मिसाईल मॅन-अब्दुल कलाम / Apj Abdul kalam

अबुल पाकिर जैनुलबदीन अब्दुल कलाम असे लांबलचक नाव असलेले भारताचे मिसाईल मॅन-अब्दुल कलाम यांची 15 ऑक्टोबर 2023 रोजी 92 वी जयंती साजरी होते आहे.खरंच एका सर्वसामान्य तमिळी मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या मुलाने भारतीय विज्ञान आणि अवकाश संशोधन क्षेत्रात जी अद्वितीय कामगिरी केली आहे त्याला जोड नाही.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून कलाम यांनी भारताचे सर्वोच्च राष्ट्रपती पद भूषविले. भारतीय क्षेपणास्त्र क्षेत्रात स्वावलंबी बनवले‌.

15 ऑक्टोबर 1931 रोजी तामिळनाडू राज्यातील रामेश्वरम या छोट्याशा समुद्र किनाऱ्यावर वसलेल्या गावात तमिळी मुस्लिम कुटुंबात झाला.याच मातीत ते सर्वधर्मसमभाव शिकले . रामनाथशास्त्री, अरविंदम,शिवप्रकाशन या बालपणीच्या मित्रांसमवेत भेदभावविरहित जीवन जगले.येथेच प्राथमिक शिक्षण पूर्ण केले..

प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर कलाम यांनी माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी रामनाथपुरम येथील श्वार्झ विद्यालयात प्रवेश घेतला . तेथे त्यांना नव्या शाळेत नवे पंख फुटल्यासारखे वाटू लागले. श्वार्झ विद्यालयात कलामांना शामदुराई सालोमन नावचे एक आदर्श शिक्षक भेटले.ते विद्यार्थीप्रिय होते.शामदुराई सालोमन यांचे खास वैशिष्ट्य म्हणजे ते मुलांचे प्रश्न खुल्या मनाने स्वीकारायचे आणि मुलांना समाधानकारक उत्तरे द्यायचे.ते नेहमी मुलांना आव्हानात्मक प्रश्न विचारण्यास उद्युक्त करत होते. ते नेहमी मुलांना सांगत,की उत्तम विद्यार्थी सामान्य शिक्षकांकडून जे ज्ञान मिळवू शकतो, तेच ज्ञान सामान्य विद्यार्थी उत्तम शिक्षकांकडून मिळवू शकतो. प्रत्येक विद्यार्थ्यांकडे इच्छाशक्ती असली पाहिजे ती इच्छाशक्ती पूर्ण करण्यासाठी महत्त्वाकांक्षा असली पाहिजे.ध्यास आणि सातत्य ठेवले पाहिजे. शिवाय आपल्या कर्तृत्वावर दृढ विश्वास असला पाहिजे.गुरुने दिलेला कानमंत्र कलाम आयुष्यभर विसरले नाहीत.म्हणूनच ते आयुष्याच्या एव्हरेस्ट शिखरावर पोहोचले होते.

माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर कलाम यांनी बी एस सी चे शिक्षण घेण्यासाठी सेंट जोसेफ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.विद्यार्थ्याचे उत्तम व्यक्तिमत्त्व घडण्यासाठी उत्तम शिक्षक भेटावे लागतात. कलामांच्या आयुष्याला योग्य वळण देण्यासाठी असेच काही शिक्षक भेटले.विज्ञान या विषयाची प्रचंड आवड कलामांना याच कॉलेजमध्ये निर्माण झाली.फिजिक्स विषयात करिअर करण्याचे येथेच निश्चित केले. बी एस सी चा प्रवास संपल्यावर ‘मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या सर्वोत्तम अभियांत्रिकी महाविद्यालय प्रवेश मिळाला. या महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी खूप अवघड परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते.

मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत दुसऱ्या वर्षी पुढील शिक्षणाची दिशा ठरवावी लागते. कलाम यांचे विमान उडवण्याचे स्वप्न होते, म्हणून त्यांनी एरोडायनॅमिक्स ही शाखा निवडली.मद्रास येथील शिक्षण पूर्ण झाल्यावर बेंगलोर येथे एरोनॉटिक्स संस्थेत प्रवेश घेतला तेथील प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील प्रवास दोन शाखांमध्ये विभागला होता. एक हवाईदल आणि दुसरा विज्ञान विभाग

. भारताच्या दक्षिण टोकाला असलेल्या एका छोट्या खेडेगावात जन्मलेला मुलगा आपले भविष्य घडवण्यासाठी उत्तरेकडे चालला होता.कलाम यांनी वैमानिक होण्यासाठी मुलाखत दिली, पण त्यांना यश आले नाही.थोडे नाराज झाले खरे,पण त्याच वेळी त्यांच्या हातात वरिष्ठ विज्ञान अधिकारी म्हणून ऑर्डरच हातात पडली. डॉ कलाम यांनी या पदाची सूत्रे घेतली आणि जोमाने कामाला लागले.पुढे त्यांच्या देखरेखीखाली नंदी हे विमान पूर्ण झाले. तत्कालीन संरक्षणमंत्री व्ही के कृष्णमेनन यांनी कलाम यांच्याबरोबर या विमानातून एक फेरी मारून कलाम यांना उत्तेजन दिले.यावेळी कलाम स्वतः विमान उडवत होते.आपणच निर्माण केलेले विमान आकाशात उडवण्याचे भाग्य कलाम यांना मिळाले होते.थुंबा येथे रोहिणी आणि मेनका ही दोन पूर्णपणे भारतीय बनावटीची रॉकेट्स तयार झाली होती.श्रीहरिकोटा हे अवकाश प्रक्षेपण केंद्र आंध्रप्रदेशात असून १९७१ साली ते स्थापन झाले आहे.येथून अनेक अंतराळ याने, क्षेपणास्त्रे यशस्वीपणे प्रक्षेपित झालेली आहेत. रोहिणी, मेनका नंतर भारताने मागे वळून पाहिले नाही.पृथ्वी, त्रिशूल, अग्नी,आकाश,नाग अशी अनेक क्षेपणास्त्रे यशस्वीपणे प्रक्षेपित केली गेली.अलीकडे सप्टेंबर २०२३ मध्ये भारताने चांद्रयान-३ थेट चंद्रावर उतरले.डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांनी आणि विक्रम साराभाई, सतीश धवन, ब्रह्मप्रकाश यांसारख्या अनेक शास्त्रज्ञांनी दिलेल्या योगदानातून भारत आज संरक्षण आणि अवकाश क्षेत्रात स्वावलंबी बनला आहे.कलाम यांच्या कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना पद्मभूषण, भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

वैज्ञानिक क्षेत्रातून निवृत्त झाल्यावर भारताने आणखी एक जबाबदारी कलाम यांच्यावर टाकली.ते २००२ साली भारताचे राष्ट्रपती झाले.त्यांच्या कर्तृत्वामुळे हा मान त्यांना मिळाला होता.येथेही त्यांनी राजकारणात विरहित कारभार केला.राष्ट्रपती असताना शालेय मुलांमध्ये मिसळण्याचा आनंद घेतला.ते मुलांना प्रेरणा देत राहिले.२७ जुलै २०१५ रोजी कलाम यांचे देहावसान झाले.त्यांच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम.

संभाजी पाटील

राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित मुख्याध्यापक, माजी शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती राधानगरी.

Leave a comment