थायलंड-Thailand

आशियाई आग्नेय देशात समाविष्ट असलेला देश म्हणजे थायलंड होय. ब्रह्मदेशाच्या (म्यानमार) आग्नेयेला थायलंड हा देश आहे; तर थायलंडच्या आग्नेयेला व्हियतनाम हा देश आहे. थायलंडच्या पश्चिमेला अंद‌मानचा समुद्र येऊन थडकला आहे. आम्ही सिंगापोर, मलेशिया हे दोन देश पाहून कुलालंपूरच्या सुवर्णभूमी विमानतळावर पोहोचलो होतो. सुवर्णभूमी विमानतळ ते पटाया विमानतळ असा आमचा पुन्हा विमान प्रवास झाला. पटाया विमानतळावर 26 ऑगस्ट 2024 रोजी पहाटे सुमारे 1:00 वाजता आम्ही पोहोचलो. तेथे आमचे स्वागत करण्यासाठी थायलंडच्या टिक्की आणि कुक्की या दोन जाड्या गाईड आल्या होत्या. आमच्या सोबत A Heaven Holiday यांच्या वतीने वर्षा बुगडे आणि प्रणिता बुगडे होत्या. सुमारे रात्री अडीच वाजता आम्ही एका आलिशान हॉटेलमध्ये पोहोचलो. पटायातील रुम्स सुंदर आणि खूप मोठ्या होत्या. खिडकीतून सकाळच्या वेळी पटाया शहराचे देखणे रूप पाहताना मन भरून यायचे.भारतात कोणत्याही शहराचे जेव्हा आपण दृश्य पाहतो, तेव्हा आपण एक पांढरे जंगल पाहात आहोत असेच वाटते. पटायाचे मात्र तसे नव्हते.प्रत्येक बंगल्यासमोर किमान एक तरी मोठे झाड उभे असल्याचे खिडकीतून आम्हाला स्पष्ट दिसत होते. आपण आता थायलंड या देशाब‌द्दल थोडी माहिती घेऊ.

थायलंड हा देश 60% जंगलाने व्यापलेला निसर्गसंपन्न देश आहे. येथे लष्करी राजवट असून राजा हा घटनात्मक प्रमुख असतो.थाई (Thai) ही थायलंड ची राष्ट्रीय भाषा असून बौ‌द्ध धर्म राष्ट्रीय धर्म आहे. थायलंडमधील बहुतांश लोक बौद्‌धधर्मीय आहेत. थायलंडमध्ये सुमारे 80% लोक मूळनिवासी थायलंडवासी आहेत; तर 14% लोक चिनी आहेत. चीनच्या बाजारपेठेचा थायलंडच्या बाजारपेठेवर मोठा परिणाम झाल्याचे जाणवते.थायलंडची सुमारे 7 कोटी लोकसंख्या असून महाराष्ट्राच्या लोकसंख्येपेक्षा थायलंडची लोकसंख्या कमी आहे.

थायबार (THB) हे थायलंडचे चलन असून या चलनाचे मूल्य भारतीय रुपयाच्या अडीच पट आहे. म्हणजेच 1 THB = 2.60 रू. थाई या शब्दांचा अर्थ थाई भाषेत ‘स्वतंत्र’ असा आहे. थायलंड म्हणजे स्वतंत्र भूमी होय. थायलंडच्या राजाला भगवान बुद्‌धाचा दर्जा दिला जातो. थाई संस्कृतीवर बुद्‌धाच्या विचारांचा प्रभाव जाणवतो. बौ‌द्ध धर्माचा जन्म भारतात होऊनही भारतीयांमध्ये बुद्ध विचार रुजलेच नाहीत.

थायलंडमधील प्रेक्षणीय स्थळे: Spectacular places of Thailand.

कोरल आयलँड: (Coral Island, Pattaya]

