Maharashtra Assembly Election-2024 : कर्जत- जामखेड मतदारसंघात कुणाचे वारे आहे ?

महाराष्ट्र विधानसभेची रणधुमाळी अंतिम टप्प्यात असून सोमवार दिनांक 18 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता प्रचाराची सांगता होणार आहे. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार असून 2024 च्या कर्जत जामखेडच्या विधानसभेचा भावी आमदार कोण होणार ? हे 23 नोव्हेंबर 2024 रोजी निवडणूक निकालानंतर चित्र स्पष्ट होणार आहे. विद्यमान आमदार रोहित पवार यांची लढत त्यांचे 2019 चे पारंपरिक विरोधक राम शिंदे यांच्याशी होणार आहे.

कर्जत जामखेड हा परंपरेनुसार काँग्रेसचा बालेकिला; पण 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत राम शिंदे यांच्या रुपाने या मतदारसंघात कमळ फुलले . राम शिंदे हे स्थानिक उमेद‌वार असून रोहित पवार हे बारामतीचे आहेत. 2014 पासूनच रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातील लोकांच्या गरजा ओळखूनच पुढील निवडणुकीसाठी काम करायला सुरुवात केले होते. पाणी टंचाईचा प्रश्न असो की तरुणांचा बेरोजगार असो, रोहित पवार यांनी मुळाशीच हात घालून 2019 साली प्रथमच आमदारकीची निवडणूक लढवली. त्यांच्या विरुध्द भाजपाचे राम शिंदे उभे होते. राम शिंदे हे तत्कालीन मंत्री होते. मंत्रिपद असूनही या मतदार संघावर त्यांना आपल्या कामाची छाप टाकता आली नाही. इकडे रोहित पवार यांनी मात्र पूर्ण तयारीनिशी आणि प्रचंड जनसंपर्कानिशी मैदानात उडी घेतली. रोहित पवार यांच्या जनसंपर्काच्या जोडीला शरद पवार आणि अजित पवार यांचा मोठा आशीर्वाद होताच . या सर्व घडामोडीमुळे रोहित पवार यांनी राम शिंदे यांच्यावर सुमारे 43000 हून अधिक मताधिक्याने विजय मिळवला. भाजपाचे राम शिंदे यांना हा पराभव चांगलाच जिव्हारी लागला. एका नवख्या उमेद‌वाराकडून राम शिंदे यांचा पराभव झाला होता.

2019 नंतर पुराखालून बरेच पाणी वाहून येते. शरद पवार यांची राष्ट्रवादी फुटली. शरद पवार पुन्हा जोमाने उभे राहतील असे वाटत नसतानाही लोकसभेला त्यांनी (2024 च्या) 10 उमेदवार उभे केले होते. त्यांतील आठ उमेदवार यांनी निवडून आणून आपण अजूनही राजकीय वीणा खाली ठेवला नाही, हे दाखवून दिले.

त्यांच्या सातारचा उमेदवाराचा केवळ तुतारी-पिपाणीच्या गडबडीमुळे निसटता पराभव झाला. अन्यथा त्यांचा स्ट्राइक रेट 90 % झाला असता. गेल्या पाच वर्षात राम शिंदे यांनी सत्तेच्या जोरावर रोहित पवार यांना MIDC किंवा सन्य मार्गाने अडथळा आणण्याचे काम केले. रोहित पवार हे पक्के राजकारणी असल्याने त्यांनी या गोष्टीचे भांडवल करून राम शिंदे यांच्यावर आरोपाच्या फैरी झाडल्या.जनतेची सहानुभूती मिळवण्यास ते यशस्वी झाले. 2022 साली फोडाफोडीच्या राजकारणात महाविकास आघाडीची सत्ता गेली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक बडे नेते अजित पवार यांच्या बाजूने गेले. रोहित पवार यांनी ही पडझड न समजता संधी समजून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला.गेल्या अडीच वर्षांच्या काळात त्यांची प्रतिमा उंचावली.

राम शिंदे यांना आता येथील अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे सहकार्य मिळणार आहे, तर रोहित पवार यांना उद्धवसेना आणि काँग्रेसचे सहकार्य लाभणार आहे.
2019 च्या तुलनेत कर्जत-जामखेड विधान सभेची निवडणूक काट्याची  होणार आहे. रोहित पवार यांना ही निवडणूक सोपी वाटत असली तरी राम शिंदे यांना ही निवडणूक जिंकण्यासाठी आटापिटा करावा लागणार आहे. या निवडणुकीत सध्या तरी रोहित पवार यांचे पारडे जड दिसत असले तरी अंतिम टप्प्यात मतदार काय करतील.? यावरच त्यांचे भवितव्य ठरणार आहे.

Leave a comment