राजा बिंबिसारने गौतम बुद्धाला वेगवेगळया प्रकारे समजावून सांगितले. पण त्याचा काहीही परिणाम गौतम बुद्धावर झाला नाही. उलट बुद्धानेच बिंबिसारला जे काही उत्तर दिले, त्यातून बुद्धाच्या पुढील आयुष्याची दिशा स्पष्ट झाली होती. गौतमाने शांतपणे आणि खंबीरपणे बिंबिसारला उत्तर दिले. ते पुढीलप्रमाणे-
“.. महाराज, सिंह हे तुमच्या राजघराण्याचे चिन्ह आहे. त्या चिन्हाला साजेसेच आपले विचार, कीर्ती आणि पराक्रम आहे. यामुळे तुम्ही आमच्या राजघराण्याबद्दल मित्रत्वाने दाखवलेले प्रेम साहजिकच आहे. स्वाभाविक आहे. तुमचे आमच्या प्रती शुद्ध विचार आहेत. तुमचे प्रेम मी नम्रतेने स्वीकारतो. पण मला आता ऐहिक सुखात अडकवून घ्यायचे नाही.ऐहिक सुखाच्या लोभामुळे दुःखही भोगायला येते. मला या ऐहिक सुखाची जितकी भीती वाटते, तितकी सर्पाचीही (मृत्यूची) वाटत नाही. आपल्या आनंदाची आणि आपल्या संपत्तीची लुटमार करणारी ही सुखे भ्रामक आणि निरर्थक आहेत. त्यांची नुसती आशा केली तरी ती मन मोहून टाकतात. मनात घर करून राहतात. जे सुखाच्या बळी पडतात, त्यांना स्वर्गातही आनंद मिळत नाही. कितीही इंधन मिळाले तरी अग्नी तृप्त होत नाहीं, तसे कितीही सुख मिळाले तरी मन तृप्त होत नाही!
“महाराज, या जगात सुखाच्या मागे धावण्यासारखी कोणतीही मोठी आपत्ती नाही. संपूर्ण पृथ्वी ताब्यात घेतली तरी चंद्र, सूर्य ताब्यात घेण्याचा मोह होतो. कंदमुळे, फळे आणि पाणी हेच अन्न म्हणून सेवन करणाऱ्या ऋषीमुनींना देखील जेव्हा सुखाचा मोह झाला, तेव्हा त्यांनाही वेदना, दुःख सहन करावे लागले. आपल्याला हवे ते सुख मिळवण्यासाठी माणूस जेव्हा उन्मत्त होतो, तेव्हा त्याच्या पदरी केवळ दुःख आणि दुःखच येते.अशा वेळी सुखाचा त्याग करणे हेच त्याला योग्य वाटते.सुख प्राप्तीतील यश हे सुखी माणसावर भविष्यात येणारी विपत्ती समजली पाहिजे. कारण इच्छिलेले सुख जेव्हा त्याला मिळते, तेव्हा तो उन्मत्त होतो, उन्मत्तपणामुळे जे करु नये ते तो करतो आणि त्याचा शेवट अध:पातात होतो.”
ज्यांचा शोध करून ती प्राप्त करीत असताना जर वासना अडकत असतील तर अशी सुखे काय कामाची? ही सुखे उपभोगत असताना चहू बाजूंनी संकटे कोसळतात.अशा सुखातून कोणतेही समाधान मिळत नाही.
“महाराज, कष्ट करून मिळत नाही” मिळवून ठेवलेली ही सुखे काळापुरती उसनी घेतलेली सुखे आहेत. त्या दुखांचा अंत हा असतोच अशा सुखात कोण रममाण होईल ? सुखाच्या प्राप्तीच्या मोहामुळे माणसाच्या वासना अधिकच भडकतात. जी सुखे भिरकावून दिलेल्या मांसाच्या तुकड्याप्रमाणे असतात, जी सुखे उपभोगल्यामुळे विपत्ती निर्माण करतात, अशा सुखात आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल का ? या सुखांनी ज्यांच्या अंतःकरणाचा चावा घेतला आहे, अशा आत्मसंयमी माणसाचाही या सुखांमुळे सर्वनाश होतो. सुख हे हाड चाळीत उपाशी मरणाऱ्या कुत्र्याप्रमाणे असते. कितीही हाड चघळले तरी कुत्राला समाधान मिळत नाही, तसे सुख असते.
“सुखाच्या आसक्तीमुळे माणसाची बुद्धी आंधळी होते. जो सुखाच्या उपभोगाचा गुलाम बनतो, त्याच्या वाट्याला दुःख आणि दुःखच येते. गाण्यावर लुब्ध होऊन हरिणी आपल्या स्वतःच्याच जिवाला मुकतात. तीव्र प्रकाशाला भाळून पतंगे आपल्या अग्नीत उडी घेतो, आमिषांना भाळून मासा लोखंडी गळ गिळतो आणि मृत्यूला कारणीभूत ठरतो. ऐहिक सुखाचा अंत हा असाच असतो. प्रत्येक सुख हे उपभोगण्याचे साधन असते. पण ते पूर्ण समाधान मिळवून देत नाही.
आपल्याला तहान भागवण्यासाठी पाणी लागते. भूक शमवण्यासाठी अन्न लागते, निवाऱ्यासाठी घर लागते .झोपण्यासाठी बिछाना लागतो. ही सर्व सुखे आपल्या गरजा आहेत. यांतून आनंद कुठे मिळतो? बाढ्य वस्तूपासून आनंद कधीच मिळत नाही. ज्याअर्थी सर्व प्रकारची सुखे ही चंचल आहेत. त्या अर्थी अशी सुखे कसा काय आनंद देणार? सुख आणि दुःख यांचे स्वरूप संमिश्र आहे. राजपद आणि गुलामगिरी ही दोन्ही पदे एकच आहेत, राजा नेहमी सुखात राहू शकत नाही. गुलाम नेहमी दुःखात राहू शकत नाही. राजपद का जाण्याची भीती असते. ते टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. आपण संपूर्ण जग जिंकले तरी कोणत्याही एकाच घरात निवास करावा लागतो, राजाला दररोज कसली ना. कसली चिंता असते.
” मी गृहत्याग केला आहे तो रागाने नाही. किंवा अन्य कोणत्या कारणाने नव्हे. या सुखापेक्षा, राज्यवैभवापेक्षा, धनदौलतीपेक्षा अधिक उच्च हेतू साध्य करून घेण्याची माझी आकांक्षा आहे यासाठी मी तुमची सूचना नाकारतो आहे, असेही काही नाही. डोळस असून जो आंधळ्या माणसाचा हेवा करील, स्वतंत्र असून जो बंधनात असलेल्याचा हेवा करील, शहाणा असून जो वेड्याचा हेवा करील हे योग्य आहे का?”
मी जो माझा जीवनमार्ग निवडलेला आहे आणि माझे जे कूळ आहे यांना शोभेल असेच मी काही करणार आहे.”