केंद्र आणि राज्य पातळीवर परीक्षांमध्ये सरकारला मोठ्या प्रमाणात अपयश आल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग खडबडून जागे झाल्याचे दिसते. पेपर फुटी प्रकरणामुळे केंद्रीय लोकसेवा आयोग,महाराष्ट्र लोकसेवा आयोग बदनाम झाले आहे. त्यावर काहीतरी मलमपट्टी लावण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सर्व पूर्व परीक्षा संगणकाआधारित कॉम्प्युटर बेस्ड पद्धतीने घेण्यात येतील असे जाहीर केले आहे. शिवाय या परीक्षांचे निकाल 21 दिवसात जाहीर करण्याचे नियोजनही केले आहे. असे लोकसेवा आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषद मध्ये सांगितले. लेखी परीक्षा असलेल्या पदांची प्रक्रिया सहा ते सात महिन्यात पूर्ण केली जाईल, तर संबंधित परीक्षेची सर्व प्रक्रिया पूर्ण करून वर्षभराच्या आत भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे अशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांनी माहिती दिली. गेल्या काही वर्षात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षाच्या निकालाबाबत खूपच साशंकता आणि विलंबता दिसून आलेली आहे. त्यामुळे आयोगाला खडबडून जाग आलेली असावी. आता आयोगाने दिलेल्या वचनाप्रमाणे निकाल नियोजन आणि कार्यवाही करावी ही अपेक्षा आहे.