भारताची राजधानी दिल्ली येथे अनेक प्रेक्षणीय अशी पर्यटन स्थळे आहेत. त्यांमध्ये लाल किल्ला, कुतुबमिनार, इंडिया गेट, जामा मशिद, राष्ट्रपतीभवन यांचा समावेश होतो.त्याचबरोबर वंदनीय आणि जेथे नतमस्तक व्हावे अशी काही ठिकाणे आहेत. ती ठिकाणे पुढीलप्रमाणे——-
राजघाट येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची समाधी आहे. विजयघाट येथे भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची समाधी आहे. शक्तिस्थळ येथे भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधानांची समाधी आहे. तर वीरभूमी येथे भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची समाधी आहे. या स्मृतिस्थळांचा आपण परिचय करून घेणार आहोत.
1. राजघाट: Raj ghat, Delhi.
1920 पासून 1948 पर्यंत भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व महात्मा गांधी यांच्याकडे होते. 2 ऑक्टोबर 1969 रोजी जन्मलेल्या मोहनदास करमचंद गांधी यांनी अन्यायाविरुद्ध पहिला लढा तरुण वयातच दक्षिण अफ्रिकेत दिला. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीत महात्मा गांधी यांनी प्रत्यक्ष 1915 साली भाग घेतला. स्वातंत्र्य लढ्यासाठी त्यांनी झोकून देऊन काम करण्यास सुरुवात केल्यावर 12 एप्रिल 1919 रोजी रवींद्रनाथ टागोर यांनी प्रथमच मोहनदास करमचंद गांधी यांना ‘महात्मा’ असे संबोधले .6 जुलै 1944 रोजी रंगून येथून रेडिओवरून नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी गांधीजींना ‘राष्ट्रपिता’ असे संबोधले. अशा प्रकारे मोहनदास करमचंद गांधी राष्ट्रपिता महात्मा गांधी झाले.
1921 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेतृत्व स्वीकारल्यावर गांधीजी अनेक लढ्यांमध्ये सक्रीय झाले 1930 चा मिठाचा सत्याग्रह, अस्पृश्यता निवारण, स्वराज ची घोषणा, स्वदेशी चळवळ, 1942 चे भारत छोडो आंदोलन साबरमती आश्रमाची स्थापना, चरख्याद्वारे सूतकताई करणे अशा काही त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना आहेत. त्याच बरोबर 15 ऑगस्ट 1947 रोजी मिळालेल्या स्वातंत्र्यानंतर भारत पाकिस्तान फाळणीमुळे हिंदू मुस्लिम यांच्यात उसळलेल्या दंगली शांत करण्यासाठी सुरु केलेले आमरण उपोषण संपूर्ण देशभर गाजले .त्याचा परिणाम दंगली कमी होण्यास मदत झाली.
30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसे या माथेफिरूने दिल्ली गेथील बिर्ला हाऊसमध्ये गोळ्या झाडून गांधीजींची हत्या केली. गांधीजींच्या स्मृतिप्रीत्यर्थ या बिर्ला हाऊसमध्ये म्युझिअम आहे. महात्मा गांधी यांची समाधी राजघाट येथे आहे.
दिल्ली येथे यमुना नदीच्या काठावर पश्चिमेच्या बाजूला महात्मा गांधी यांची समाधी आहे. ही समाधी काळ्या संगमरवरी दगडापासून बनवलेली असून समाधीवर गांधीजीनी मृत्यूसमयी उच्चारलेला अंतिम शब्द ‘हे राम’ असा ठळकपणे कोरलेला आहे. समाधी परिसरात सुंदर बाग फुलवली आहे.
