योगामध्ये यम, नियम, आसने, प्राणायाम, ध्यान इत्यादी प्रकार येतात. या सर्व पद्धतींचा समुच्चय म्हणजे योग होय. यांतील आसने हा प्रकार आपण माहिती करून घेणार आहोत.
आसन-Asana
आसन या शब्दाचा अर्थ आहे विशिष्ट स्थितीत बसणे, राहणे, स्थिर राहणे होय. कोणतेही आसन हे आरामदायी असले पाहिजे शरीराला आणि मनाला त्रास न होता आसन स्थितीत राहणे खूप महत्त्वाचे असते. जे आसन आरामदायी असते, ते आरोग्यासाठी अधिक चांगले असते. आसनांमुळे शारीरिक आणि मानसिक स्तरांवर स्थिरता आणि आराम प्राप्त होतो.
आसनांच्या सरावासाठी मार्गदर्शक तत्त्वे – Guidelines for the Practice of Asanas.
1 सर्वसाधारणपणे आसनांचा सराव हा उभे असलेल्या स्थितीत, बसलेल्या स्थितीत, पालथा पडलेल्या स्थितीत आणि उताणा पडलेल्या स्थितीत करतात. आसनांच्या इतरही काही स्थिती आहेत त्या स्थितीतही आसने करतात.
2 कोणतेही आसन अवाजवी ताण देऊन किंवा घाईघाईने करु नये. अवयवांना हिसका देणे किंवा खेचणे पूर्णतः टाळावे.
3 आसने करताना शरीर पूर्णतः दक्ष असले पाहिजे आसन क्रिया योग्य पद्धतीने होण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकाच्या देखरेखीखाली आसने शिकावीत.श्वास आणि अवयवांची हालचाल यांत योग्य तो समन्वय असला पाहिजे.
4 एक सर्वसामान्य नियम असा आहे की शरीराचा कोणताही भाग वर येताना श्वास घेतला पाहिजे व शरीराचा कोणताही भाग खाली जाताना श्वास सोडला पाहिजे.
5 सरावाने म्हणजे योगासनांचा सराव करणाऱ्या व्यक्तीने सूचनांचे प्रामाणिकपणे पालन केले पाहिजे.
काळजीपूर्वक लक्ष देऊन सराव केला पाहिजे.
6 आसनाची सर्वोतम म्हणजे अंतिम स्थिती टप्प्याटप्प्याने गाठली पाहिजे. पहिल्या आठवडयात किंवा पहिल्या महिन्यात लगेच आसनाची अंतिम स्थिती साकारता येईलच असे नाही. त्यासाठी किमान सहा महिने सातत्यपूर्ण सराव हवा.
7 आसनाची अंतिम स्थिती सर्वांनाच जमेल अस्सं नाही. प्रत्येकाने आपल्या मर्यादा ओळखून आसने केली पाहिजेत.
8 आदर्श आसन म्हणजे कोणत्याही प्रकारचा थरकाप किंवा कोणत्याही प्रकारची अस्वस्थता न करता सहजपणे ते आसन करत आले पाहिजे.
9 आसनाचा अंतिम टप्पा गाठल्यानंतर जी स्थिरता येते, त्या स्थिरतेची वेळ हळूहळू टप्प्याटप्प्याने वाढवता आली पाहिजे.
10 आसनांचा सराव हा नियमित होणे आवश्यक आहे. आसनांचा कालावधी ठरवून परिश्रमपूर्वक प्रशिक्षण घेऊन शरीराची क्षमता पाहून आणि मनाची स्थिती पाहून करावीत. सातत्य नसल तर आसनांचा शरीराला आणि मनाला कमी फायदा होतो.
11 सुरुवातीच्या काळात आसनांचा सराव करताना थोडा अशक्तपणा जाणवू शकतो. परंतु काही दिवसांच्या सातत्यपूर्ण सरावानेच अशक्तपणा हळूहळू कमी होत जाऊन सशक्तपणा येऊ लागतो.