प्रत्येक प्राण्याला आणि वनस्पतीला कोणता आहार द्यायचा किंवा घ्यायचा हे निसर्गाने ठरवले आहे. त्यात आपण ढवळाढवळ केली तर त्याचा विपरीत परिणाम त्या प्राण्याला , वनस्पतीला आणि आपल्यालाही भोगावा लागतो.
महाराष्ट्र आणि कर्नाटकातील अनेक ठिकाणी बैलांच्या, घोड्यांच्या शर्यती होत असतात. आणि शर्यत जिंकण्यासाठी त्यांचे मालक काहीही करायला कितीही खर्च करायला तयार असतात. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील अनेक शर्यती मारणारा आणि सुवर्ण कामगिरी करणारा तांबवे, तालुका वाळवा , जिल्हा सांगली येथील विजय निकम यांच्या मालकीच्या 55 लाख रुपये मागणी केलेल्या खोंडाला मधुमेह आणि हृदयविकार झाल्याचे आढळून आले आहे. हा बैल शर्यतीमध्ये अचानक थांबू लागला आणि धापा टाकू लागला. त्याचा हा थकवा मालकाच्या लक्षात आल्यावर मालकाने त्याला मिरज येथील पशुवैद्यकीय चिकित्सालयात नेले. तेथे त्याच्या वेगवेगळ्या प्रकारची तपासणी केली आणि त्यात त्याला मधुमेह झाल्याचे लक्षात आले. त्याचबरोबर हृदयविकारही असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सुमारे 400 किलो वजनाचा आणि तीन वर्षे वयाचा हा खोंड साडेतीन ते चार फोटो उंचीचा असून त्याने अनेक मैदाने मारली आहेत. या खोंडाला नियमित चारा कमी दिल्यामुळे आणि रवंथ करण्यासाठी न येणारे पदार्थ दिल्यामुळे म्हणजेच काजू ,बदाम,दूध अंडी असे शक्तीवर्धक पदार्थ दिल्यामुळे हे पदार्थ रवंथ करण्यासाठी पुन्हा तोंडात येत नव्हते .त्यामुळेच हा आजार झाल्याचे लक्षात आले. बैलाला दिलेले लाडके खाणे त्याच्या जीवावर आले. अशा प्रकारे अघोरी आहार इथून पुढे कोणत्याही मालकाने आपल्या बैलांना देऊ नये. असाच हा संदेश या तपासणीतून दिला गेलेला आहे.