गेल्या आठ ते दहा वर्षात महाराष्ट्रात पुरेसा पाऊस लागलेला आहे. काही वेळा अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस लागलेला आहे.त्यामुळे अतिवृष्टीमुळे अनेक भागांमध्ये नुकसान झाले असले तरी पुरेशा पावसामुळे महाराष्ट्र पाण्यामुळे समृद्ध झाला होता. देशात यंदाच्या नैर्ऋत्य मान्सून हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी व्यक्त केला जून ते सप्टेंबर या कालावधीत देशभरात दीर्घकालीन सरासरीच्या केवळ 90% पर्जन्यमानाची शक्यता आहे. असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.या अंदाजात केवळ चार टक्के त्रुटीची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे.
अल निनोचा प्रभाव वाढल्यास जूनचा पाऊस लांबणीवर
चालू वर्षी अल निनोचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने असे म्हटले आहे की जून महिन्यात अल निनोची स्थिती कमकुवत राहू शकते. तसे झाले तर मात्र सप्टेंबर पर्यंत ती स्थिती मध्यम ते तीव्र स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे. अल निनो सक्रिय झाल्यास भारतातील मान्सून पर्जन्यमानावर विपरीत परिणाम होतो आणि पाऊस कमी पडण्याची शक्यता असते. चालू वर्षी पावसाची शक्यताही अल निनोच्या प्रभावावर अवलंबून असून अल निनोची कृपा झाली तर भारतात भरपूर पाऊस पडण्याची शक्यता पण आहे.
महागाई वाढणार बळीराजाची चिंता वाढली
शेतकऱ्यांनी शेतात पिकवलेल्या कोणत्याही उत्पन्नाला भारतात पुरेसा दर मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यातच भारत सरकारने खताच्या भरमसाठ किमती वाढवल्या आहेत.
बी बियाणांची किंमतीही वाढलेल्या आहेत. महागाईची झळ सरकारला नाही तर शेतकऱ्यांना म्हणजेच बळीराजाला बसणार आहे.मान्सून कमकुवत राहिल्यास खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल. काही खरीप पिकांची पेरणी केली आणि पाऊस लागला नाही तर बी बियाणे वाया जाईल. शेतकऱ्याला पुन्हा बी बियाणे खरेदी करून पुन्हा पेरणी करणे हे खूप जिकिरीचे आणि खर्चाचे होणार आहे.या सगळ्याचा फटका शेतकऱ्याला बसणार आहे.