Maha Kumbh Mela: Or Mahakarmakand? महाकुंभमेळा:की महाकर्मकांड?

भारतात प्राचीन काळापासूनच प्रयागराज, उज्जैन, हरिद्वार आणि त्र्यंबकेश्वर (नाशिक) या चार ठिकाणी आवर्तनानुसार कुंभमेळे आयोजित केले जातात. दर तीन वर्षांनी भारतात कुंभमेळा येतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी दर बारा वर्षांनी महाकुंभमेळा आयोजित केला जातो.

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे बारा वर्षांनी आलेला हा कुंभमेळा आगळावेगळा आहे. 13 जानेवारी 2025 रोजी सुरु झालेला कुंभमेळा 45 दिवसांनी त्याची सांगता होणार आहे. गंगा आणि यमुना नदीच्या संगमावर वसलेल्या प्रयागराज याठिकाणी दर बारा वर्षांनी हा कुंभमेळा साजरा केला जातो. 2025 सालातील कुंभमेळा केंद्रात आणि उत्तर प्रदेशात भाजपाची सत्ता असताना होत असल्याने या कुंभमेळ्याला सरकारने धार्मिकतेचा रंग दिला आहे. मुळात भाजपाचे सरकार धर्मांधतेचा प्रसार आणि प्रचार करुनच सत्तेवर आले आहे. सरकारतर्फे वारेमाप पैशांची उधळण करून धार्मिकतेचे स्तोम माजवण्याचे काम चालू आहे आणि यांत सरकार यशस्वीही झाले आहे.

दोन लाख कोटी पैश्यांची उधळणः

सरकारतर्फेच असे सांगण्यात येत आहे की 2025 च्या कुंभमेळ्यासाठी दोन लाख कोटीहून अधिक पैश्यांची उलाढाल होणार आहे. 45 दिवसात 40 कोटीहून अधिक लोक या कुंभमेळयाला भेट देणार आहेत. त्याचा ताण सरकारी यंत्रणेवर स्थानिक रहिवाश्यांवर निश्चितच पडत आहे. देशाची आर्थिक स्थिती खालावलेली असतानाही अशा प्रकारच्या धार्मिक कार्यावर प्रचंड पैसा खर्च करणे कितपत योग्य आहे? या कुंभमेळ्याच्या तयारीसाठी आणि नियोजनासाठी सरकारने वारेमाप पैसा खर्च केला आहे.

वेगवेगळ्या साधूंना पोसण्यासाठी आणि त्यांचे नखरे पुरवण्यासाठी सरकारने लाखो रुपये खर्च केले आहेत. करत आहे. यांतून काय निष्पन्न होणार आहे? देशातील नागरिकांना आरोग्य, शिक्षण, अन्न, पाणी या मूलभूत सुविधा दर्जेदार पद्धतीने देण्यास सरकार साफ अयशस्वी झाले आहे. रोजगार निर्मितीचा पत्ता नाही IIT सारख्या क्षेत्रातील अभियंते सुद्धा भारतात नोकरीसाठी भटकंती करत असताना सरकार धार्मिक कार्य करण्यात गुंतलेले आहे.

रुपयाची नीचांकी घसरण :

13 जानेवारी 2025 रोजी भारतात महाकुंभमेळा सुरु झाला आणि 14 जानेवारी 2025 रोजी भारतीय रुपयाचे सर्वांत जास्त अवमूल्यन झाले आहे. जागतिक बाजारपेठेत अमेरिकन डॉलरचा भाव वाढला आहे. साहजिकच भारतीय रुपयाचे खूप मोठे अवमूल्यन झाले आहे. एका डॉलरसाठी भारतीयांना 86.63 रू. मोजावे लागणार आहेत. अर्थात भारतीय समाज 21 व्या शतकातही सुस्तावस्थेतच असून या समाजातील 80 % हून अधिक लोकांना अर्थव्यवस्थेतील काडीमात्रही कळत नाही. आणि त्याचाच फायदा सरकार घेत असून काही फुकटच्या योजना त्यांच्या तोंडावर फेकून त्यांना लाचार बनवण्यास सरकार यशस्वी झाले आहे. सरकार आपल्यासाठी काही तरी करत आहे, असेच जनतेला वाटत आहे; पण सरकार पेनकिलर देऊन तात्पुरती मलमपट्ट‌ट्टी करत आहे. आजार मुळासकट उपटून टाकण्याचा अजिबात प्रयत्न करत नाही. असा प्रयत्न करून त्यांना कोणताही राजकीय फायदा होणार नाही,हेही खरे आहे.