सोमवार दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10:00 वाजल्यापासून थायलंडमधील प्रेक्षणीय स्थळांना भेटी द्यायला आम्ही सुरुवात केली.आमच्या सोबत टिक्की आणि कुक्की या दोन थाई गाईड होत्या. जेमतेम इंग्रजी भाषा येत असल्यामुळे टिक्की आणि कुक्की कमीच बोलायच्या. ‘Follow Me’ म्हणायचं आणि सर्वात पुढे झेंडा घेऊन जायचे, एवढे मात्र त्या चोख करायच्या. प्रत्येक स्थळावर अचूक घेऊन जायच्या.
सकाळी 10:00 वाजता थायलंडच्या समुद्र किनाऱ्यावर आम्ही पोहोचलो. प्रत्येकी 25 व्यक्ती याप्रमाणे आम्ही 3 बोटीत सर्वजण बसलो. मालवणमध्ये बोटीतून जाण्याचा किंवा गेट वे ऑफ इंडियापासून घारापुरी पाहण्यासाठी आम्ही बोटीतून प्रवास केला होता; पण थायलंडमधील बोटी वेगाने धावणाऱ्या होत्या. थायलंडचा समुद्र किनारा ते कोरल आयलँड हे अंतर सुमारे 8 ते 10 किमी असेल. मध्येच जागोजागी sea-walk,पॅरा-सिलिंग , स्पीड बोट असे अनेक ॲटम आपण स्वतः पे करून करायचे होते. आमच्यापैकी काही होतकरू लोकांनी पॅरा सिलींग, स्पीड बोट’, sea-walk. चा अनुभव घेतला. यांपैकी बरेच ॲटम आम्ही मालवणमध्ये केल्यामुळे आम्ही फक्त नेत्रसुख घेतले. थोड्याच वेळात आम्ही कोरल बेटावर पोहोचलो.कोरल बेटावरून थायलंडचा समुद्रकिनारा दिसत नव्हताः पृथ्वी गोल असल्यामुळे आणि पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे समुद्राच्या पाण्यालाही गोलाकार प्राप्त झाला होता. कोरल बेटावरून आम्ही परत थायलंडच्या किनाऱ्यावर आलो. तेथेच दुपारचे जेवण घेतले बोटीत बसताना फोटोग्राफरने आमचे फोटो काढले होते. ते फोटो प्लेटवर काढून तेथे लावले होते. आम्ही ते प्रत्येकी 100 THB ला आठवण म्हणून विकत घेतले.
पॅरा सिलिंग – 800 THB, Sea-walk-1200 THB असे दर होते. दुपारचे जेवण करून आम्ही परत रुमवर आलो.

अल्काझर शो: Alcazar Show:

26 ऑगस्टच्या रात्री 9:30 च्या अल्काझर शो पाहायला आम्ही रात्रीचे जेवण करूनच गेलो.
A Heaven Holiday ने आपल्या Package मधून तिकीटे काढली आणि आम्ही शो पाहण्यास पेक्षागृहात प्रवेश केला. अल्काझर शो म्हणजे डोळ्यांचे पारणे फिटणारे थाई संस्कृतीचे दर्शन होय. सुमारे 40 मिनिटे Non-stop नृत्यगीते सादर केली होती; पण या काळात कोणत्याही प्रकारचे Announcement नव्हते. प्रत्येक गाण्याला स्टेजची रचना बदलत होती. आकर्षक मांडणी केली जात होती. हे सर्व करत असताना एकही मिनिटाचा खंड पडत नव्हता. आम्ही कुठे तरी स्वर्गात आल्याचे भासले आणि आमच्यासमोर रंभा, मेनका आपला नृत्याविष्कार सादर करीत आहेत असेच वाटले.भारतीय भरतनाट्यम् आणि कथकली या नृत्यप्रकारांना जो ताल, सूर, लय, सौंदर्य आहे तेच सौंदर्य या नृत्यप्रकारात आम्हाला पाहायला मिळाले. प्रत्येक गाण्याच्या वेळी वेशभूषा बद‌लत होती. वेगवेगळ्या देशातील famous गाण्यांवर समूहनृत्ये सादर करताना प्रत्येक नृत्याला थाई (Thai) टच होता.
अप्रतिम संगीत, नयनरम्य नृत्याविष्कार ,लक्षवेधी आणि आकर्षक वेशभूषा, मधुर वाद्य, लयबद्‌ध ताल’, मनमोहक सूर, अप्रतिम stage decoration, अव्वल द‌र्जाचा तंत्रशुद्‌धपणा पाहून आम्ही थक्कच झालो होतो. 40-50 मिनिटांचा शो कधी संपला हे आम्हास कळलेच नाही.

show संपल्यानंतर सर्व कलाकार प्रेक्षागृहाच्या बाहेर आले होते. त्यामुळे कलाकार, नृत्यांगना यांना चार-पाच फुटांवरून आम्हाला पाहता आले. महिला नृत्यांगना काल्पनिक अप्सरांच्या पेक्षाही सुंदर होत्या.त्यांची उंची सहा, साडेसहा फूटाहून जास्त वाटत होती.त्यांच्यासमवेत फोटो काढायचे असतील तर किमान 5OO THB,1000 THB मोजावे लागतात.मग त्या हव्या तशा pose देतात. आम्ही नकळत त्यांचे काही फोटो काढले.

