Vat Purnima 2026-वटपौर्णिमा प्रथा परंपरा आणि महत्त्व

भारतीय संस्कृती आणि परंपरा याचे अतूट नाते आहे. भारतीय संस्कृतीने दिलेला प्रत्येक सण हा वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे.हे सण केवळ धार्मिक सण नसून प्रत्येक सणांमध्ये काहीतरी वैज्ञानिक दृष्टिकोन, सामाजिक बांधिलकी दिसून येते. वटपौर्णिमा हा एक असाच सण आहे. हा सण जेष्ठ महिन्यात पौर्णिमेला येतो. या सणाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे वडाच्या झाडाची पूजा केली जाते. वटपौर्णिमा हा सण स्त्रीप्रधान आहे. कारण प्रामुख्याने स्त्रियाच वडाच्या झाडाची पूजा करतात. या सणाविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया.

वटपौर्णिमा म्हणजे काय? What is Vat purnima?

ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला वडाची पूजा करून साजरा केलेला सण म्हणजे वटपौर्णिमा होय.

महाराष्ट्र, गुजरात, गोवा या राज्यांमध्ये वटपौर्णिमा हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. वट म्हणजे वड, वडाचे झाड वटपौर्णिमेदिवशी सर्व स्त्रिया उपवास धरतात. वडाच्या झाडाला जसे दीर्घायुष्य असते, त्याप्रमाणे आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे म्हणून स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. पण सध्या वटपौर्णिमा हा एक इव्हेंट झाला आहे. केवळ स्त्रिया एकत्र येऊन छान छान नटून वडाच्या झाडाची पूजा करायला जातात. एवढ्या पुरते मर्यादित वटपौर्णिमेचे महत्त्व नाही. वडाचे झाड हे पर्यावरणपूरक आहे औषधी वनस्पती आहे. खूप विस्तारित सावली देणारे विविध पक्षांना आश्रय देणारे आहे.त्यामुळे पारंपरिक पद्धतीमध्ये गावागावात जे पार बांधले जातात ते वडाच्या किंवा पिंपळाच्या झाडाभोवती बांधले जातात. या झाडांचे दीर्घायुष्य म्हणूनच या झाडांभोवती पार बांधले जातात.

वडाच्या झाडाचे पर्यावरणीय महत्त्व The environmental significance of the banyan tree

1 वडाचे झाड हे भरपूर प्राणवायू देणारा वृक्ष आहे. त्याच्या विशाल फांद्या आणि जाडसर रुंद पाने यामुळे हे झाड भरपूर प्राण वायू देते. शिवाय मोठ्या प्रमाणात कार्बन डाय-ऑक्साइड वायू शोषून घेते. त्यामुळे हवा शुद्धीकरणासाठी वड हे एक उपयुक्त झाड आहे. वडाच्या झाडाच्या परिसरात वातावरण आनंददायी आणि स्फूर्तीदायी असते.

2 वडाच्या झाडाचा विस्तार खूप मोठा असतो. त्यामुळे वडाच्या झाडाच्या परिसरात चहूबाजूने सावली पसरते .याचा परिणाम म्हणून आजूबाजूचा परिसर थंड करण्याचे काम वडाचे झाड करत असते.वडाच्या झाडाच्या सावलीला प्राणी, माणसे आश्रय घेतात. वडाचे झाड तापमान नियंत्रित करते.

3 वडाचे झाड हे जैवविविधतेचे संरक्षण करणारे आहे. वडाच्या झाडाच्या विस्तारित फांद्यांमुळे वडाच्या झाडावर अनेक पक्षी, प्राणी आश्रय घेतात.अनेक पक्षी घरटी बांधतात. वडाच्या ढोलीत आश्रय घेतात. त्यामुळे वडाचे झाड हे जैवविविधतेचे प्रतीक आणि संरक्षक आहे.

4 याशिवाय जमिनीची धूप रोखण्यासाठी तसेच भूजल साठा सुरक्षित ठेवण्यासाठी वडाचे झाड हे महत्त्वाची भूमिका बजावत असते.

