Karnataka हे महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेले राज्य. पर्यटकांसाठी नंदनवन असलेल्या कर्नाटकात अनेक आकर्षक प्रेक्षणीय स्थळे आहे. काही स्थळे ऐतिहासिक वारसा असलेली आहेत; तर काही स्थळे निसर्गाचे स्वर्गीय सौंदर्य लाभलेली आहेत. तर काही तीर्थक्षेत्रे, पवित्र क्षेत्र, धार्मिक वारसा असलेली स्थळे आहेत. यांतील काही ठिकाणांची आपण ओळख करून घेणार आहोत——
1. गुलबर्गा Gulbarga / Kalaburagi:
गुलबर्गा हे खूप मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेले प्रेक्षणीय आणि ऐतिहासिक स्थळ आहे. बहमनी साम्राज्याचा पाया घातला गेला तो याच शहरात. त्याच गुलबर्गाविषयी आता आपण माहिती घेणार आहोत.
* गुलबर्गा पाहायला कसे जाल ? How to go to Gulbarga & kalaburagi?
गुलबर्गा हे प्रसिद्ध प्राचीन शहर सध्या कलबुर्गी नावाने ओळखले जाते.
* महाराष्ट्रातील सोलापूरहून अक्कलकोट मार्गे बसने गुलबर्गा पाहायला जाता येते. सोलापूर ते गुलबर्गा 124 किलोमीटर अंतर आहे.
* अक्कलकोटहून गुलबर्गा (कलबुर्गी) खूप जवळ आहे. अक्कलकोट ते गुलबर्गा (कलबुर्गी) 88 किलोमीटर आहे.
* तेलंगणाची राजधानी हैद्राबाद येथून गुलबर्गा (कलबुर्गी) 230 किलोमीटर अंतरावरआहे.
* निपाणीहून गुलबर्गा (कलबुर्गी) 315 किलोमीटर आहे.
* कर्नाटकची राजधानी बेंगळूरुपासून कलबुर्गी (गुलबर्गा) 346 किलोमीटर अंतरावर आहे.
गुलबर्गा या शहराला खूप मोठा ऐतिहासिक वारसा असून हसन गंगूने बहमनी सत्तेची स्थापना 1347 मध्ये केली गुलबर्गा येथेच केली.हसन गंगूने स्वतःला अबुल मुझफ्फर अल्लाउद्दीन बहमन शाह असे नाव धारण करून घेतले. ही शाही पुढे बहमनशाही या नावाने ओळखली जाऊ लागली.इ. स. 1518 मध्ये बहमनशाहीचे विभाजन होऊन बरीदशाही, निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही अशी नवीन साम्राज्ये निर्माण झाली. बहमनशाहीच्या पूर्वी कलबुर्गी येथे बाराव्या शतकात राष्ट्रकुट- चालुक्य यांची सत्ता होती.
बुद्ध विहार गुलबर्गा : Buddha Vihar, Gulbarga.
गुलबर्गा शहरात प्रसिद्ध असलेले बुद्ध विहार खूप सुंदर, स्वच्छ आणि देखणा आहे. दक्षिण भारतातील सर्वांत मोठा बुद्ध विहार अशी या विहाराची ओळख आहे. हा बुद्ध विहार 70 एकर जागेत आहे. येथील गौतम बुद्धाची मूर्ती खूप सुंदर आणि नक्षीदार आहे.
शरण बसवेश्वर मंदिर: गुलबर्गा :- Basaveshwar Temple, Gulbarga:
लिंगायत संत बसवेश्वर यांचे गुलबर्गा येथील मंदिर दातृत्वासाठी प्रसिद्ध आहे. अनेक मंदिरे दान गोळा करण्याचे काम करतात.अनेक सामाजिक कामे या मंदिराने केलेली आहेत. बसवेश्वर मंदिरे नेहमीच समाजासाठी विधायक काम करते. मंदिरालगतच असलेल्या सरोवरामुळे येथील मंदिर परिसराचे सौंदर्य खुलले आहे.
जामा मशिदः गुलबर्गा Jama Masjit: Gulbarga.
कर्नाटकातील गुलबर्गा येथे असलेले जामा मशिद दक्षिण आशियात प्रसिध आहे. या मशिदीचे सौंदर्य आणि रचना अद्भुत आहे.
2. नागरहोल राष्ट्रीय उद्यान, Nagarhol National Park:
नागरहोल राष्ट्रीय उद्यान राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान या नावाने सुद्धा ओळखले जाते. हे उद्यान वाघांसाठी राखीव आहे. सुमारे 640 चौरस किलोमीटर क्षेत्रात विखुरलेल्या या उद्यानात (जंगलात) वाघ, आशियाई हत्ती, सांबर, जंगली कुत्रे, तेंदूवा इत्यादी जंगली प्राण्यांबरोबरच वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांचेही वास्तव्य आहे. बंगाली वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या या अभयारण्याची कमांडर जीपमधून आवश्य सफारी करा.