2. विजयघाट: Vijay ghat, Delhi
लाल बहादूर शास्त्री हे भारताचे दूसरे अधिकृत पंतप्रधान होय. 27 में 1964 रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे 27 में 1964 ते 9 जून 1964 या कालावधीसाठी गुलजारीलाल नंदा हे हंगामी पंतप्रधान होते. त्यानंतर रीतसर 9 जून 1964 रोजी लाल बहादूर शास्त्री यांची भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाली. 9 जून 1964 ते 11 जानेवारी 1966 या कालावधीत लाल बहादूर शास्त्रींनी भारताचे पंतप्रधानपद भूषविले. त्यांनी ‘जय जवान जय किसान’ ही घोषणा दिली. ही घोषणा आजही अजरामर आहे. स्वच्छ प्रतिमा, निरपेक्ष बुद्धीने काम करणारे पंतप्रधान आणि “मूर्ती लहान पण कीर्ती महान” अशी त्यांची जनमाणसात प्रतिमा आहे.
1965 साली भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले. हे भारत-पाक दुसरे युद्ध होय.1947 नंतर 1965 च्या युद्धातही पाकिस्तानने सपाटून मार खाल्ला. या युद्धात पाकिस्तानचा पूर्ण पराभव झाल्यामुळे पाकिस्तानने शरणागती पत्करली. या शरणागतीतून ताश्कंद करार पुढे आला.
ताश्कंद करार 11 जानेवारी 1966 रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात ताश्कंद येथे म्हणजे उझबेगिस्तान देशात झाला. आंतरराष्ट्रीय समुदायाच्या हस्तक्षेपामुळे भारत आणि पाक यांच्या सीमारेषा युद्धापूर्वी जशा होत्या. तशाच राहिल्या.
ताश्कंद येथे भारत-पाक यांच्यात शांतता करार झाला. या करारासाठी भारताचे प्रतिनिधी म्हणून भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री हजर होते. त्याच वेळी रात्री लाल बहादूर शास्त्री यांना हृदयविकाराचा झटका आला. ते कालवश झाले.
तत्कालीन पंत्रप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी पाकिस्तानवर युद्धात विजय मिळवला. म्हणून त्यांच्या समाधीला विजयघाट असे नाव देण्यात आले. दिल्लीतील रिंग मार्गावर एक चबुतरा आहे. या चबुतऱ्याच्या ठिकाणी लाल बहादूर शाखी यांची समाधी आहे
3. शक्तीस्थळ दिल्ली – Shakti sthal Delhi:
भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या रुपाने भारताला एक कणखर नेतृत्व मिळाले. त्यांच्या धडाकेबाज आणि कणखर नेतृत्वामुळेच त्यांची लोकप्रियता संपूर्ण जगात पसरली होती. इंदिरा गांधी 24 जानेवारी 1966 ते 24 मार्च 1977 या कालावधीत आणि 14 जानेवारी 1980 ते 31 ऑक्टोबर 1984 या दीर्घ कालावधीत भारताच्या पंतप्रधान झाल्या. त्यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक देशहिताय आणि जनहिताय निर्णय घेतले.
इस्रो ही अवकाश संशोधन संस्था इंदिरा गांधींनी स्थापन करून विज्ञान आणि संशोधनाला चालना दिली. पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान यांच्यात अंतर्गत धुसफूस होती .पश्चिम पाकिस्तान नेहमीच पूर्व पाकिस्तानची कोंडी करत असे. यांत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधीनी 1971 साली पूर्व पाकिस्तानला मदत केली. भारत आणि पश्चिम पाकिस्तान यांच्यात तिसरे युद्ध झाले. यात भारताचा विजय झाला पूर्व पाकिस्तान स्वतंत्र देश होऊन त्याने बांगला देश हे नवीन नाव धारण केले.
भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रेरणेने 18 में 1974 रोजी बुद्ध जयंती दिवशी राज्यस्थानातील पोखरण येथे पहिली अणुचाचणी घेतली. या चाचणीला’ ‘ऑपरेशन स्माइलिंग बुद्धा’ असे नाव दिले गेले.
इंदिरा गांधींनी आपल्या कारकीर्दीत अनेक धडाडीचे निर्णय घेतले. गरिबी हटाव, लोकसंख्या नियंत्रण, कसेल त्याची जमीन असे अनेक धडाडीचे निर्णय घेऊन इंदिरा गांधींनी आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवली.देशावर आलेल्या आर्थिक संकटाचे निराकरण करण्यासाठी इंदिरा गांधींनी 25 जून 1975 ते 21 मार्च 1977 या कालावधीसाठी आणीबाणी पुकारली; पण ही आणीबाणी त्यांना अंगलट आली . सत्ता गमवावी लागली. 1980 साली जनतेने पुन्हा इंदिरा गांधींनाच सत्ता दिली.इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान झाल्या.
