Chhaava Movie Review- कसा आहे “छावा” चित्रपट? “या” गोष्टी तुम्हाला माहितीयेत का? जाणून घ्या एक क्लिकवर

Chhaava Movie Review

विकी कौशल, रश्मिका मंधाना आणि अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेला छावा हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात सध्या याच चित्रपटाचे चर्चा चालू आहे. लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलेला आणि दिनेश विजेन यांनी निर्मिती केलेला छावा हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला असून या चित्रपटाबाबत उलट सुलट चर्चा चालू आहे. डॉक्टर अमोल कोल्हे यांनी निर्माण केलेल्या स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी या मालिकेमुळे महाराष्ट्रात छत्रपती संभाजी महाराज यांची खरी इमेज निर्माण झाली. छावा या चित्रपटामुळे छत्रपती संभाजी महाराज यांचे कार्य संपूर्ण देशाच्या नाना कोपऱ्यात पोहोचले आहे. बघूया हा सिनेमा कसा आहे तो…

मुळात छावा या चित्रपटाची निर्मिती शिवाजी सावंत यांच्या छावा या कादंबरीच्या आधारे केलेली आहे. या कादंबरीत अनेक काल्पनिक बाबी घुसवलेल्या आहेत. कादंबरीच्या माध्यमातून वाचकांनी खरा इतिहास जाणून घेण्याची अपेक्षा बाळगू नये. खरा इतिहास समजण्यासाठी इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार, इंद्रजित सावंत यांसारख्या नामांकित लेखकांची पुस्तके वाचणे आवश्यक आहे.छावा या चित्रपटातील घेतलेल्या बहुतांश घटना या वास्तवाला धरून आहेत, हे या चित्रपटाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. हा चित्रपट ॲक्शन चित्रपट असल्याने काही घटना अतिरेकी ॲक्शन मध्ये पहाव्या लागतात. त्यामुळे चित्रपटाच्या मूळ कथानकाला बाधा येते.

चित्रपटातील सुरुवातीचाच बुऱ्हानपूर लुटलेला जो प्रसंग आहे तो प्रसंग वास्तव आहे, तरीसुद्धा त्या ठिकाणावरील लढाई कृत्रिम वाटते. या लढाईत स्वराज्याचे सर सेनापती हंबीरराव मोहिते आणि स्वतः स्वराज्याचे छत्रपती उपस्थित होते, हेही खरे आहे. तेथील प्रसंग वास्तववादी स्वरूपात दाखवला असता तर तो अधिक प्रभावी झाला असता.

छावा या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका विकी कौशल यांनी केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमुळे छत्रपती संभाजी महाराज यांची एक वेगळीच इमेज निर्माण झाली आहे. ती इमेज पुसणे या चित्रपटाला जवळजवळ अशक्य झाले आहे. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत संवाद फेक, चेहऱ्यावरील भाव, वातावरण निर्मिती, डोळ्यांचे हावभाव याबाबतीत सर्वच कलाकारांनी उत्तमोत्तम भूमिका केल्या आहेत.छावा या चित्रपटात प्रभावी संवाद कमीच आणि ॲक्शन व लढाई यांना अधिक महत्त्व दिले आहे.

विकी कौशल यांनी छत्रपती संभाजी महाराज यांची केलेली भूमिका ही चित्रपटाच्या दृष्टीने खूपच प्रभावी आहे. अक्षय खन्ना ने तर कमालच केली आहे. त्याने साकार केलेली औरंगजेबची भूमिका अप्रतिमच आहे. औरंगजेबच्या भूमिकेत अक्षय खन्ना आहे हे समजायला खूप वेळ लागतो .इतकी अप्रतिम भूमिका अक्षय खन्नाने केली आहे. अक्षय खन्नाला दाद द्यावी तेवढी थोडीच. सध्या भारतातील टॉप वन कलाकार असलेले रश्मी का मंधाना हिने येसूबाईची भूमिका केली आहे. रश्मिका ही दाक्षिणात्य अभिनेत्री असल्याने तिला मुळात हिंदी नीट बोलता येत नाही. तरीसुद्धा तिने आपल्या बोलक्या डोळ्यांनी ही राणी येसूबाईची भूमिका उत्तम पद्धतीने साकार करण्याचा प्रयत्न केला आहे.

