Summer vacation accidents-उन्हाळी सुट्टीत अपघात वाढले: प्रवाशांनी काळजी घ्यायला हवी.

दरवर्षी उन्हाळा आला की अपघाताचे प्रमाण वाढते . विशेषत: एप्रिल आणि मे महिन्यात अपघाताचे प्रमाण अधिक असते. दरवर्षी एप्रिल, मे महिन्यात लग्नाचे मुहूर्त अधिक प्रमाणात असतात. याशिवाय मुलांना सुट्टी असते. अशावेळी प्रवास घडतो. देवदर्शनासाठी जाणारे, पर्यटनासाठी जाणारे मामाच्या गावी जाणारे अशा वेगवेगळ्या कारणांनी लोक प्रवास करत असतात . त्यातूनच निष्काळजीपणामुळे आणि वाहनांची गर्दी वाढल्यामुळे अपघात होतात.

वेगवेगळ्या देवदर्शनाला जाताना , पंढरपूरला जाताना अनेक भाविकांचे अपघात झाले आहेत. त्यात अनेक जण ठार झाले आहेत. अशा घटना कमी करण्यासाठी भाविकांनी विशिष्ट वेळीच दर्शनाला जाणे म्हणजे अपघाताचे संकट उडवून घेण्यासारखे आहे.त्यापेक्षा ज्यावेळी कमी लोक असतात अशा वेळी जर दर्शनाला गेले तर अपघात टळतील.

मामाच्या गावी जा; पण काळजी घ्या

वर्षभर शाळेत जाऊन कंटाळा आलेला असतो. अशावेळी मुले मामाच्या गावी किंवा आत्यांच्या गावी जात असतात. अर्थात उन्हाळा असल्यामुळे मुलांना पोहण्याचा मोह आवरत नाही. सर्वच मुलांना उत्तम पोहता येते असे नाही. त्यामुळे पोहायला जाणाऱ्या मुलांच्यामध्ये बुडून मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण अधिक आहे. अर्थात हे प्रमाण कमी करता येते किंवा ते शून्यावर आणता येते. उन्हाळी सुट्टी आल्यानंतर घरातील वडीलधारी माणसांचे त्यांच्यावर लक्ष असले पाहिजे. मुलांना पोहण्याचा मोह झाला तर पोहायला येणाऱ्या वडीलधाऱ्या माणसांनी त्यांना पोहायला घेऊन गेले पाहिजे. पोहताना किंवा पोहायला शिकवताना योग्य ती काळजी घेतली पाहिजे. सुरक्षित ठिकाणी मुलांना पोहायला शिकवले पाहिजे म्हणजे धोके होणार नाहीत. लहान मुलांना आपला जीव गमवावा लागणार नाही. उन्हाळी सुट्टीत दरवर्षी अशा कितीतरी घटना घडतात. वर्तमानपत्रात बातम्या येतात;पण त्यातून पालक काही शिकत नाहीत.त्यामुळे दरवर्षी अशा घटना घडतात. पालकांनी योग्य काळजी घेतली तर अशा घटना घडणार नाहीत. कित्येक पालकांना आपली मुले कुठे गेली हेही माहीत नसते. पालकांच्या परवानगीशिवाय अनेक मुले पोहायला जातात.अशा वेळी धोका होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे पालकांनी मुलांवर सुट्टीच्या कालावधीत अधिक लक्ष देणे आवश्यक असते.

प्रवास करा पण सुरक्षित

दैनंदिन जीवनातील कामाच्या व्यापामुळे आणि ताणामुळे सुट्टीच्या कालावधीत कुठेतरी फिरून येण्याचा मोह प्रत्येक कुटुंबाला होत असतो. अशावेळी कुठेतरी पर्यटनासाठी किंवा देवदर्शनासाठी लोक निघतात. सावता माळी या संतांकडून लोक काही शिकले नाहीत.सावता माळी म्हणतात कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. त्यासाठी पंढरपूरला जायची मला काहीही गरज नाही. अलीकडे देवदर्शनला जाण्याचे फॅड प्रचंड वाढले आहे. त्यामुळेच अपघात होतात हे अपघात टाळायचे असतील तर आपण सुरक्षित प्रवास केला पाहिजे. त्याचबरोबर मोटार सायकलने जाणाऱ्या प्रवाशांनी मोटार सायकलवर दोघेही असतील तर दोघांनीही हेल्मेट वापरले पाहिजे. हेल्मेटमुळे अनेकांचा प्राण वाचू शकतो आणि अपघाताचे प्रमाण कमी होते. उन्हाळी सुट्टीत प्रवास करा पण तो सुरक्षित प्रवास असला पाहिजे.

Leave a comment