10 जून 1984 साली जर्नेलसिंग भिंद्रनवाले या आणि इतर अतिरेक्यांना पकडण्यासाठी अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात भारतीय सशस्त्र दलाने ऑपरेशन ब्ल्यू स्टार ही कारवाई केली.त्यात भिंद्रनवाले ठार झाला .इतर अतिरेकीही ठार झाले. काही शरण आले. या कारवाईत इतर अनेक वाईट गोष्टी उघडकीस आल्या यात संपूर्ण शीख समाज दुखावला. बिअंत सिंग आणि सतवंतसिंग या दोन शीख अंगरक्षकांनी इंदिरा गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी 31 ऑक्टोबर 1984 रोजी गोळ्या झाडून हत्या केली.
पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे समाधी स्थळ यमुना नदीच्या काठावर राजघाट येथे आहे. त्यांनी देशाला शक्तिमान बनवले.लढण्याची प्रेरणा दिली. कणखरपणा दिला. म्हणूनच यांच्या समाधी स्थळाला शक्तिस्थळ असे म्हणतात.
4) वीरभूमी: Veer bhumi, Delhi:
भारताचे नववे आणि सर्वांत तरुण पंतप्रधान अशी ओळख असलेले पंतप्रधान म्हणजे राजीव गांधी होय.
राजीव गांधी हे 31 ऑक्टोबर 1984 ते 1 डिसेंबर 1989 या काळात पंतप्रधान होते. राजीव गांधी उच्च शिक्षित असल्यामुळे त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भक्कम आणि धडाडीची पावले उचलली. राजीव गांधी हे तरुण, निरपेक्ष आणि लोकप्रिय पंतप्रधान होते. त्यांची धडाडी पाहून विरोधकांनी असा धसका घेतला होता की किमान वीस वर्षे तरी राजीव गांधी भारताचे पेनुप्रधान राहणार .तसे झाले असते तर भारतात क्रांतिकारी बदल दिसले असते.अनेक परदेशी कंपन्यांचे जाळे भारतात विणले असते. मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली असती.
विरोधकांना असे काहीतरी कोलित हवे होते की ज्यामुळे राजीव गांधी अडचणीत येतील. व्ही. पी. सिंग या बुजुर्ग नेत्याने बोफोर्स तोफा खरेदीची चौकशीची मागणी करून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. विरोधकांना आयते कोलित मिळाले. राजीव गांधी यांची वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या अतिरेकामुळे हकनाक बदनामी झाली. नोव्हेंबर 1989 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणकीत भारतीय कॉंग्रेसचा पराभव झाला. त्रिशंकू सत्ता स्थापनेत व्ही पी. सिंग पंतप्रधान झाले. पुढे चंद्रशेखर पंतप्रधान झाले. अल्पमतातील सरकार कोसळले आणि लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका झाल्या.
या मध्यावधी निवडणुकीचा पहिला टप्पा पूर्ण झाला. दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराच्या वेळी तामिळनाडूतील श्रीपेरंबदूर येथे रात्री दहा वाजता थानू नावाच्या लिबरेशन टायगर ऑफ तमिळ इलम या संघटनेच्या कार्यकर्तीने राजीव गांधींच्या गळ्यात हार घालताना आत्मघातकी बाँब उडवून हत्या घडवून आणली. “राजीव गांधी यांनी श्रीलंकेत शांतिसेना पाठवली होती. त्या शांतिसेनेने तमिळी महिलांवर अत्याचार केल्याचा LTTE चा आरोप होता. त्यातून LTTE ने हे गैर कृत्य केले.
राजीव गांधी यांना देशासाठी वीरमरण आले. म्हणून दिल्ली येथील रिंग रोडवर असलेल्या त्यांच्या समाधीला वीरभूमी असे नाव दिले.