Jems Gallary: Thailand

मंगळवार दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी आम्ही सकाळचा नाष्टा करून नोन गुंज व्हिलेज पाहायला गेलो.वाटेत प्रथम Gems Gallary पाहायला गेलो. येथे मोनो रेलमधून खाणीतून वेगवेगळ्या प्रकारचे हिरे, माणके, रत्ने कशा प्रकारे शोधतात, त्यांना आकार कसा दिला जातो, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवले जात होते.त्यानंतर Jems Gallary कडे पाहायला नेतात. येथील गॅलरीत विविध प्रकारचे महागडे मोती, हिरे, माणके, रत्ने यांच्यापासून बनवलेले दागिने पाहायला मिळतात. विकत पण घेता येतात; पण आम्हाला त्यांची काही गॅरंटी वाटली नसल्यामुळे आमच्यापैकी कोणीच येथे खरेदी केल्याचे आढळेल नाही.

बुद्‌धांचा पुतळा: [Statue of Buddha: Thailand]

थायलंड हा देश गौतम बुद्‌घांच्या विचारांचा वारसदार आहे. या देशाचा राष्ट्रीय धर्म बौद्‌ध आहे. या देशाच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे 80 % लोक बौद्ध धर्मीय आहेत. Jems Gallary पाहून आम्ही गौतम बुद्धांच्या पुतळ्याच्या ठिकाणी गेलो. येथे गौतम बुद्‌धांचा समाधीस्थ भव्य पुतळा आहे. इतरही पुतळे येथे आहेत. त्यांतील काही पुतळे शिष्यांचे आहेत. हे स्थळ खूप शांततामय असून एका विशाल खाडीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. येथे गेल्यानंतर मन प्रसन्न होते. येथे मी छोट्या बुद्ध पुतळ्याला जलस्नान घातले.

Cultural Programme: Thailand

थायलंडमधील हा सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही गौतम बुद्‌धाच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन काही अंतर पुढे गेल्यानंतर पाहिला.

अल्काझर शो सारखाच cultural Programme ही आकर्षक होता. हा शो सुद्‌धा 40 ते 50 मिनिटांचा होता; पण मनमोहक आणि तंत्रशुद्ध होता. थाई संस्कृतीचे दर्शन येथे निश्चितच घडले. सर्वजण या cultural show मध्ये गुंग होऊन गेले होते. हा show पाहून आम्ही मुंग नुच गार्डन पाहायला गेलो.

एलिफंट शो: Elephant Show Pattaya

नोंग नुच व्हिलेजजवळच आणखी एक महत्वाचा शो म्हणजे एलिफंट शो होय.अगदी लहान हत्तीपासून ते मोठ्या अवाढव्य हत्तींचे खेळ आणि करामती पाहून आम्ही अक्षरशः थक्क झालो.लहान हत्तींचे तालासुरात डुलत डुलत नाचत नाचत येणे खूप आकर्षक वाटायचे.मोठ्या हत्तींचे बास्केटबॉल, फुटबॉल, नेमबाजी असे कितीतरी खेळ आमचे लक्ष वेधून गेले.

नोंग नुच व्हिलेज, Nong Nooch Tropical Garden: Thailand:

नोंग नुच ट्रॉपिकल गार्डन हे थायलंडमधील खूप सुंदर प्रेक्षणीय स्थळ आहे. नोंग नुच तानसाचा यांनी हे गार्डन 1980 साली व्यावसायिक दृष्टिकोनातून बनवून घेतले असून या बागेचे क्षेत्र सुमारे 2.5 चौ. किमी आहे. हजारो पर्यटक या बागेला तिकीट काढून भेट देतात. त्यामुळे नोंग नुच यांनी कायमच्या उत्पन्नाची सोय करून ठेवली आहे. या बागेत वेगवेगळे विभाग असून 1993 साली डायनासोर पार्क सुरु करण्यात आला.नोन नूच व्हिलेजमध्ये विविध प्रकारच्या हजारो वनस्पतींची मांडणी केलेली आढळून आली. काही वनस्पती bone-saw स्वरुपात आम्हाला आढळल्या. निवडुंगाचे कितीतरी प्रकार बोन-सा स्वरुपात एकत्र पाहायला मिळाले. आम्ही नोंग नुच गार्डन बसमधून जागोजागी थांबत पाहिली. संपूर्ण गार्डन चालत पाहायची म्हटले तर किमान अर्धा दिवस तरी लागेल.

