सिद्धार्थ गौतमाने कपिलवस्तू सोडल्यावर मगध देशात प्रवेश केला. राजगृह’ ही मगधची राजधानी. या राजधानीत आल्यावर एक दिवस राजगृह नगराच्या बाहेरच मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी भिक्षा मागण्यासाठी सिद्घार्थ राजगृहात आला.
भिक्षा मागत मागत सिद्धार्थ राजवाड्याजवळ आला होता. सिद्धार्थला पाहण्यासाठी प्रचंड जनसमुदाय जमला होता. राजा बिंबिसारलाही आश्चर्य वाटले. म्हणून त्याने चौकशी केली. तर शाक्य राजपुत्र सिद्धार्थ संन्यास घेऊन नगरात भिक्षा मागत असल्याचे त्याला समजले. सिद्धार्थबद्दल आणि त्याच्या आईला पडलेल्या स्वप्नाबद्दल, त्याच्या भविष्याबद्दल बिंबिसारला कर्णोपकर्णी समजले होते. त्याची अधिक चौकशी करण्यासाठी बिंबिसारने एका सेवकाला सांगितले.
सिद्धार्थने भिक्षा मागून नगराबाहेरील पांडव टेकडीकडे प्रयाण केले. तेथेच तो विसावला होता. सेवकाने सर्वकाही पाहिले आणि ही बातमी राजा बिंबिसारला सांगितली.
राजा बिंबिसारने आपल्या बरोबर मोजकाच लवाजमा घेतला आणि तो सिद्धार्थ गौतमाने ज्या ठिकाणी मुक्काम केला होता, त्या पांडव टेकडीकडे निघाला. राजा स्वतः पांडव टेकडीकडे निघाला. स्वतः पांडव टेकडी चढला आणि सिद्धार्थच्या विसाव्याच्या ठिकाणी गेला. राजा बिंबिसारने एक वेळ सिद्धार्थचा निर्विकार चेहरा पाहिला. त्याच्या जवळ गेला आणि समजूतीच्या स्वरात म्हणाला,
” बाळ सिद्धार्थ, तुझ्या कुटुंबाचे आणि माझे घनिष्ट संबंध आहेत. म्हणून तुझ्याशी प्रेमाने दोन शब्द बोलावे असे वाटते.तू सूर्यवंशी आहेस, राजघराण्यात तुझा जन्म झाला आहे. तू नवतरुण आहेस, तुला भुरळ घालणारे सौंदर्य लाभलेले आहे. प्रचंड सुख तुझ्या पायाशी लोळण घेत असताना तू असा संन्यास घेऊन, सर्वस्वाचा त्याग करून कसा काय राहू शकतोस ? रोज रक्तचंदनाने स्नान करणारा राजपुत्र अशी जाडी भरडी वस्त्रे कशी काय परिधान करु शकतो?”
“”हे सिद्धार्थ, तू राजपूत्र आहेस. दुसऱ्याने दिलेले अन्न तू कसे काय सेवन करतोस? प्रजाजनांचे रक्षण करणे हे तुझे कार्य आहे. वडिलांचे राज्य तुला नको असेल तर माझे अर्धे राज्य स्वीकार कर. मी ते खुशाल देईन, पण आप्त स्वकीयांना दुःखसागरात लोटून संन्यास घेऊ नकोस, सज्जनांचा उद्धार करण्यासाठी तुला तुझा निर्णय बदलावा लागेल.तुला हेही मान्य नसेल तर माझ्या राज्यात सामील हो.. शत्रूला जिंकण्यासाठी मला मदत कर.”
राजा बिंबिसार पुढे म्हणाला, ” हे राजपुत्र, तू धर्म, संपत्ती आणि सुख यांच्या नियमानुसार वाग, या धर्माच्या आणि जीवनाच्या तीन गोष्टीसाठी माणूस धडपडतो, तू मात्र या तिन्ही गोष्टींवर पाणी सोडून संन्यास घेतोस ? तू मानवी जीवनाचा हेतू पूर्ण कर, धनुष्याची दोरी धरण्यास लायक असलेले तुझे बाहू त्रैलोक्य जिंकण्यास समर्थ आहेत. माझे हृदय अनुकंपेने भरून आले आहे. मला तुझी दया येते. तू सर्व सुखांना ठोकरून संन्यास घेऊ नकोस. तुझे सौंदर्य, तुझे तारुण्य नष्ट होण्यापूर्वी त्याचा उपभोग घे.”
“संन्यास घ्यायला तू काही वृद्ध झाला नाहीस. वार्धक्यात धर्माने आणि कर्माने पुण्य मिळते. तू काही वृद्ध झाला नाहीस, सुखे तारुण्यासाठी असतात. संपत्ती मध्यम वयस्करांसाठी असते. धर्म वृद्धांसाठी असतो. आजच्या या जगात यौवन हे धर्माचे आणि संपत्ती शत्रू आहेत .आपण यौवनाला सर्व सुखांपासून जास्त काळ दूर ठेवू शकत नाही. वार्धक्यात चिंतन करायचे असते. गंभीर आणि शांत राहण्यासाठी वार्धक्य तत्पर असते. म्हणून तू यौवनाचा आनंद लूट. जे काम वार्धक्यात करायचे ते तू यौवनात का करत आहेत ? धर्म हे तुझे अंतिम ध्येय असेल तर यज्ञ कर. ध्येयाची प्राप्ती करण्यासाठी अनेकांनी संपत्तीची सत्तेचा वापर केला. मग तुला असे काय झाले आहे ?
बिंबिसार राजाने सिद्धार्थ गौतमाला नाना प्रकारे समजून सांगितले. त्याचा परिणाम गौतमावर काय झाला? त्याने राजा बिंबिसारला काय उत्तर दिले? हे सविस्तर पुढील भागात आपण पाहू.