दिल्लीचा कुतुबमिनार : Qutb minar Delhi

भारताला एक वैभवशाली ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. भारतातील अनेक वास्तू, संग्रहालय, स्मारके, पुस्तके, किल्ले हे भारतीय सांस्कृतिक परंपरेतील घटक आहेत. अशाच ऐतिहासिक वारसा जपलेल्या ठिकाणांची ओळख करून देण्याचे काम मी माझ्या लेखातून सातत्याने करत आहे. त्यांतीलच एक घटक कुतुबमिनार याची आता आपण ओळख करून घेणार आहोत.

कुतुबमिनार कोठे आहे? Where is Qutb minar?

कुतुबमिनार भारताची राजधानी दिल्ली येथे आहे. दिल्लीमध्ये दक्षिण दिल्लीत असून नवी दिल्लीतील इंडिया गेट पासून 13 किलोमीटर अंतरावर आहे.

कुतुबमिनार कोणी आणि केव्हा बांधला ? Who and When did build Qutb minar?

इ.स. 1193 मध्ये तत्कालीन दिल्लीचा शासक कुतुबुद्‌दीन ऐबक याने कुतुबमिनारच्या बांधकामास सुरुवात केली. कुतुबु‌द्दीन ऐबक हा दिल्लीचा पहिला सुलतान होता. त्याने आपल्या विजयाप्रीत्यर्थ हा मनोरा बांधायला सुरुवात केली होती. इ. स. 1220 साली त्याचा उत्तराधिकारी अल्तमशने कुतुबमिनारचे बांधकाम पूर्ण केले. अल्तमशने चौथ्या मजल्यापर्यंत कुतुबमिनारचे बांधकाम पूर्ण केले. त्यानंतर फिरोजशहा तुघलकने 1368 साली चौथ्या मजल्याची पुनर्रचना करून पाचवा मजला बांधून त्यावर घुमट बसवला. इ.स. 1803 च्या भूकंपात कुतुबमिनारचा घुमट पडला. त्यावेळी स्मिथ या इंग्रज वास्तुविशारदने पुन्हा नवीन घुमट बांधला.पण पूर्वीच्या वास्तुशैलीशी मिळतीजुळती शैली नसल्याने जनतेतून टीका येऊ लागली. त्यामुळे हा घुमट खाली उतरण्यात आला. आजही या परिसरात हा घुमट पाहायला मिळतो.

राष्ट्रीय पुरस्कार आणि कुतुबमिनार दर्शन

2016 साली भारत सरकारच्या कृपेने आम्हाला कुतुबमिनार पाहण्याचा योग आला. 5 सप्टेंबर 2016 साली मला भारत सरकारचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
दिल्लीच्या आलिशान पंचतारांकित हॉटेलमध्ये अर्थात अशोक हॉटेलमध्ये भारत सरकारने आमची सहा दिवसांसाठी व्यवस्था केली होती. त्यावेळी एक दिवस आम्हाला सरकारने दिल्ली दर्शन घडवून आणले. त्यामध्ये कुतुबमिनारचा समावेश होता. राष्ट्रपतीभवन, इंडिया गेट, लाल किल्ला, कुतुबमिनार अशी काही ठिकाणे आम्ही त्यावेळी पाहिली होती. त्यांतीलच कुतुबमिनारचा सविस्तर इतिहास आपण पाहूया —-

कुतुबमिनारचा इतिहास : History of Qutb minar

कुतुबु‌द्दीन ऐबक आणि महंमद धुरी यांच्यात तुंबळ लढाई झाली.त्यात महमंद घुरीचा पराभव होऊन कुतुबु‌द्दीन ऐबकचा विजय झाला. कुतुबु‌द्दीन ऐबक दिल्लीचा सुलतान झाला. या विजयाप्रीत्यर्थ कुतुबुद्‌दीनने दिल्लीत मिनार बांधण्याचा निर्णय घेतला. त्याने 1193 साली या मिनारची पायाभरणी केली. इ. स. 1210 मध्ये कुतुबुद्‌दीनचा मृत्यू झाला. त्यावेळी मनोरा तीन मजल्यापर्यंत पूर्ण झाला होता.

कुतुबु‌द्दीन ऐबकच्या मृत्यूनंतर त्याचा उत्तराधिकारी म्हणून अल्तमश सत्तेवर आला. अल्तमशने मनोऱ्याचे अर्धवट राहिलेले काम सुरु केले. अल्तमशने चौथा मजला बांधून घेतला आणि मनोऱ्याचे काम थांबले.