लहान मुलांना डायनासोर पार्क निश्चितच आवडेल असाच आहे. नोंग नुच गार्डन पाहून आम्ही परतीच्या प्रवासाला म्हणजे रुमवर आलो.

 

बँकॉक: Bangkok:

बँकॉक ही थायलंडची राजधानी असून अत्यंत सुंदर असे हे शहर आहे. जगातील काही महत्वाच्या शहरांमध्ये बँकांकचा समावेश होतो. पटाया आणि बँकाकमध्ये उघड्यावर असणाऱ्या केबलचे जाळे आम्हाला दिसले. या जाळ्यांमुळे शहराच्या सौंद‌र्यात बाधा येत होती. पटायामधून आम्ही बसमध्ये बसून बँकॉकला आलो. बँकॉकमध्ये एका विशाल हॉटेलमध्ये आम्ही उतरलो. येथील रुम्स अगदी विशाल होत्या. ऐसपैस रुम्स पाहून आमची मने सुखावली. 28 ऑगस्ट 2024 रोजी आम्ही बँकॉकला पोहोचलो होतो. आता दोन दिवस आमचा येथेच मुक्काम राहणार होता.

मरीन पार्क /सफारी वर्ल्ड बँकॉक: Marine Park/Safari world, Bangkok:

मरीन पार्क आणि सफारी वर्ल्ड पार्क हे दोन वेगवेगळे पार्क नसून एकच आहे. बँकॉकमध्ये हा पार्क आहे. आता आपण मरीन पार्क/सफारी वर्ल्ड विषयी माहिती घेऊया. सफारी वर्ल्ड पार्कमध्ये अनेक छोटे छोटे शो दाखवले जातात. त्यांतील तीन शो आम्ही पाहिले. त्यांची माहिती आपण घेऊया.

(A) Spy Show:

spy show हा एक स्टंट शो असून अशा प्रकारचा स्टंट शो आम्ही सिंगापोरात पाहिला होता. त्यामुळे मरीन पार्कमधील spy show पाहण्यातील औत्सुक्य खूपच कमी होते. Show प्रत्यक्ष सुरु झाल्यावर मात्र चित्तथरारक प्रसंग पाहून अंगावर रोमटे उभे राहिले.कलाकार जीव ओतून आपला स्टंट सादर करीत होते. आपण समोर एखादा सिनेमाच पाहत आहोत असे वाटत होते. speed ने बोट चालवणे, उंचावरून पाण्यात सूर मारणे, फाइटिंग सर्वच कथानक Action ने भरलेले असल्यामु‌ळे अर्धा तास आमचे चांगलेच मनोरंजन झाले.

(B) Dolphin Show, Bangkok डॉल्फीन शो:

माणूस सोडला तर जगातील सर्वात बुद्‌धिमान प्राणी म्हणजे डॉल्फिन होय. माणूस आणि डॉल्फिन यांच्या प्रेमाच्या कथा मी वाचल्या आहेत. समुद्रात माणूस संकटात सापडला तर त्याला सुखरूप किनाऱ्यावर आणून सोडण्याचे काम डॉल्फिनने केले आहे. त्यामुळे माणूस विशेषत: डॉल्फिन माशाची शिकार करत नाही. अनेक जखमी डाल्फिनला माणसाने उपचार करून ठीक केले आहे. डॉल्फिन बद्दल एवढी माहिती आम्हाला निश्चित होती. त्यामुळे डॉल्फिन शो पाहण्याची उत्सुकता आमची शिगेला पोहोचली होती.

