मीठ हा आपल्या जीवनातील एक अविभाज्य घटक आहे. रोजच्या जेवणात मीठ ही एक अत्यावश्यक बाब मानली जाते. मीठ नाही असे घर मिळणार नाही. मिठाला सोडिअम क्लोराइड या रासायनिक नावाने ओळखतात. तर NaCl ही मिठाची रासायनिक संज्ञा आहे. या मिठाचे महत्त्व, फायदे-तोटे, मिठाचे वेगवेगळे प्रकार याबाबत अधिक माहिती या लेखातून आपण घेणार आहोत.
मीठ आणि आपले आरोग्य [Salt and our Health]:
मिठावर आपले आरोग्य अवलंबून असते. दैनंदिन आहारात आपण योग्य प्रमाणात मीठ घेतले, तर ते आपल्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असते. आपल्या रोजच्या जेवणात 500 मिलिग्रॅम पेक्षा जास्त मीठ असू नये. याची काळजी आपण घेतली पाहिजे. आपल्या रक्तातील सोडिअमची पातळी 135 ते 145 mlEq/L इतकीच असावी. बदलत्या जीवनशैलीमध्ये घरी बनवलेल्या आहाराचे प्रमाण हळूहळू कमी होऊन त्याची जागा हॉटेलिंगने आणि बाहेरून मागवून पदार्थ खाण्याने घेतली आहे. चटकदार पदार्थांमध्ये मीठ आणि तेल याचे प्रमाण निश्वितच अधिक असते. त्यामुळे असे पदार्थ खाणे टाळावे. वरचेवर हॉटेलिंग, जंक फूड खाणे शक्यतो टाळावे.
आपल्या शरीरातील मज्जासंस्थेचे कार्य उत्तम पद्धतीने चालण्यासाठी आहारात योग्य प्रमाणात मीठ असावे लागते. मिठाच्या योग्य प्रमाणामुळे चयापचय क्रियेचे कार्य उत्तम चालते. पचनक्रिया नीट होते.
मीठ खूपच कमी खाल्ल्याने होणारे तोटेःDisadvantages of consuming too little salt:
1) रक्तातील सोडिअमचे प्रमाण कमी झाल्यास अशक्तपणा येतो.
2. सोडिअमच्या कमतरतेमुळे त्वचा ढिली पडते.
3. वजन प्रमाणापेक्षा खूपच कमी होते.
4. चयापचय क्रियेमध्ये बिघाड
होतो.
5. मज्जासंस्थेच्या कार्यात बिघाड येऊन त्याचे संतुलन बिघडते.
6. मानसिक दुर्बलता येते’.
शरीरातील मिठाचे प्रमाण वाढल्यास होणारे तोटे:Disadvantages of increased salt content in the body:
1) आपल्या शरीरातील रक्तात सोडिअम क्लोराइडचे (मिठाचे) प्रमाण वाढल्यास रक्तात अधिक प्रमाणात पाणी साठवून ठेवले जाते. त्याचा दबाव रक्तवाहिन्यातील पेशीभिात्तिकांवर येऊन रक्तदाब वाढतो.
2. रक्तातील अतिरिक्त मिठामुळे रक्तात गुठळ्या होण्याची शक्यता असते. त्यामुळे अर्धांगवायू (लकवा)होऊ शकतो.
3. तहान खूप लागते.
4. कधी कधी मूर्च्छा येते.
5. हाडांतील कॅल्शिअम कमी होऊन हाडे कमकुवत होतात. हाडे दुखतात.
6. चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात.
7. मुत्रपिंडावर ताण येतो. मूत्रपिंड खराब होण्याची शक्यता असते.
8. केस पांढरे होतात.
म्हणून आहारात मीठ प्रमाणात असावे. सलाड, फळे कापून खाताना मीठ वापरू नये.ती तशीच खावीत.
मिठाचे प्रकार[Kinds of Salt]:
आपण आपल्या आहारातून मीठ पूर्णतः वर्ज्य करू शकत नसलो, तरी रोजच्या जेवणात योग्य प्रमाणात आणि चवीपुरतेच मीठ असणे आवश्यक आहे. पालेभाज्या, फळभाज्या यांद्वारे आपल्याला नैसर्गिकरित्या मीठ (क्षार) मिळतच असते.आता आपण कोणत्या प्रकारच्या मिठातून आपल्याला कोणते फायदे होतात, ते जाणून घेऊया.
