कडक उन्हाळ्यात वन्यजीवांचेही मोठ्या प्रमाणात पाण्यावाचून हाल होत असते. या अनुषंगाने राधानगरी अभयारण्य क्षेत्रात वन विभागामार्फत अनेक ठिकाणी कृत्रिम पाणवठे उभारले आहेत. त्यामुळे अभयारण्यात कार्यरत असलेले रानगवे, बिबटे, अस्वले, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी या सर्वांना मुबलक पाणी मिळत आहे. उन्हाळ्यात आणि तेही कडक उन्हाळ्यात प्राण्यांना पाण्यासाठी दहा-दहा किलोमीटर धाव घ्यावी लागते. दिवस दिवसभर तहान लागलेली असूनही पाण्याशिवाय प्राणी, पक्षी आसुसलेले असतात. यातून मार्ग काढण्यासाठी राधानगरी अभयारण्यात एक चांगला उपक्रम राबवला गेला आहे.
सुमारे 25 कृत्रिम पाणवठे
राधानगरी अभयारण्यात एकूण 800 प्रकारच्या वनस्पती आहेत. त्यापैकी सुमारे 300 प्रकारच्या वनस्पती ह्या औषधी वनस्पती आहेत. याशिवाय पशु आणि पक्ष्यांची रेलचेल खूप मोठ्या प्रमाणात आहे. या पशुपक्षांना उन्हाळ्यात मुबलक पाणी मिळावे या हेतूने राधानगरी अभयारण्यात 25 ठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत .त्यामुळे वन्यजीवांची पायपीट थांबते.वेळेवर पाणी मिळाल्यामुळे त्यांची तहान भागते. आणि त्यांना नवसंजीवनी मिळते. या पाणवठ्यांपैकी सुमारे 15 पानवठ्यांवर सौर बोअर बसवलेले आहेत. त्यामुळे पाणी कमी पडल्यास सौर बोअर चालू करून हे पाणवठे भरले जातात.