भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार आणि अमेरिकन हवामानाच्या अंदाजानुसार सुद्धा यावर्षी भारतात पावसाचे स्वरूप पूर्णतः बदलण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी अगदीच कमी पाऊस लागण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी प्रमाणापेक्षा जास्त पाऊस लागण्याची शक्यता आहे.त्यामुळे ओला दुष्काळ आणि सुका दुष्काळ पडण्याची भीती हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
मान्सूनची वाट एल निनोमुळे अडचणीत
भारतात दरवर्षी नैर्ऋत्य मान्सूनमुळे पाऊस पडतो. सर्वसाधारणतः जून ते ऑक्टोबर महिन्यांत भारतात पाऊस पडतो आणि त्यावरच भारतीय शेतकरी जीवन अवलंबून आहे. यावर्षी मान्सूनची वाट एल निनो अडवण्याची शक्यता अधिक असल्याने भारतात काही प्रदेशांमध्ये दुष्काळसदृश स्थिती उद्भवण्याची भीती व्यक्त होत आहे. मान्सून हा देशाच्या अर्थचक्राचा प्राणवायू मांडला जातो. अशावेळी एल निनोची वाढती ताकद चिंतेचे कारण ठरत आहे.हवामान खात्याच्या अंदाजानुसार काही भागात पाऊस प्रमाणात पडू शकतो. काही भागात अपेक्षापेक्षा कमी पाऊस होऊ शकतो तर काही ठिकाणी अल्पावधीतच मुसळधार पावसाचे तडाखे बसू शकतात. या असमतोलाचा सर्वाधिक फटका शेतीला आणि शेतकऱ्यांना बसेल.
भारतीय शेतकऱ्यांना धास्ती
पावसाचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्यांना बसतो. खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच आलेल्या या इशारामुळे भारतीय शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. भात, सोयाबीन , नाचणी,कापूस, डाळी, तेलबिया पिकांसाठी सुरुवातीचा पाऊस अत्यंत महत्त्वाचा असतो. पावसात खंड पडल्यास पेरण्या रखडू शकतात. दुबार पेरणीची वेळ येऊ शकते. सिंचनाचा खर्च वाढू शकतो. उत्पादनात घट झाल्यास त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर आणि ग्रामीण बाजारपेठांवर होऊ शकतो. त्यामुळेच पावसाच्या या लपंडावाचा परिणाम शेती व्यवसायावर मोठ्या प्रमाणात होत आहे. म्हणूनच भारतीय शेतकरी धास्तीत आहेत.