Buddha: Life Story Part-10

सिद्धार्थ गौतमाचा विवाह

सि‌द्धार्थ गौतम सोळा वर्षाचा झाला होता. त्यामुळे सिद्धार्थाच्या कुटुंबात त्याच्या विवाहाची चर्चा सुरु झाली होती. तत्कालीन परंपरेनुसार मुलगा आणि मुलगी दोघेही वयात आले की त्यांचे लग्न केले जात होते. सिद्धार्थही त्याला अपवाद नव्हता.

यावेळी अनेक ठिकाणी विशेषतः राजघराण्यात स्वयंवर ठेवण्याची प्रथा होती. दंडपाणी नावाचा एक शाक्य होता. यशोदरा नावाची त्याची मुलगी वयात आली होती. ती सौंदर्यवती आणि चारित्र्यसंपन्न होती. दंडपाणीने आपल्या मुलीचे म्हणजे यशोदरेचे स्वयंवर ठेवले होते. स्वयंवराच्या प्रथेनुसार आसपासच्या कुलीन युवकांना निमंत्रणे धाडली गेली. कपिलवस्तूचा राजकुमार सिद्धार्थ यालाही निमंत्रण पाठवण्यात आले होते. या निमंत्रणामुळे सिद्धार्थच्या माता-पित्याला खूप आनंद झाला. त्यांना सिद्धार्थाच्या विवाहाची काळजी होतीच. त्यांनी म्हणजे राजा शुद्धोदन आणि महाप्रजापती यांनी सिद्धार्थ बोलावून निमंत्रणाची आनंदाची बातमी सांगितली आणि दंडपाणीच्या निमंत्रणास मान देऊन स्वयंवरास जाऊन यशोदरेचे पाणिग्रहण करावे असे सांगितले. पाणिग्रहण करणे म्हणजे विवाहासाठी हातात हात देणे किंवा घेणे होय. सिद्धार्थ गौतमाने माता-पित्याने व्यक्त केलेल्या इच्छेला मान दिला आणि यशोदरेचे पाणिग्रहण करण्यास निघाला.

दंडपाणीच्या दर‌बारात अनेक युवक यशोदरचे पाणिग्रहण करण्यासाठी आले होते. सिद्धार्थ गौतमही आला होता. जमलेल्या सर्व युवकांमधून यशोदरेने सिद्धार्थ गौतमाला वरले. सिद्धार्थच्या द‌याळूपणाच्या, निष्पक्षपातीपणाच्या अनेक कथा तिच्या कानावर आल्या होत्या. म्हणूनच तिने म्हणूनच तिने सिद्धार्थ गौतमाला वरले.

दंडपाणीला मात्र असे वाटत होते की सिद्धार्थला सासुमुनींच्या सहवासात वावरायला आवडते. मग हा सिद्धार्थ संसारात रमेल का ? गृहस्थाश्रमात टिकेल का ? त्यामुळे दंडपाणी साशंक होता; पण यशोदरेने ठाम निश्चय केला होता.की मी सिद्धार्थ शिवाय कुणालाही वरणार नाही. उलट ती आपल्या पित्याला म्हणाली, “साधुसंतांच्या, तपस्वींच्या सहवासात राह‌णे हा अपराध आहे का?” माझ्या निर्णयावर मी ठाम आहे. मी माझा निर्णय बदलणार नाही. शेवटी यशोदरेच्या निश्चयामुळे आणि हट्टामुळे दंडपाणीने विवाहाला संमती दिली.

या स्वयंवराला परिसरातील अनेक युवक आले होते. त्यांची खूप मोठी निराशा झाली. दंडपाणी या विवाहाला तयार होणार नाही, असे सर्वांना वाटत होते; पण दंडपाणी यशोदरेची समजूत काढण्यास अयशस्वी झाला होता. आता या सर्व युवकांचा नाइलाज झाला. त्यांनी धीर धरून दंडपाणीकडे मागणी केली की धनुर्विद्येचे कौशल्य दाखवणारी परीक्षा घेतली जावी. शांत आणि गंभीर दिसणारा सिद्धार्थ धनुर्विद्येचे कौशल्य कसे काय दाखवणार ? असे तेथील युवकांना वाटत होते. दंडपाणीला ही मागणी मान्य करावी लागली.सिद्धार्थाला ही स्पर्धा मान्य नव्हती. पण त्याच्या मित्रांनी यशोदरेसाठी आणि आपल्या कुळाच्या सन्मानासाठी तुला या स्पर्धेत भाग घ्यावा लागेल असे सांगितले. शेवटी कसाबसा सिद्धार्थ धनुर्विद्येसाठी तयार झाला. स्पर्धा सुरु झाली.एकापेक्षा एक तरबेज युवकांनी स्पर्धेत भाग घेतला होता. सिद्धार्थने आपल्या एकाग्रतेने धनुर्विद्येचे कौशल्य दाखवले. सिद्धार्थ या परीक्षेत सर्वश्रेष्ठ ठरला. शि‌द्धार्थ आणि यशोदरा यांचा अशाप्रकारे विवाह संपन्न झाला. शुद्धोदन आणि प्रजापती यांनाही खूप आनंद निर्माण झाला. सिद्धधार्थाचे गृहस्थाश्रमातील दिवस सुरु झाले. विवाहानंतर बारा वर्षानी सिद्धार्थ आणि यशोदरेला पुत्र झाला. त्याचे नाव राहूल असे ठेवण्यात आले.

Leave a comment