पुढे बराच काळ मनोऱ्याचे काम थांबले होते. कालांतराने मुहम्मद तुघलक दिल्लीच्या गादीवर आला. त्याने मिनारच्या कामाला गती दिली. त्यासाठी त्याने चौथ्या मनोऱ्याची पुनर्रचना करून पाचवा मजला बांधून त्यावर घुमट बसवला. विशेष म्हणजे तीन सत्ताधीशांच्या काळात मनोऱ्याचे बांधकाम होऊन सुद्‌धा मनोऱ्याच्या सौंद‌र्यात आणि कलाकुसरमध्ये तसूभरही फरक पडला नाही.

इ.स. 1803 साली दिल्लीला भूकंपाने दणका दिला. या भूकंपाच्या द‌णक्यात मनोऱ्याचा घुमट खाली कोसळला. त्यावेळी भारतात इंग्रजांची सत्ता होती. इंग्रज स्थापत्यविशारद स्मिथ याने घुमटाचे डिझाईन बनवून घुमट बनवला. पण हा घुमट मनोऱ्याच्या मूळ डिझाईनशी मिळताजुळता नसल्याने त्या घुमटावर टीकात्मक प्रतिक्रिया येऊ लागल्या. नाइलाजाने इंग्रजांना हा घुमट खाली उतरावा लागला. आजही तो घुमट कुतुबमिनारच्या परिसरात आहे. कुतुबमिनार हे दिल्लीचे वैभव आहे. हे वैभव दिल्ली सरकार आणि केंद्रसरकार नक्कीच जपेल.

कुतुबमिनारची रचना: Structure of Qutb minar

कुतुबमिनार हा आपल्या देशाचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा आहे. इस्लामी वास्तुकलेचा प्रभाव या मनोऱ्याच्या बांधकामावर आणि डिझाईनवर दिसून येतो. या मनोऱ्याची नियोजित उंची 72.5 मीटर असून तत्कालीन काळाची तुलना केल्यास जगातील सर्वांत उंच मनोरा. अशीच या मनोऱ्याची ओळख करून देता येईल.हा संपूर्ण मनोरा लाल रंगाच्या दगडात बांधला असून हा दगड म्हणजे लाल मातीच्या विटाच होय. या मनोऱ्याच्या तळाचा व्यास 14.32 मीटर आहे. तर वरील पाचव्या मजल्याचा वास 2.75 मीटर आहे. खालून वर हा मनोरा निमुळता होत गेलेला असून या मनोऱ्याला एकूण 379 पायऱ्या आहेत. प्रत्येक मजल्यावर गेल्यावर गॅलरी लागते. ही गॅलरी मिनारच्या रचनेला साजेशी वर्तुळाकार आहे. गॅलरीत उभे राहून सभोवारचे दृश्य पाहता येते. गॅलरीची रुंदी सरासरी दीड मीटर आहे.

लोहस्तंभ Iron Piller: Delhi:

दिल्लीच्या कुतुबमिनार जवळच लोहस्तंभ आहे. हा लोहस्तंभ सात मीटर उंचीचा असून तो चंद्रगुप्त विक्रमादित्य दुसरा याच्या काळातील आहे. हा लोहस्तंभ चौथ्या शत‌कातील असून तो अजूनही तसूभरही गंजलेला नाही. लोखंड गंजू नये म्हणून त्यात क्रोमिअम वापरतात. या लोहस्तंभात क्रोमिअमचे प्रमाण निश्चितच चांगले असले पाहिजे. म्हणूनच त्याला गंज चढलेला नाही.

राजा चंद्रगुप्त दुसरा याने वंग देशावर मिळवलेल्या विजयाप्रीत्यर्थ हा लोहस्तंभ उभारलेला आहे. काही इतिहासकारांच्या मतानुसार हा लोहस्तंभ चंद्रगुप्त मौर्य याने उभारलेला आहे.

कुतुबमिनार पाहताना लोहस्तंभ पाहायला हरकत नाही.

कुतुबमिनार:जागतिक वारसा स्मारक : World Heritage Monument: Qutb minar:

युनेस्कोने सन 1993 साली जागतिक वारसा स्मारक म्हणून कुतुबमिनारची घोषणा केली. त्यामुळे कुतुबमिनार आता भारतीय पुरातत्त्व विभागाच्या देखभालीखाली असतो.आता या वास्तूला कोणीही धोका निर्माण करु शकत नाही.

दुर्घटना टाळण्यासाठी बंदी :

सध्या कुतुबमिनार जवळून पाहता येतो; पण फक्त बाहेरून. कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये म्हणून मिनारच्या कोणत्याही मजल्यावरील गॅलरीत आपल्याला जाता येत नाही. गॅलरी ओपन असल्यामुळे गॅलरीतून तोल जाऊन दुर्घटना घडू शकते. म्हणून ही बंदी घातली आहे.

Leave a comment