* नागरहोल राष्ट्रीय उद्यान निपाणीतून 622 किलोमीटर अंतरावर आहे.
* म्हैसूर या कर्नाटकातील प्रसिद्ध शहरापासून नागरहोल राष्ट्रीय उद्यान केवळ 61 किलोमीटर अंतरावर आहे.
* बंगळूरु या कर्नाटकातील राजधानीच्या शहरापासून नागरहोल राष्ट्रीय उद्यान 200 किलोमीटर अंतरावर आहे.
3. जोग धबधवा, कर्नाटक: Jog falls, Karnataka
कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यातील जोग धबधबा कर्नाटक राज्यातील एक महत्त्वपूर्ण धबधबा मानला जातो. जोग धबधबा गिरसप्पा धबधबा या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे. कर्नाटकातील शरावती नदीवर तयार झालेला हा नैसर्गिक धबधबा भारतातील काही उंच धबधब्यांपैकी एक आहे. शरावती नदीचे उंचावरून पडणारे पाणी, सभोवार गर्द राई आणि इंद्रधनुष्याचा खेळ पाहण्यात काही क्षण आपण स्वतःला विसरून जातो. असेच हे निसर्गरम्य आणि विलोभनीय ठिकाण आहे.
* कर्नाटकची राजधानी बेंगळुरु पासून 428 किलोमीटर अंतरावर जोगचा धबधबा आहे.
* गोकर्ण महाबळेश्वर पासून जोगचा धबधबा 120 किलोमीटर अंतरावर आहे.
* बेळगावी या महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेल्या शहरापासून जोगचा धबधबा 244 किलोमीटर अंतरावर आहे.
4. कुर्ग: Kurga: Karnatak:
कुर्ग हे कर्नाटकातील पश्चिम घाटात असलेले कोडागू जिल्ह्यातील निसर्गरम्य ठिकाण आहे. कुर्गचे देखणे निसर्ग सौंदर्य पाहून कुर्गला भारतातील स्कॉटलंड असे म्हटले जाते. कुर्गचे निसर्ग सौंदर्य, चहा-कॉफीचे मळे आणि आल्हाददायक हवा, सारे काही अद्भुत असेच आहे. निसर्गाच्या सानिध्यात, शांत वातावरणात काही काळ घालवण्यासाठी कुर्ग या निसर्गरम्य ठिकाणात अनेक रेस्टॉरंट आहेत. आयुष्यात एकदा तरी कुर्गला भेट द्या. ऑक्टोबर, नोव्हेंबर, सप्टेंबर, मार्च, एप्रिल, मे या महिन्यांत केव्हाही कुर्गचे डोळ्यांत न सामावणारे निसर्गसौंदर्य पाहायला जायला हरकत नाही.
* कुर्ग/मडीकरी हे ठिकाण बेंगळुरुपासून 260 किलोमीटर अंतरावर आहे.
* म्हैसूर या कर्नाटकातील प्रसिद्ध शहरापासून कुर्ग (Madikeri) हे निसर्गरम्य ठिकाण 120 किलोमीटर अंतरावर आहे.
5. चिकमंगळूर Chikk mangaluru:
चिकमंगळूर हे कर्नाटकातील थंड हवेचे ठिकाण आहे. भारताच्या माजी आणि पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा चिकमंगळूर हा आवडता मतदारसंघ होय. येथील चिकमंगळूर पिक[टेकडी] प्रसिद्ध आहे. चिकमंगळूर जिल्ह्यात अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. चहा कॉफीचे मळे, रिव्हर हाऊसेस, महात्मा गांधी पार्क, धबधबे हिरेकोलाल तलाव, भद्रा अभयारण्य, अशी कितीतरी प्रेक्षणीय स्थळांना आपण भेट देऊ शकतो. चिकमंगळूर हे कर्नाटक राज्यातील पश्चिम घाटातील एक आकर्षक आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळ असून याठिकाणी कितीतरी रेस्टॉरंट आहेत. त्यामुळे येथे चार दिवस निवांत मुक्काम करून राहण्यास हरकत नाही. सप्टेंबर ते एप्रिल महिन्यात केव्हाही येथे भेट यायला हरकत नाही.
* चिकमंगळूर हे हिल स्टेशन बंगळूरु या राजधानीच्या ठिकाणाहून 244 किलोमीटर अंतरावर आहे.
* गोकर्ण महाबळेश्वरपासून चिकमंगळूर 314 किलोमीटर अंतरावर आहे.
* हुबळीपासून 300 किलोमीटर अंतरावर चिकमंगळूर हे ठिकाण आहे.
आवर्जून वाचावे असे काही