देशभरातील संपूर्ण शेतकरी, नागरिक आणि हवामान तज्ज्ञांच्या नजरा सध्या नैर्ऋत्य मान्सूनच्या आगमनाबाबत लागल्या होत्या. अखेर दिलासादायक बातमी आली आहे. पुढील 48 तासात म्हणजे चार जूनच्या सुमारास मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने काल मंगळवारी व्यक्त केला आहे. त्यामुळे तेथून पुढील आठवड्यात दक्षिण भारतात आणि त्यानंतर हळूहळू मध्य भारतात आणि संपूर्ण भारतात मान्सूनचे आगमन होईल असे चित्र निर्माण झाले आहे.
मान्सूनच्या प्रगतीस पोषक परिस्थिती
लवकरच मान्सून सक्रिय होईल अशी परिस्थितीनिर्माण झाली आहे.यापूर्वी हवामान विभागाने 26 मे रोजी मान्सून येण्याचा अंदाज वर्तवला होता;मात्र वातावरणीय परिस्थिती अनुकूल नसल्याने त्यात विलंब झाला. हवामान विभागाच्या दैनंदिन अंधारानुसार अरबी समुद्राच्या दक्षिण आणि आग्नेय भागात, लक्षद्वीप बेटांमध्ये, केरळ आणि तामिळनाडूच्या काही भागांमध्ये मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. याच कालावधीत बंगालच्या उपसागरातील नैर्ऋत्य,मध्य, ईशान्य आणि आग्नेय भागातील मान्सूनची वाटचाल चालू होण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
अल् निनोच्या प्रभावाचे सावट
मान्सूनच्या सक्रियतेबाबत हवामान खात्याने अंदाज वर्तवला असला तरी चालू वर्षी भारतात येत्या चार महिन्यात मान्सूनचा लपंडाव चालू होईल अशी स्थिती आहे.जूनमध्ये अल निनोचा प्रभाव थोडा कमी असला तरी पुढील कालावधीमध्ये अल निनोचा प्रभाव वाढल्यास पाऊस काही काळ गुप्त होईल. असे झाले तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल.त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होईल.