशांनी गडावर राज्य केले. 13 ऑक्टोबर 1844 मध्ये इंग्रजांनी हल्ला करून गड ताब्यात घेतला. त्यानंतर तो दीर्घकाळ इंग्रजांच्या ताब्यात राहिला.
इ. स. 1854 मध्ये कोल्हापूर संस्थानाची पुनर्रचना झाली होती. त्यात दाजीकृष्ण पंडितांनी राज्यकारभाराच्या सोईसाठी अनेक ठिकाणी बदल केले. त्यावेळी सामानगडावरील कचेऱ्या हलवून गडहिंग्लजला आणल्या. करवीर संस्थानने सामानगडऐवजी गडहिंग्लजला प्रशासकीय कामाचा पेठा केला होता. आज गडहिंग्लज हे तालुक्याचे ठिकाण आहे.
राहण्याची व खाण्यापिण्याची सोय :
‘सामानगड’ कोल्हापूरहून सुमारे 70 किमी अंतरावर असल्याने दूरच्या पर्यटकांनी कोल्हापुरात मुक्काम करून सकाळी प्रवासास सुरुवात केल्यास 9-10 वाजता सामानगडावर पोहोचता येते. दिवसभर किल्ला पाहून सायंकाळी परतता येते.
गडहिंग्लज हे तालुक्याचे ठिकाण असल्याने तेथेही मुक्कामाची व खाण्यापिण्याची सोय आहे. गडहिंग्लजला मुक्काम केल्यास सामानगडासह सरसेनापती प्रतापराव गुर्जर स्मारक, पारगड, आंबोली परिसर पाहून खाली कोकणात उतरता येते.