सुरुवातीला छोट्या दोन डॉल्फिन माशांनी आमचे स्वागत केले. आमच्या समोर करामती करून दाखवल्या. तोंडाच्या टोकावर चेंडू पकडून पाण्यातून फेरी मारणे, उंच उडी मारून गळ्यात रिंगा घालून घेणे, शेपटीत रिंगा पकडणे, पाठीवरुन माणसाला फिरवणे अशा कितीतरी गोष्टी, खेळ त्यांनी केले. प्रत्येक खेळ केल्यावर त्यांना प्रोत्साहन किंवा बक्षीस म्हणून मासा खायला दिला जाई. त्यामुळे ते अधिक खूश होत आणि पुढचा खेळ उत्तम प्रकारे करून दाखवत. थोड्याच वेळात दोन मोठे डॉल्फिन मासे टँकमध्ये आले. त्यांनी सुद्‌धा मनोरंजनाचा धुमाकूळ घालून आम्हाला खूप हसवले. शेवटी शो संपल्यावर एका मोकळ्या स्पेसमध्ये हे दोन बडे मासे फोटो काढून घेण्यासाठी आले. ज्यांना डॉल्फिन सोबत फोटो काढून घ्यायचा आहे त्यांनी 100 THB देऊन फोटो काढून घ्यायचा असतो. डॉल्फिन शो चे आम्हाला खूप आकर्षण होते. तो शी आम्ही डोळ्यांनी पाहिला.

(c) sea-lion show: Bangkok-सी- लायन शो.

सी-लायन हा एक समुद्र प्राणी आहे. त्याच्या तोंडाची रचना सिंहासारखी असते. त्यामुळे त्याला समुद्र-सिंह असे म्हटले जाते. डॉल्फिन शो पाहिल्यानंतर आम्ही sea-lion शो पाहिला. यापूर्वी sea-lion ची कथा आम्ही वाचली होती. शिकवली होती. आज प्रत्यक्ष sea-lion शो च्या रूपात पाहणार होतो.

डॉल्फिन शो आणि सी-लायन शो यांच्या खेळात बरेचशे साधर्म्य होते. प्रत्येक खेळ करुन दाखवल्यावर सी-लायनला सुद्‌धा बक्षीस म्हणून मासे खायला दिले जात होते. त्यामुळे पुढचा खेळ ते उत्तम करून दाखवत असत. सी लायन शो ने आमचे खूप मनोरंजन केले.

सफारी वर्ल्ड पार्क पार्ट 2: [Safari world Park, Bangkok].

विविध शो पाहिल्यानंतर नंतर तेथे जवळच असलेल्या सफारी वर्ल्ड पार्कमधील जंगल सफारी साठी आम्ही बसने गेलो. सफारी वर्ल्ड पार्क मध्ये आम्ही दिवसा ढवळ्या बसमधून जंगल सफारी केली. थायलंडमधील सर्वांत मोठे हे वन्यजीव उद्यान होय. हे वन्यजीव उद्यान आहे असे वाटत नाही; तर प्रत्यक्ष जंगलातून आम्ही फिरत आहोत असेच वाटत होते.

या जंगल सफारीमध्ये यापूर्वी आम्ही कधीच इतक्या जवळून जंगलातील हिंस्र प्राणी पाहिले नव्हते. राधानगरी अभयारण्यात गव्यांचे कळप मात्र पाहिले आहेत. म्हणून बँकांकमधील जंगल सफारी अविस्मरणीय अशीच झाली.

जंगल सफारी बसमधून ताशी 8 ते 10 किमी वेगाने आम्ही करत होतो. बसचा वेग खूप कमी असल्यामुळे बगळे आणि त्यांचे वेगवेगळे प्रकार आम्हाला अगदी जवळून मोठ्या संख्येने पाहायला मिळाले. वाघ, सिंह हे कळपाने फिरताना, विश्रांती घेतांना पहिले.वाघ, सिंह अगदी धष्टपुष्ट होते.याशिवाय काळवीट नीलगाय, हत्ती, अस्वल, गवे,जिराफ, थाई गाई, वेगवेगळ्या प्रकारची हरणे, झेब्रे,कोल्हे असे कितीतरी प्राणी आम्ही कळपाने आणि अगदी जवळून पाहण्याचा आनंद लुटला. सफारी वर्ल्ड पाहून झाल्यावर आम्ही येता येता Indira square हे मोठे मार्केट पाहिले. किरकोळ खरेदी केली आणि कंटाळा आल्यामुळे रुमपर विश्रांतीसाठी आलो. रात्रीचे जेवण भारतीय पंजाबी हॉटेलमध्ये घेतले. तेथे प्रथमच मराठी बोलणारे शीख भेटले.