1. समुद्रमीठ (sea-salt):
समुद्राच्या पाण्याची सरासरी क्षारता 3.5% असते; तर गोड्या पाण्याची क्षारता 0.05% असते. त्यामुळे. समुद्राच्या पाण्यापासून मीठ बनवले जाते. समुद्राच्या काठाला पाणी साठवण्याचे वाफे (उथळ तळी) बनवलेले असतात.
भरतीच्या वेळी या वाफ्यांत पाणी साचते. सूर्याच्या उष्णतेने पाण्याची वाफ होते आणि तळाला मीठ राहते. हे मीठ कारखान्यात स्वच्छ करून प्रक्रिया करून बाजारात विक्रीला आणले जाते.
समुद्राच्या मिठात मॅग्नेशिअम, कॅल्शिअम, पोटॅशिअम मुबलक प्रमाणात असते. समुद्रमीठ खाल्ल्याने हाडे आणि दात मजबूत होतात. सर्व प्रकारच्या दुथपेस्टमध्ये या मिठाचा वापर केला जातो. या मिठामुळे त्वचा तुकतुकीत राहते.तरी सुद्धा हे मीठ प्रमाणातच सेवन करावे; अन्यथा उच्च रक्तदाबाचा त्रास सुरु व्हायला वेळ लागणार नाही.
2. सैंधव मीठ (Rock salt):
सैंधव मीठ हे एका विशिष्ट खडकापासून बनते. सैंधव मीठ हे एक प्रकारचे खनिज आहे. सैंधव मीठ अन्य मिठांच्या तुलनेत आरोग्यासाठी खूपच उत्तम असते. या मिठात कॅल्शिअम, लोह, तांबे, मॅग्नेशिअम, पोटॅशियम जस्त इत्यादी खनिजे आढळतात. ती आपल्या शरीर बांधणीसाठी उपयुक्त ठरतात. पचनसंस्था सुधारण्यासाठी आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी सैंधव मीठ उपयुक्त ठरते.
3. आयोडिन मीठ (Iodine Salt):
या मिठात आयोडिनबरोबरच कॅल्शिअम, सोडिअम इत्यादी घटक असतात. समुद्र मिठातही आयोडिनची मात्रा वापरतात. शरीरातील थॉयराइडचे प्रमाण योग्य ठेवण्यासाठी आयोडिन मीठ उपयुक्त ठरते. मिठात योग्य प्रमाणात आयोडिन असल्याने आपला मानसिक तणाव कमी होतो. मेंदू तल्लख राहतो. केस निरोगी राहतात. दात आणि त्वचेचे आरोग्य चांगले राहते.
4. गुलाबी मीठ (Pink Salt):
गुलाबी मीठ हिमालयात आढळते. बाजारात गुलाबी मीठ उपलब्ध असते.हे मीठ चवीला थोडे गोड असते. हे एक खनिज आहे.हे मीठ नियमित व योग्य प्रमाणात सेवन केल्यास रक्तदाब नियंत्रित राहतो. या मिठाच्या सेवनाने सेरोटोनिन ह्या मेंदूत असलेल्या हार्मोन्सची वृद्धी होते. त्यामुळे ताणतणाव कमी होतो. शिवाय डिहायड्रेशन होण्याची शक्यता खूप कमी असते.
5 काळे मीठ: (Black Salt):
काळे मीठ हे हिमालयात आढळते. हिमालयीन पिंक सॉल्ट मीठ आणि काळे मीठ यात फारसा फरक नाही. या मिठात सल्फरचे प्रमाण अधिक असते. पोटाच्या आरोग्यासाठी काळे मीठ उपयुक्त ठरते. हे मीठ ज्वालामुखीय खडकावासून बनते.
6 खडे मीठ (Rhinestone Salt):
समुद्राच्या काठाला उपलब्ध असलेले हे नैसर्गिक मीठ होय. भरतीच्या वेळी समुद्रकाठच्या वाफ्यात पाणी शिरते. पाण्याचे बाष्पीभवन होऊन तळाला मीठ शिल्लक राहते. हे मीठ चांगले वाळवून बाजारात विक्रीसाठी आणले जाते. या मिठावर आयोडिनचा मात्रा सोडल्यास अन्य कोणतीही क्रिया केली जात नाही.पूर्वीच्या काळी हेच मीठ नियमित आहारात वापरले जाई. या मिठाचा उपयोग मासे खारवण्यासाठी केला जातो. मासे खारवल्यामुळे ते अधिक काळ टिकतात.
असे हे बहुगुणी मीठ सांभाळून वापरावे,जपून खावे आणि आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी योग्य तेवढेच घ्यावे.प्रमाणामध्ये सर्व काही असावे. इतकेच…..