नैर्ऋत्य मान्सून पावसाने उशिरा का होईना आगमन केले असून पाऊस आता महाराष्ट्रात सर्वदूर पसरला आहे. पावसाच्या या आगमनाने शेतकरी अर्थात बळीराजा सुखावला असून पेरणीची दुबार चिंता आता मिटली आहे जून महिन्यात अत्यल्प म्हणजे सरासरी 13.4 मिमी पाऊस महाराष्ट्रात लागला असला तरी जूनच्या अखेरीस पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा दिला आहे.
2025 साली मान्सूनपूर्वच पावसाने हजेरी लावून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातही धुमाकूळ घातला होता. गेल्या वर्षी 15 मे पासून पाऊस सुरू झाला होता. तो सतत पाच महिने बरसत होता. नद्या, नाले, तलाव, धरणे तुडुंब भरले होते; पण यावर्षी मात्र पावसाने थोडा दम धरला. पावसाच्या आगमनाची शेतकऱ्यांना आणि सगळ्यांनाच आतुरतेने वाट पहावी लागली; पण ही आतुरता आता संपली असून बळीराजा सुखावला आहे. शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट टळले आहे. त्यामुळे बळीराजा आनंदी झाला आहे. हा पाऊस असाच बरसत राहो अशी शेतकऱ्यांची, सर्वांचीच इच्छा आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक सरासरी पाऊस मराठवाड्यात
मराठवाडा हा काही पावसाचा प्रदेश नसला तरी जून महिन्यात सरासरी पाऊस हा इतर प्रदेशांच्या मानाने जास्त लागला आहे. मराठवाड्यात सरासरी 25.8% पाऊस पडला आहे, तर संपूर्ण महाराष्ट्रात 13.4% पाऊस पडला आहे. यावरून मराठवाड्यात पावसाची चांगली सुरुवात झाल्याचे दिसून येते. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आनंदात भरच पडली आहे.