शॉपिंग डे: Shopping Day

गुरुवार दिनांक 29 ऑगस्ट 2024 हा आमचा shopping साठी राखीव दिवस होता. सकाळी फुल्ल नाष्टा करून रूमवर विश्रांतीसाठी गेलो .काही जण Shopping ला गेले. आम्ही दुपारी 3 वाजता शॉपिंगसाठी बाहेर पडलो. 300 THB ला एक टॅक्सी बुक केली. आणि त्या टॅक्सीतून आम्ही सहाजण इंदिरा स्क्वेअरला पोहोचलो.

इंदिरा स्क्वेअर हे भव्य मार्केट असून येथे bargaining चालते. बहुतांश भारतीय येथेच शॉपिंग करतात. या इंदिरा मार्केटचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील बहुतांश शॉप्स थाई लोकांचे आहेत. त्यांना इंग्रजी, हिंदी बोलता येत नाही. त्यामुळे त्यांनी sells girls म्हणून अस्खलित हिंदी बोलणाऱ्या बर्मा मुली ठेवल्या आहेत. सध्या ब्रह्मदे‌शात म्हणजे म्यानमारमध्ये राजा विरु‌द्ध प्रजा अशी लढाई (गृहकलह) चालू आहे. यांत कित्येक कुटुंबे उद्‌ध्वस्त झाली आहेत. बर्मामधील अनेक मुलींनी सीमारेषेला लागून असलेल्या थायलंडमध्ये आश्रय घेतला.शॉपिंग करत असताना या मुलींच्या मुलाखती आम्ही घेत होतो. जिवंत राहण्यासाठी आणि उदरनिर्वाहासाठी आम्ही थायलंडचा आश्रय घेतला असलाचे त्या बोलून दाखवत.मुली एकापेक्षा एक सुंदर, सडपातळ, गौरवर्णीय, लांबसडक आकर्षक केस, लोभस चेहरा अशा या सर्व रुपवान मुली 12000 THB मासिक पगारावर आणि विक्रीच्या 5% कमिशनवर काम करत होत्या. Bargaining करण्यात अणि हिंदी बोलण्यात त्या expert होत्या. त्यांची नावेही भारतीय नावांसारखीच होती. आम्ही लक्ष्मी नावाची सेल्समन असलेल्या मुलीच्या दुकानात बरीच कपडे घेतली. मी लक्ष्मीची खूप स्तुती करत होतो. अखेर लक्ष्मीने ठरलेल्या व्यवहारापेक्षा 100 THB कमी केले आणि उरलेले पैसे मला परत दिले. का कुणास ठाऊक या सर्व मुलींची कीव येत होती. लवकरच बर्मा (म्यानमार) शांत होवो आणि थायलंडमध्ये ओलीस पडलेले म्यानमारचे सौंदर्य परत बर्मात जावो,हीच सदिच्छा!

रात्री आम्ही प्रत्येकी 150 THB मोजून शाकाहारी जेवलो. याचवेळी आमच्यापैकी निम्मे लोक क्रूझवर जेवण्यासाठी आणि मौजमजा करण्यासाठी गेले होते. क्रुझचा आनंद आम्ही दुबईत घेतला होता. आम्ही परत रुमवर आलो आणि परतीच्या प्रवासासाठी आवराआवर करू लागलो.

शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी नऊ वाजता आम्ही बँकॉकमधील रुम्स सोडल्या आणि आमचा परतीचा प्रवास सुरु झाला. दुपारी 1:00 च्या दरम्यान आमच्या विमानाने बँकमधून उड्‌डाण घेतले आणि आम्ही मुंबईच्या दिशेने झेपावलो.

A Heaven Holiday, Kolhapur च्या टीमने माफक दरात आमचा तीन देशांचा बारा दिवसांचा प्रदीर्घ प्रवास घडवून आणल्याबद्‌दल खूप-खूप धन्यावाद !

गेली बारा दिवस आम्ही टीम-84 जण एकत्र प्रवास करत होतो. सर्वांचा नामोल्लेख करणे जवळ जवळ अशक्य आहे. पण सर्वांनी मिळून मिसळून सुखाचा प्रवास केला. शेवटच्या चार दिवसांत दीर्घ प्रवासाचा अनुभव नसल्याने काहींची थोडी चिडचिड होत असली तरी आम्ही सगळेजण समजून घ्यायचो. सर्व टीम 84 ला खूप खूप धन्यवाद !!!

आपलाच
संभाजी पाटील राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित मुख्याध्यापक .
माजी शिक्षण विस्तार अधिकारी राधानगरी

Leave a comment