संगमेश्वर येथील प्रसंग थोडा इतिहासाला धरून नाही. संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज हे तेथील स्थानिक लोकांचे न्यायनिवाडे करण्यासाठी गेले होते. तेथे त्यांना खिळवून ठेवण्याचे काम रंगास्वामी या भटाने केले होते. गणोजी शिर्के हा संभाजीराजांवर नाराज होता. पण त्यांचा हात संभाजीराजांना पकडून देण्यात कितपत होता याबाबत इतिहासकारांच्यात सुद्धा द्विधा आहे. पण या चित्रपटात संगमेश्वर प्रसंगातील खलनायक गणोजी शिर्के आणि कानोजी शिर्के यांना केले आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर गणोजी शिर्के मुघलांना जाऊन मिळाले आणि त्यांच्यासाठी कित्येक वेळा लढले. हे जरी खरे असले तरी जिंजीच्या वेढ्यात अडकलेल्या राजाराम महाराज यांना बाहेर काढण्यासाठी गणोजी शिर्के यांनी महत्त्वाची भूमिका वठवली आहे.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या वास्तव जीवनावर प्रकाश टाकणे  तीन तासाच्या चित्रपटात शक्य नसले तरी संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज यांना पकडल्या नंतर तेथून पुढील भाग लोक भावनिकतेने पाहतात. छत्रपती संभाजी महाराज यांनी जे बलिदान दिले त्याला तोड नाही. औरंगजेबच्या ताब्यात सापडल्यानंतर सूटका होणार नाही, याची कल्पना संभाजी महाराज यांना होती. ते स्वाभिमानी होते. बाणेदार होते. म्हणूनच त्यांनी अखेरपर्यंत आपला स्वाभिमान आणि बाणेदारपणा सोडला नाही. अखेरच्या प्रसंगात विकी कौशल याने आपला जीव ओतून प्रसंग साकार करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रसंगातूनच विकी कौशल प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण करेल असे वाटते.

आशुतोष राणा यांना मिळालेली हंबीरराव मोहिते यांची भूमिका खूप तोकडी आहे, तरीसुद्धा आशुतोष राणा ने ही भूमिका उत्तम पद्धतीने साजरी केली आहे.

चित्रपटात उभी केलेली महाराणी सोयराबाई हिची भूमिका खूपच विसंगत वाटते. महाराणी सोयराबाई शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजमाता सोयराबाई झाल्या. या चित्रपटातील दाखवलेल्या सोयराबाई या खलनायक स्वरूपात दाखवल्या आहेत. अध्यक्ष गडावर खलनायक म्हणून अण्णाजी पंत, मोरोपंत इत्यादी ब्राह्मण्यवादी मंडळी काम करत होती. सोयराबाई यांची मनस्थिती विधा अवस्थेत होती. त्याचा फायदा या मंडळींनी घेऊन त्यांच्याकडून खलनायक म्हणून अण्णाजी दत्तो आदी मंडळींनी संभाजी महाराज यांच्या विरुद्ध कट कारस्थान बसले होते. पण चित्रपटात मात्र या गोष्टींना अंतर दिल्याचे जाणवते. मात्र त्यांना शिक्षा दिल्याचा प्रसंग दाखवला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी आपली लढाई स्वराज्यासाठी चालवली होती. ही लढाई एका धर्मासाठी किंवा जातीसाठी नव्हती. ही लढाई महाराष्ट्रासाठी म्हणजे मराठ्यांसाठी होती. स्वराज्यासाठी होती. रयतेचे राज्य निर्माण करण्याच्या हेतूने शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले होते. त्याच स्वराज्यासाठी आपण लढत आहोत. या चित्रपटातून सुद्धा संभाजी महाराज यांच्या भूमिकेतून वेळोवेळी स्पष्ट केले आहे. ही एक जमेची बाजू आहे. हिंदवी स्वराज्य म्हणजे एतदेशीय स्वराज्य होय. म्हणजे मूळ भारतात राहणाऱ्या लोकांचे स्वराज्य होय हे प्रेक्षकांनी गृहीत धरावे. शिवरायांच्या आणि संभाजी महाराज यांच्या सैन्यात चाळीस टक्के अन्य धर्मीय म्हणजे मुस्लिम सैनिक होते. प्रत्येकाला आपल्या धर्माप्रमाणे जगण्याचा, पूजा पाठ करण्याचा अधिकार आहे, ही भूमिका छत्रपती शिवरायांची होती, तीच भूमिका छावा या चित्रपटातून संभाजी महाराज यांच्या रूपातून मांडली आहे. अलीकडे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा वापर धर्मासाठी आणि केवळ धार्मिक भावना भडकवण्यासाठी जो केला जातो, त्याला या चित्रपटाने फाटा दिला आहे .

थोडक्यात, हा चित्रपट चांगला गल्ला मिळवून देईल असे वाटते. महाराष्ट्रात हा चित्रपट चांगला चालणार आहे. महाराष्ट्र बाहेर हा चित्रपट कसा चालतो हे ही महत्त्वाचे आहे. उत्तरेकडील इतिहासकारांनी मराठ्यांच्या इतिहासाला आणि पराक्रमाला नेहमीच दुय्यम स्थान दिले आहे. या चित्रपटाच्या रूपाने मराठ्यांचा पराक्रम नक्कीच संपूर्ण भारतभर पसरेल अशी आशा आहे.

संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज आणि त्यानंतर महाराणी ताराबाई यांनी आपली स्वराज्याची लढाई चालूच ठेवली होती. अखेर पर्यंत औरंगजेबला दात दिली नाही. उत्तरेकडे जावे तर तेथे रजपूत लोक टपून बसले होते. औरंगजेबला ही मोठी भीती होती. म्हणूनच मराठ्यांचा पराभव करून जायचे असा त्याने निश्चय केला होता. पण मराठ्यांनी औरंगजेबला या मातीतच गाढले. औरंगजेबच्या मृत्यूनंतर औरंगजेबच्या कुळात कोणीही पराक्रमी बादशहा जन्माला आला नाही. उलट मराठ्यांनी आपल्या विजयाची पताका अटकेपार नेली.

Leave a comment