वटपौर्णिमेचे वैज्ञानिक दृष्टिकोनातून महत्त्व Importance from a scientific perspective of Banyan tree

Vat Purnima traditions -वटपौर्णिमा का साजरी केली जाते? जाणून घ्या संपूर्ण माहिती

पर्यावरणाचे संरक्षण व्हावे तसेच पर्यावरणात जैवविविधता टिकावी, वृक्ष संवर्धन व्हावे या हेतूने प्राचीन काळापासून अनेक प्रथा परंपरा भारतामध्ये रूढ आहेत. त्याचा मुख्य हेतू पर्यावरणाचे संतुलन टिकवणे हा आहे .वटपौर्णिमेचा सण हा वृक्ष संवर्धनाचाच एक भाग आहे. गावाच्या परिसरात असणारे मोठाली झाडे ही वडाची असतात. ती पिढ्यानपिढ्या संरक्षित रहावीत या हेतूने वडाच्या झाडाची पूजा करून एक प्रकारे त्या झाडांना संरक्षणच दिले जाते.

याशिवाय वडाच्या झाडाचे पर्यावरणीय खूप मोठे महत्त्व आहे. विविध प्रकारचे पक्षी, प्राणी या वडाच्या झाडावर आश्रय घेतात. वडाच्या झाडाभोवती पार बांधून अनेक लोक सायंकाळच्या वेळी गप्पा मारायला येतात. त्यामुळे सामाजिक बांधिलकी वाढते. वडाच्या झाडांच्या पारंब्यांना लोंबकळत खेळण्यांमध्ये आनंद मिळतो. असे अनेक उपयोग वडाच्या झाडाचे असल्यामुळे वडाचे झाड प्रत्येक गावामध्ये असावे, ते टिकावे आणि त्याचे संरक्षण केले जावे या हेतूने वडाचे झाडाचे खूप महत्त्व आहे.

वडाच्या झाडाचे औषधी गुणधर्म The medicinal properties of Banyan tree

1 अतिसार झाल्यास वडाच्या झाडाच्या सालीचा रस पाजतात. त्यामुळे अतिसार थांबतो. शिवाय आतड्यातील जखमा कमी होतात. आतड्याला आलेली सूज कमी होते.

2 वडाच्या झाडाची पाने त्वचारोगावर गुणकारी असतात. पानांचा रस उकळून तो ज्या ठिकाणी सूज आलेले आहे अशा ठिकाणी लावल्यास सूज कमी होते.

3 वडाच्या पारंब्या केसांच्या आरोग्यांसाठी चांगल्या असतात. पारंब्यांचा रस विशिष्ट प्रक्रिया करून केसांना लावतात.केस लांबलचक होतात.पारंब्यांचा रस खाल्यास दात, हिरड्या मजबूत होतात.

वटपौर्णिमा – पुराण कथा

वटपौर्णिमेची पुरानात सावित्री आणि सत्यवान यांची कथा सांगितलेली आहे. सत्यवान हा अल्पायुषी असल्याचे सावित्रीला कळते. त्यामुळे सावित्री नेहमी सत्यवानाकडे लक्ष देत असते. एकदा सत्यवान वडाच्या झाडावरून लाकडे तोडत असताना खाली पडला आणि त्याचा मृत्यू झाला. सावित्रीने घोर तपश्चर्या करून यमराजाला वश केले. यमराजाने सत्यवानाला जीवदान दिले. तेव्हापासून सावित्री वडाच्या झाडाची पूजा करू लागली. वडाचे झाड तोडण्याची प्रथा बंद झाली. आजही अनेक स्त्रिया वडाच्या झाडाच्या फांद्या सरपणासाठी वापरत नाहीत. ही पुराणकथा असली तरी ती एक दंतकथा आहे. पुरणात अशा भरपूर दंतकथा घुसवून अनेक परंपरा निर्माण केल्या आहेत. कोणतीही स्त्री आपल्या मृत्यू झालेल्या पतीला जिवंत करू शकत नाही. यमराज ही एक काल्पनिक व्यक्ती आहे.
त्यामुळे अशा दंतकथांवर विश्वास न ठेवता वडाच्या झाडाचे सांस्कृतिक, पर्यावरणीय, औषधी महत्त्व जाणून त्याचे संवर्धन करावे आणि वडाची पूजा आवश्य करावी. वडाची पूजा करताना कोणतीही अंधश्रद्धा मनात न ठेवता वृक्ष संवर्धन हा एकच हेतू मनामध्ये ठेवावा. वृक्ष संवर्धनासाठी महत्त्व पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

 

Leave a comment