रुपयाचे अवमूल्यन असेच होत राहिले तर महागाई प्रचंड वाढेल. देशाची अर्थव्यवस्था प्रचंड ढासळेल. मग देशात आर्थिक मंदी यायला वेळ लागणार नाही. पकिस्तान, श्रीलंका या देशांत जो दुष्काळ पडला आहे, प्रचंड आर्थिक मंदी आली आहे, तीच वेळ भारतावर यायला वेळ लागणार नाही.

पवित्र स्नान की जलप्रदूषण?

प्रयागराज या ठिकाणी पवित्र स्नानाच्या नावाखाली 13 जानेवारी 2025 रोजी सुमारे 1.5 कोटी लोकांनी (भाविकांनी ?) गंगास्नान केले.14 जानेवारी 2025 रोजी सुमारे 3.5 कोटी लोकांनी पवित्र स्नान केले. एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक स्नान करत असतील तर ती गंगा नदी पवित्र कशी राहील? कडक थंडीच्या वेळी थंड पाण्यात प्रवेश केल्यानंतर मूत्रविसर्जन ही नैसर्गिक क्रिया होतेच. 3.5 कोटी पैकी 3 कोटी लोकांचे जरी मूत्र विसर्जन झाले तर पाण्याची अवस्था काय होईल ? असे अशुद्ध पाणी तीर्थ म्हणून प्राशन करणे कितपत योग्य आहे? असे प्रकार फक्त भारतातच होतात.

सिंगापोर देशात पिण्याच्या पाण्यासाठी एक राखीव नदी आहे. तिला Mother River म्हणतात या नदीत किंवा नदीजवळ जायला कुणालाही प्रवेश दिला जात नाही. कोणी चुकून गेला तर त्याला शिक्षा म्हणून दंड (फी) आकारला जातो. आपल्या भारतातील गंगा नदीचे अर्थात पवित्र नदीचे काय ? तिचे पाणी शुद्ध आहे का ? जे जे पाणी अशुद्ध करतात, ते ते सर्व दोषीच आहेत. मग असा प्रकार गंगा नदीत सार्वजनिक रीत्या स्नान करणे योग्य आहे का? मग याला पवित्र स्नान कसे म्हणता येईल ? भारतीयांची ही मानसिकता कधी बदलणार आहे? लोकांनी आपली विवेकबुद्धी कुठे गुंडाळून ठेवली आहे? असे अनेक प्रश्न मनाला पडतात.

साधूच्या जथ्यांचे नखरे :

एरवी हे साधू कुठे गडप असतात काय माहीत. म्हणे तपश्चर्या करतात! यांनी तपश्चर्या करून भारताला कोणती दिशा दिली ? कर्मकांडाशिवाय यांनी जनतेला काय दिले? कुंभमेळ्याच्या ठिकाणी हे साधू कुठून उगवतात कोण जाणे! काही साधु तर विचित्र अवस्थेत गंगा स्नानासाठी जातात. नागा स्वामी त्यांतीलच एक उदाहरण.हे तर नग्नावस्थेत स्नानासाठी जातात. ही कोणती संस्कृती? याला आदर्श संस्कृतीचे प्रतीक म्हणायचे का? खरोखरच हे योग्य असेल तर अनेक मंदिराच्या बाहेर भारतीय संस्कृतीला साजेसा पेहराव करून भाविकांनी मंदिरात प्रवेश करावा. अन्यथा प्रवेश दिला जाणार नाही.अशा पाट्या का लावता? या साधूंना हे नियम लागू नाहीत का ? संस्कृतीचे विकृतीकरण नेमके कोण करते? याचा विचार लोकांनी करावा. मेंढरांसारखे कर्मकांडाचे अनुकरण करू नये एवढीच माफक अपेक्षा तमाम भारतीयांकडे आहे. याच साधूंना अनेक सुखसाई पुरवल्या जातात. त्यांचे नखरे सहन केले जातात.

अवाढव्य खर्च

धार्मिक कार्याला, कर्मकांडाला प्रोत्साहान देण्यासाठी सरकारच वारेमाप खर्च करु लागले आहे. याने विकसित भारत निर्माण करण्याचे स्वप्न साकार होईल का ? कुंभमेळ्यातील या 45 दिवसांच्या खर्चात धारावी येथे सुंदर नगरी वसली असती.असा सरकारने निर्णय घेतला असता तर नक्कीच भारतीय लोक स्वागत करतील.

Leave a comment