रासायनिक खतांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकऱ्यांचा खरीप हंगाम अडचणीत आला आहे. युरिया आणि डीएपी वगळता अन्य खतांच्या दरामध्ये पोत्यामागे 200 ते 400 रुपयांची वाढ झाल्याने आगामी काळात येणारा खरीप हंगाम घ्यायचा की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. प्रत्येक ठिकाणी आखातातील तणावपूर्ण स्थितीची कारणे दिली जातात आणि वेळ मारून नेली जाते;पण हे दर असेच चढत्या क्रमाने राहिले तर शेतकरी हवालदिल होईल. त्यांना पुरेसे खत घेणे शक्य होणार नाही.ते आर्थिक संकटात येतील. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे रासायनिक खतांच्या तुलनेत शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य भाव मिळत नाही.हा भाव मिळावा म्हणून सरकार काहीही करत नाही. ही बाब सुद्धा दुर्दैवाची आहे. गेल्यास 70-80 वर्षात कधीही नाही अशी परिस्थिती भारतात आली आहे. सरकारने काही आर्थिक बाबतीत काहीही नियोजन केलेले नाही. देशाच्या डोक्यावर भरमसाठ कर्ज काढून ठेवले आहे. पण या कर्जाच्या प्रमाणात देशात विकास झाला नाही. लोकांना रोजगार मिळाला नाही.नोकऱ्या मिळाल्या नाहीत. शेतीला भाव मिळाला नाही; मग एवढे कर्ज काढून काय केले? हा प्रश्न सामान्य जणांना पडत आहे.