Buddha:Life Story Part 16 :सिद्धार्थचा शाक्य संघाशी संघर्ष

सिद्धार्थ गौतम शाक्य संघाच्या प्रत्येक सभेला नियमित हजर असायचा. संघाचा कारभार कसा चालतो, हे जवळून पाहायचा. संघाच्या सभेत भागही घ्यायचा. असे होता होता आठ वर्षे लोटली. सिद्धार्थ संघाचा एकनिष्ट व बाणेदार सभासद होता. संघाच्या कामासाठी तो वेळ द्यायचा. त्याचे संघातील वर्तन आद‌र्श आणि अनुकरणीय असे होते. त्यामुळे सि‌द्धार्थाची संघात प्रचंड लोकप्रियता वाढली होती. त्यांच्या विचाराने, मत मांड‌णीच्या पद्‌धतीने संघातील सभासद खूश व्हायचे. तो सर्वांना प्रिय झाला होता.

सिद्धार्थ संघाचा सभासद झाल्यापासून आठव्या वर्षी अशी एक घटना घडली की शुद्धोद‌नाच्या कुटुंबाच्या बाबतीत ती घटना दुर्दैवी ठरली. काय घडली अशी घटना ? तीच आपण पाहू-

शाक्यांच्या राज्याच्या सीमेला लागून कोलियांचे राज्य होते. दोन्ही राज्यांची सीमा रोहिणी नदीमुळे विभागल्या होत्या. या रोहिणी नदीचे पाणी शाक्य व कोलिया दोघेही वापरत असत. एकदा रोहिणी नदीचे पाणी शेतीसाठी आधी कोणी घ्यायचे यावरून शाक्य आणि कोलिया यांच्यात वाद सुरु झाला. वाद इतका विकोपाला गेला की त्यांच्यात मारामारी झाली. दोन्हीही बाजूंचे लोक जखमी झाले. पुढे वाद चिघळतच गेला. त्यामुळे दोन्हीही राज्यांना असे वाटू लागले की ‘आता यावर युद्ध हाच पर्याय. शाक्यांच्या सेनापतीने कोलियांशी युद्‌ध पुकारण्यासाठी शाक्य संघाची सभा बोलावली. शाक्य सेनापती सर्व सभासदांना उद्दे‌शून म्हणाला,

“ आपल्या लोकांवर प्रथम कोलियांनी हल्ला केला आहे .आपले अनेक लोक जखमी झाले आहेत. प्रत्येक वेळी कोलियांकडूनच आक्रमण होते. आताही तेच झाले. कोलियांना चांगला धडा शिकवण्यासाठी आपण त्यांच्याशी युद्ध पुकारले पाहिजे. युद्ध पुकारण्यासाठी मी ठराव मांडत आहे. कुणाचा विरोध असेल तर बोलावे”

सि‌द्धार्थ उठला आणि म्हणाला,

” या ठरावाला माझा विरोध आहे. कोणताही प्रश्न युद्धाने सुटत नाही. उलट युद्धाने दोन्हीही बाजूचे नुकसान होते. म्हणून युद्ध करून आपला हेतू सफल होणार नाही. एका युद्धात दुसऱ्या यु‌द्धाची बीजे रोवली जातात. जो दुसऱ्याची हत्या करतो, त्याचीही कोणीतरी हत्या करतो . जो दुसऱ्यावर विजय मिळवतो, त्याचाही कोणीतरी पराभव करतो. त्यापेक्षा घाई न करता कोणाची चूक आहे हे पाहूया. आपल्याही लोकांनी पाण्याच्या बाबतीत अतिक्रमण केल्याचे मी ऐकले आहे. हे जर खरे असेल तर आपणही दोषी आहोत.”

यावर सेनापतीने उत्तर दिले-

“होय, आपल्या लोकांनी अतिक्रमण केले आहे, हे खरे आहे ; पण प्रथम पाणी घेण्याची पाळीही आपलीच होती.”

यावर सिद्धार्थ म्हणाला,

” यावरून असे स्पष्ट होते की आपण दोषापासून पूर्ण मुक्त नाही. म्हणून मी असे सुचवतो की आपल्यातून दोन माणसे निवडावी. कोलियांनी दोन माणसे निवडावी आणि या चौघांनी पाचवा माणूस निवडावा. या पाच लोकांनी दिलेला निवाडा दोन्ही राज्यांना मान्य असेल.”

सिद्धार्थ गौतमाने मांडलेल्या सूचनेला अनुमोदनही मिळाले; पण सेनापतीने कडाडून विरोध केला आणि जोपर्यंत कोलियांना कडक शासन होत नाही, तोपर्यंत हे थांबणार नाही. असे सांगून सिद्धार्थने मांडलेल्या प्रस्तावावर चर्चा करून निर्णय घेण्याचे सुचवले. संघाच्या सभासदांना सेनापतीचे म्हणणे पटले, त्यांनी सिद्धार्थने मांडलेला ठराव अमान्य केला. त्यानंतर सेनापतीने कोलियांशी युद्ध करण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावावर सिद्धार्थ उठला आणि म्हणाला,

” सभाजनहो, मी तुम्हाला विनंती करतो की हा प्रस्तात मान्य करु नये. आपले आणि कोलियांचे संबंध चांगले आहेत. परस्परांचा नाश करणे हे शहाणपणाचे ठरणार नाही?”

सिद्धार्थचे म्हणणे सेनापतीने खोडून काढत जोर देत तो म्हणाला,

” क्षत्रिय लोक युद्धात आपला आणि परका असा भेद‌भाव करत नाहीत. आपल्या राज्यासाठी सख्ख्या भावाशी सुद्धा लढले पाहिजे. पांडव-कौरव एकमेकांशी लढले नाहीत का? ब्राह्मणांनी यज्ञ करणे, क्षत्रियांनी लढणे, वैश्यांनी व्यापार करणे, शेती करणे आणि शूद्रांनी चाकरी करणे हा त्यांचा त्यांचा धर्म आहे” यावर सिद्‌धार्थने उत्तर दिले,

“युद्धात ‌ कौरव-पांडवांचे काय झाले ? आणि दुसरी गोष्ट म्ह‌णजे माणसामाणसातील भेद‌भावही मला मान्य नाही. वैऱ्यावर वैर करणे हा धर्म नाही, वैऱ्यावर प्रेम करणे हा धर्म आहे.”

त्यावर सेनापती म्ह‌णाला, “आता यावर चर्चा करण्यात अर्थ नाही. सिद्धार्थाचा माझ्या प्रस्तावाला विरोध आहे. याबाबत संघाच्या सभासदांनी आपले मत मांडावे”

सेनापतीचा प्रस्ताव मोठ्या बहुमताने मंजूर झाला. सिद्धार्थाचा पराभव झाला.

Leave a comment