mogalmardini maharani tarabai :मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई’

मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई’
या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने-

शुक्रवार दिनांक 24 जानेवारी 2025 रोजी न्यू पॅलेस कोल्हापूर येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते मोगलमर्दिनी, स्वातंत्र्य सौदामिनी महाराणी ताराबाई या पुस्तकाचे मोठ्या दिमाखात प्रकाशन झाले. महाराष्ट्रातील विख्यात लेखक, एकापेक्षा एक सरस आणि वास्तव लेखनातून पुस्तके लिहिणारे डॉ. जयसिंगराव पवार यांच्या 25 वर्षाच्या अथक परिश्रमातून आणि लेखनातून उतरलेले मोगलमर्दिनी ताराबाई हे आठशे पानी पुस्तक प्रकाशित झाले.

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज, महाराणी ताराबाई, राजर्षी शाहू महाराज यांच्याविषयी सविस्तर आणि खरा इतिहास लिहिणारे डॉ. जयसिंराव पवार हे एक विख्यात लेखक आहेत.

सुरुवातीला डॉ. जयसिंगराव पवार यांच्या सुकन्या डॉ मंजुश्री पवार यांनी प्रास्ताविकात महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीच्या स्थापनेचा आणि कार्याचा आढावा घेतला. सुप्रिया सुळे यांच्या हस्तेच या पुस्तकाचे प्रकाशन का करण्यात आले? याची कारणमीमांसा देताना त्या म्हणाल्या, सुप्रिया सुळे यांच्या तोडीच्या लढवय्या,वक्त्या, पुरोगामी विचाराच्या एकही महिला महाराष्ट्रात नाही. सुप्रिया सुळे यांचेही जीवन संघर्षमय आहे. संघर्षातून कसलेले नेतृत्व आहे. म्हणूनच त्यांच्या हस्ते मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई या पुस्तकाचे प्रकाशन झाले.

डॉ जयसिंगराव पवार यांनी आपल्या भाषणात उपस्थित सभाजनातील श्रोत्यांना कोल्हापूरातील जागरूक नागरिक असा उल्लेख केला. राजर्षी शाहू महाराज यांनी महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीच्या स्थापनेच्या वेळी 2,00,000 रु. मदत दिल्याचा उल्लेख केला. याशिवाय यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मार्फत आणि स्वतः शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी वेळोवेळी आर्थिक सहकार्य करून महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीला बळ दिल्याचे सांगितले.

शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपण्याचे काम या प्रबोधिनीने केले आहे. त्याच विचाराचा वारसा शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी जपला आहे, राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावरील डॉ. जयसिंगराव फार यांचे पाच खंड मराठी, इंग्रजी, हिंदी भाषांबरोबरच अन्य चौदा भाषांत प्रकाशित करण्यासाठी शरद पवार यांनी प्रोत्साहन आणि प्रेरणा दिल्याचे सांगितले.

जुन्नर जवळील नारायणगाव मधील शाळेत 4000 मुली शिकत होत्या. या शाळेने डॉ. जयसिंराव पवार मार्गदर्शनासाठी गेले होते. त्यांनी महाराष्ट्राच्या इतिहासातील कर्तबगार स्त्रिया कोण? असा प्रश्न मुलींना विचारल्यावर राणी लक्ष्मीबाई अहिल्याबाई होळकर यांची नावे पुढे आली, पण एकाही मुलीने महाराणी ताराबाईचे नाव सांगितले नाही.ही बाब त्यांना खटकली .त्याच वेळी म्हणजे 25 वर्षापूर्वी ताराबाई यांच्याबद्‌दल ग्रंथ लिहिण्याचे काम हाती घेतले. तो ग्रंथ पूर्ण लिहून प्रकाशित व्हायला 2025 साल उजाडले.

डॉ पवार पुढे म्ह‌णाले, अमेरिकेतील इतिहासाचे अभ्यासक रिचर्ड इटन एकदा कोल्हापूरात आले होते. त्यांनी महाराणी एक महत्त्वपूर्ण उद्गार काढले-

The genius of Tara Bai has no parallel in the world History.

ताराच्या अलौकिक बुद्धिमत्तेला जगाच्या इतिहासात समांतर कोणीही नाही. थोडक्यात, ताराबाईंहून अधिक पराक्रमी महिला जगात कोणी नाही!

महाराणी ताराबाई किती महान होत्या, हे रिचर्ड इटन यांनी सांगितले. पन्हाळगड येथे ताराबाईंनी आपली राजधानी वसवली होती. याच गडावर ताराबाईचे लग्न छत्रपती संभाजी महाराज यांनी राजाराम महाराजांशी लावून दिले होते. ताराबाई ह्या सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होय. त्यांचे व्यक्तिमत्त्व हंबीरराव मोहिते, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, राणी येसूबाई यांच्या छत्राखाली फुलले होते.

औरंगजेबाचा वकील, इतिहासकार खाफीखान यानेही महाराणी ताराबाई यांच्याबद्दल गौरवोद्‌गार काढले होते. अशा या कर्तबगार ताराराणीचा पुतळा पन्हाळगडावर व्हावा अशी इच्छा डॉ, जयसिंगराव पवार यांनी बोलून दाखवली. नामदार हसन मुश्रीफ , नामदार प्रकाश आबिटकर यांनी सरकारतर्फे महाराणी ताराबाई यांचा पुतळा पन्हाळगडावर बांधण्याचे आश्वासन दिले.

खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या हलक्या-फुलक्या भाषणात इतिहास, राजकारण, समाजकारण, अंधश्रद्धा, पुरोगामी विचार, संसदेतील लढा याबद्‌द‌ल आपले विचार मांडले. सध्याच्या डिजिटल युगात AI तंत्रज्ञान,chat gpt च्या माध्यमातून हा इतिहास तरुणांसमोर आला पाहिजे.असे त्यांनी बोलून दाखवले.

खासदार शाहू छत्रपती यांनीही शरद‌ पवार, सुप्रिया सुळे, जयसिंगराव पवार यांच्या कार्याचा आढावा घेतला.

अशा प्रकारे एका दिमाखदार सोहळ्याला मला उपस्थित राहता आले.याहून भाग्य ते कोणते!

शब्दांकन:
संभाजी पाटील
राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित, माजी शिक्षण विस्तार अधिकारी

Leave a comment